Home Blog Page 1361

– उच्चभ्रू ज्येष्ठांना ओढले जातेय जाळ्यात:परदेशातील ‘शुगर डॅडी’ची संकल्पना पुण्यात रुजू पाहतेय

पुण्यातही या शुगर डॅडीचा ट्रेंड वाढत आहे.
पुणे हे शिक्षणाचे आणि रोजगाराचे हब आहे. येथे मोठ्या प्रमाणात तरुणी शिक्षणसाठी येतात. यामध्ये त्या शुगर डॅडीचा अशा रिलेशनशिपमध्ये, शुगर बेबी बहुतेकदा अशा मुली असतात ज्यांना पैसा किंवा विलासी जीवन आवडते. पुण्यातील ज्येष्ठाना त्या जाळ्यात ओढू पाहत आहेत. त्यासाठी ज्येष्ठानी आणि घरातल्या सदस्यांनी सावध राहावे.

पुणे: शिक्षणासाठी पुण्यात आलेली पंचवीस वर्षीय करिना पुण्यातील एका उच्चभ्रू ज्येष्ठ जोडप्यांच्या घरात ‘पेयिंग गेस्ट’ म्हणून राहत होती. या ज्येष्ठ दांपत्याची मुले परदेशात सेटल झालेली. परंतु, करीना घरभाडे देत होती ना तिचा वैयक्तिक कुठला खर्च स्वतःच्या पैशातून करत होती. हा खर्च तिचा घरमालक असलेला 75 वर्षीय ज्येष्ठ (प्रियकर) करत होता. थोडक्यात दोघे रिलेशन मध्ये होते. याची कुणकुण लागताच पुरावे गोळा करण्यासाठी त्या ज्येष्ठाच्या पत्नीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली आणि सत्य समोर आले. प्रकरण पोलिसांत जाणार होते पण आपलीच इज्जत जाईल म्हणून घरातील सदस्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. पुण्यातील ही एक सत्य घटना असून हा सर्व प्रकार दुसरे तिसरे काही नसून ‘शुगर डॅडी’ हा आहे.

‘शुगर डॅडी’ म्हणजे आपली हौस – मौज (आर्थिक, शारीरिक) भूक भागवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीच्या सोबत डेटिंग, शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुणी या जेष्ठांना शुगर डॅडी म्हणतात. आर्थिक मोबदला देऊन तरुणींकडून आपली भावनिक व शारीरिक गरज भागवनारे ज्येष्ठ नागरिक असतात. तसेच अशा तरुणींना शुगर बेबी असे म्हटले जाते. हे नाते ठराविक काळासाठी असते. ही संकल्पना खरी पाश्चात्य देशांमध्ये आहे. पण, सध्याच्या बदलत्या काळात, बदलत्या नातेसंबंधात ही संकल्पना पुण्यासारख्या शहरातही मूळ धरू पाहत आहे. परंतु यामध्ये शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या तरुणी अशा शुगर डॅडीच्या शोधात असून त्यांना जाळ्यात ओढू पाहत आहेत.

पुण्यातील स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीकडे अशा शुगर डॅडींची माहिती काढण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिला येत आहेत. काहींमध्ये तर या तरुणीचा उद्देश हा ज्येष्ठाना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक तसेच त्यांची प्रॉपर्टी देखील हडपण्याचा डाव असल्याची माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली. यावरून हा प्रकार किती गंभीर आहे याची माहिती कळते.

पुण्यात अशा श्रीमंत, सधन ज्येष्ठ जोडप्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक जोडप्यांची मुले परदेशांत सेटल झाली आहेत. ही ज्येष्ठ जोडपे देखील नोकरीतून निवृत्त झालेली असतात. त्यांचे हक्काचे घर किंवा बंगला असतो. तसेच त्यांची अनेक घरे असतात. मग, अशा ज्येष्ठाच्या शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या तरुणी शुगर बेबी बनतात. गडगंज संपत्ती पाहून अशा ज्येष्ठाना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. यामागे त्यांचा हेतू हा पैसे काढण्याबरोबरच त्यांची संपत्ती हडप करण्याचाही असतो.

यामध्ये त्या त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या पुरुषांसोबत (शुगर डॅडी) डेटवर जातात. त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे आणि विविध सुविधा घेतल्या जातात. ते त्यांच्या शुगर डॅडीसह इतर देशांच्या सहलीला देखील जातात, महागड्या भेटवस्तू मिळवतात, सुट्टीवर जातात आणि शारीरिक संबंध देखील ठेवतात.

या प्रकारचे नाते का तयार होते?
हे बहुतेक ते लोक असतात ज्यांचे वैयक्तिक जीवन एकाकी असते. शुगर डॅडी किंवा शुगर बेबी शोधण्यासाठी एक विशेष वेबसाइट आहे जी 2023 पासून अधिक लोकप्रिय होत आहे. अशा डेटिंग साइटला शुगर डॅडी साइट म्हणतात. अनेकदा या प्रकारच्या नातेसंबंधात, दोन्ही भागीदार त्यांच्या गरजेनुसार नाते तयार करतात, जे पारंपारिक डेटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

बनू पाहतोय व्यवसाय
अनेकदा अशे नाते जास्त काळ टिकत नाही. कधी कधी चांगल्या शुगर डॅडीच्या शोधात शुगर बेबी पहिल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते. याचा अर्थ हा संबंध एखाद्या व्यवसायाप्रमाणे केला जातो, जो अल्पकालीन असतो ज्यामध्ये नेहमी चांगल्या संधी आणि नातेसंबंधांचा शोध असतो.

(अधिक माहितीसाठी संपर्क – प्रिया काकडे 78418 77478)

समाज कल्याण विभागामार्फत ‘वॉक फॉर संविधान’ चे उत्साहात आयोजन

पुणे, दि. २७: सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाम बार्टी व पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांमार्फत संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचे रविवारी (दि. २६) उत्साहात आयोजन करण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या‍ भारतातील पहिली मुलींची शाळा ही ऐतिहासिक वास्तू भिडेवाडा येथून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या उपसचिव श्रीमती क्रांती खोब्रागडे, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपजिल्हाधिकारी तथा बार्टीच्या विभागप्रमुख श्रीमती स्ने्हल भोसले, राज्य शासनाचे माजी सचिव ओ.डी.तायडे आदी उपस्थित होते.

यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. रॅलीचा भिडेवाडा येथून प्रारंभ होऊन लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक, जूनी जिल्हा परिषद मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान ससून रूग्णायलयासमोर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसतिगृहे, समाजकार्य महाविद्यालये, पुणे शहरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व तृतीयपंथी व्यक्ती आदींनी सहभाग घेतला.

यावेळी यशदाचे संशोधन अधिकारी बबन जोगदंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी श्रीमती शुभांगी पाटील, विशेष अधिकारी समाज कल्याण मल्लिनाथ हरसुरे, प्रकल्प अधिकारी बार्टी शितल बंडगर, सतीश गायकवाड, शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
000

विभागीय आयुक्त सौरभ राव संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी ३० नोव्हेंबर रोजी करणार

पुणे, दि. २७: छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागासाठी मतदार यादी निरीक्षक (इलेक्टोरल रोल ऑब्झर्व्हर) म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती केली असून ते ३० नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कामकाजाची पाहणी करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक यांनी संपूर्ण मोहिमेदरम्यान अधिनस्त जिल्ह्यांना किमान ३ भेटी देणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत श्री. राव हे पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आणि नागरिकांना मतदार नोंदणीबाबत समस्या असल्यास त्यांनी गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावरील सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
0000

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

पुणे, दि. २७: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000

सुनील महाजन यांची पुन्हा 5 वर्षासाठी अध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे:अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेची दिनांक 26 /11 /2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड कलादालन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा झाली. या सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते. या सभेमध्ये सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी
अध्यक्ष – सुनील महाजन
उपाध्यक्ष -समीर हंपी
प्रमुख कार्यवाह -सत्यजीत धांडेकर
कोषाध्यक्ष -दीपक गुप्ते
कार्यकारणी सदस्य– प्रथमेश कदम ,डॉ.वासंती जोशी, अभिषेक महाजन, गिरीश गोडबोले, दीपक पवार ,केतकी बोरकर, मदन गायधने ह्या सर्वांची सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी एकमताने निवड झाली.

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात दीपोत्सव: तब्बल एक लाख दिव्यांनी सजले मंदिर

पुणे : मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून गेला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर प्रकाशले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

संविधान टिकवायचे असेल तर भाजपाचा संपूर्ण पराभव होणे गरजेचे- सुभाष वारे, संविधान अभ्यासक

पुणे– पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ७४ व्‍या संविधान दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन उपस्थित सर्वांनी केले व कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी ज्येष्ठ संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांचे व्‍याख्यान आयोजित करण्यात आले होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हालआपेष्ठा सहन करून शिक्षण पूर्ण करून बॅलिस्टर पदवी घेतली. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली व त्यानुसार त्यांनी अहोरात्र कष्ट करून २ वर्षे ११ महिने व २६ दिवसांनी म्हणजे २६ नोव्‍हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा राष्ट्रपतींना सुपूर्त केला.’’   

     यावेळी बोलताना प्रा. सुभाष वारे म्हणाले की, ‘‘आगामी २०२४ च्या निवडणुकीत संविधान टिकवायचे असेल तर भाजपाचा संपूर्ण पराभव होणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान म्हणजे जीवंत काँग्रेस चळवळीचा आदर्श आहे. संविधान दिन साजरा करण्याचा खरा हक्क काँग्रेस पक्षाचाच आहे. भारतातील सरंजामशाही, जाती पाती, पुरोहित वाद यापासून स्वातंत्र्य हवेच होते परंतु इंग्रजांच्या गुलामगीरीतून मुक्तता व्‍हावी यासाठी प्रयत्न व्‍हायला हवे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. अस्पृश्यतेच्या घटनेबाबत १७ वे कलम चवदार तळ्याच्या ठिकाणापासून सुरू झाले. शैक्षणिक आरक्षण, शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योग्यरित्या आखणी केली आहे. सामान्य माणसाने आपल्याशी निगडीत प्रश्नांना प्राधान्य देवून उद्याच्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी लोकसहभाग

 वाढवला गेला पाहिजे. संविधानाचे वैशिष्ट म्हणजे रक्तपाताशिवाय क्रांती साकारणे हे आहे.’’

     यानंतर २६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन पटांगणात करण्यात आला. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलीत करून सर्व उपस्थितांनी शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर काल जम्मु खोऱ्यातील राजोरी येथे दहशतवादी हल्ल्यात लष्करी अधिकारी शहिद झाले त्यांनाही २ मिनिटे मौन बाळगून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

     यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, लता राजगुरू, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, नीता रजपूत, प्रियंका रणपिसे, ॲड. राजश्री अडसूळ, सतिश पवार, द. स. पोळेकर, सुजित यादव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, अक्षय माने, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, अजित जाधव, रवि आरडे, हरिष यादव, भरत सुराणा, समिर शेख, नंदलाल धिवार, लतेंद्र भिंगारे, उमेश ठाकुर, ज्योती चंदवेळ, रजिया बल्लारी, छाया जाधव, नलिनी दोरगे, सचिन सुडगे, सुंदर ओव्हाळ, प्रकाश पवार, अभिजीत गोरे, समिर गांधी, सुरेश नांगरे, स्वप्निल नाईक, ज्ञानेश्वर निम्हण, सनी रणदिवे, मारूती माने, आशुतोष शिंदे, रवि ननावरे, विठ्ठल गायकवाड, संजय डोंगरे, राज अंबिके, मुन्ना खंडेलवाल, शिवा भोकरे, अनिल पवार, संजय मानकर  आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार विनोद रणपिसे यांनी मानले. 

उत्तरकाशी बोगदा बचाव मोहीमेबाबत 26.11.2023 संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची माहिती

0

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023

सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशी मधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील 2 किमी कॉक्रीटचे काम पूर्ण झाले असून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट  आहे.

विविध सरकारी यंत्रणा  त्यांना दिलेल्या विशिष्ट कार्यात  अथकपणे गुंतल्या असून, कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहेत. या ठिकाणी बचाव कार्याबाबत सूचना करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ उपस्थित आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी, सरकार सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.

बचाव कार्यातील महत्वाची अद्ययावत माहिती :

1. एनचआयडीसीएल लाईफलाईन चे प्रयत्न ::

  • ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे नियमित अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
  • संत्री, सफरचंद, केळी सारख्या पुरेशा फळांसह औषधे आणि क्षारांचाही या पाईपमधून नियमित अंतराने पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील साठ्यासाठी अतिरिक्त सुक्या खाद्यपदार्थांचाही पुरवठा केला जात आहे.
  • एसडीआरएफ ने विकसित केलेली सुधारित संपर्क व्यवस्था स्थापन करून, अडकेल्या मंजुरांशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. अडकलेले सर्व कामगार  सुरक्षित आहेत.

3.सतलज जल विद्युत निगम-SJVNL द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग:

  • ड्रिलिंग मशिनरी घटनास्थळी दाखल झाल्या.
  • ड्रिलिंग मशिन सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम  पूर्ण झाले आहे. बोगद्यावरील ड्रिलिंग पॉईंटचे मार्किंग Ch 300 L/S. या ठिकाणी जीएसआय , आरव्हीएनएल आणि ओएनजीसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रूप देण्यात आले आहे.
  • मशीनची जोडणी सुरू झाली आहे.
  • मुख्य मशीन ड्रिलिंग साइटवर पोहोचले आहे.बोगद्याच्या पोर्टलवरून ड्रिलिंग साइटपर्यंत मशीनची ड्रिलिंग रिग पाठवली आहे.  26.11.2023 रोजी दुपारी 12 .05 वाजता ड्रिलिंग सुरू झाले.

4.टिहरी हाइड्रो विकास निगम लिमिटेड (टीएचडीसीएल) द्वारे बरकोटच्या  बाजूला हॉरीझॉन्टल  ड्रिलिंग:

  • टीएचडीसीएलने बरकोटच्या टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, पाचवा स्फोट 26.11.2023 रोजी दुपारी 2. 25 वाजता करण्यात आला.
  • ड्रिफ्टची एकूण लांबी 10.6 m आहे. 13 क्रमांकाच्या रिब्सचे फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.

5.आरव्हीएनएल द्वारे हॉरीझॉन्टल ड्रिलिंग

  • कामगारांना वाचवण्यासाठी हॉरीझॉन्टल ड्रिलिंग करण्यासाठी लागणारी सूक्ष्म बोगद्याची उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत. प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.       

6.सिल्क्याराच्या बाजूने आरव्हीएनएल द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंग (8 इंच व्यास)

  • बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणिआरव्हीएनएलला सुपूर्द केला आहे. बीआरओ ने ड्रिलिंगसाठी उपकरणे कामाच्या ठिकाणी आणली आहेत.
  • 26.11.2023 रोजी पहाटे 4. 00 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 40 मीटर पूर्ण झाले.

7.ओएनजीसी द्वारे बरकोटच्या दिशेने व्हर्टिकल ड्रिलिंग (24 इंच व्यास )

  • ओएनजीसी च्या खोदकाम पथकाने 20.11.2023 रोजी साइटला भेट दिली.
  • इंदूर येथून एअर ड्रिलिंग रिग मशीन घटनास्थळी पोहोचले आहे.

8.THDCL/लष्कर/कोल इंडिया आणि NHIDCL च्या संयुक्त टीमकडून मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेलचे खोदकाम

  • ड्रिफ्ट डिझाइन पूर्ण झाले आहे (1.2 मी X 1.5 मी विभाग)
  • साहित्य घटना स्थळी पोहोचले.
  • 21.11.2023 रोजी लष्कराच्या वेल्डर्सनी फॅब्रिकेशन सुरू केले.
  • 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.

9. बीआरओ द्वारे रोड कटिंग आणि सहाय्यक काम:

  • बीआरओ ने SJVNL आणि RVNL द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी अप्रोच रोडचे बांधकाम पूर्ण केले आहे.
  • ओएनजीसी द्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारावर बीआरओ,ओएनजीसी साठी अप्रोच रोड देखील बनवत आहे. 5000 मीटरपैकी 1050  मीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी:

12 नोव्हेंबर 2023 रोजी, सिल्क्यरा ते बरकोट दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात सिल्क्यराच्या बाजूला 60 मीटर भागात  बोगद्याचा भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने  तातडीने साधन सामुग्रीची जमवाजमव सुरु केली.

टीप: तांत्रिक त्रुटी, हिमालयातील खडतर भौगोलिक स्थिती आणि अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीमुळे बचाव कार्य लांबू शकते.

भारतीय स्त्रियांना कणखर व्यक्तिरेखा म्हणून साकारण्याचा सदैव प्रयत्न करत आले आहे: राणी मुखर्जी

गोवा, 26 नोव्‍हेंबर 2023

गोव्यात इफ्फीच्या 54 व्या महोत्सवादरम्यान आज हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासमवेत – ‘खिळवून ठेवणाऱ्या भूमिका करताना’ या विषयावरील  संवादसत्र चांगलेच रंगले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक आणि गलत्ता प्लस चे मुख्य संपादक बरद्वाज रंगन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात  राणी  मुखर्जी यांचे जीवन  आणि यशस्वी कारकीर्द उलगडली.

आपल्या चित्रपटांच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी , भारतीय स्त्रियांना कणखर व्यक्तिरेखा म्हणून साकारण्याचा सदैव प्रयत्न केल्याचे सांगितले. “चित्रपट आणि त्यांतील व्यक्तिरेखा म्हणजे भारतीय संस्कृतीचे  अवलोकन  करण्याचा झरोका म्हणून  परदेशात त्यांचा विचार केला जातो” असेही त्यांनी सांगितले.

कलेशी इमान राखण्याच्या महत्त्वावर या यशस्वी अभिनेत्रीने भर दिला. “कणखर चित्रपटांच्या आणि भूमिकांच्या समर्थनासाठी उभे राहणे महत्त्वाचे आहे. कधीतरी असे होऊ शकते, की त्या त्या वेळी तुम्हाला प्रेक्षकांची पसंती मिळणारही नाही. परंतु चित्रपटांच्या इतिहासात मात्र अशा चित्रपटांना आणि भूमिकांना निश्चितपणे स्थान मिळेल.”, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अभिनेत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचे महत्त्व मुखर्जी यांनी अधोरेखित केले. “अभिनेते अष्टपैलू असतील तर ते जीवनाचे विभिन्न पैलू समर्थपणे साकारू  शकतात. मी माझ्या व्यक्तिरेखांमध्ये जेवढे वैविध्य आणेन तेवढे ते प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी रुचीपूर्ण ठरेल. व्यक्तिरेखांमधील या विविधतेतून मला स्फूर्तीही मिळते.” असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यक्तिरेखा साकारतानाच्या बारकाव्यांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. “काही विशिष्ट भूमिका करताना, वास्तव  लकबी  समजून घेण्यासाठी अभिनेते वास्तवातील व्यक्तींना भेटतात. परंतु त्याचबरोबर त्यांच्या खऱ्या-खुऱ्या भावभावनाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. चित्रपटातील एखादा प्रसंग उठावदार ठरतो, तो त्यामागील भावनांमुळे. प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने भावना चितारणे महत्त्वाचे असते”, असे त्या म्हणाल्या.

सिने-इंडस्ट्रीत वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल या ख्यातनाम अभिनेत्रीने, ‘अभिनेत्यांनी आपल्या वयाची जाण ठेवून त्यानुसार भूमिका स्वीकारल्या पाहिजेत, म्हणजे मग प्रेक्षक त्यांचा स्वीकार करतील’ असे मत मांडले. वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर तसेच इतर अडथळ्यांवरही मात करण्यास प्रेक्षकांनी त्यांना वेळोवेळी मदत केल्याचेही त्या म्हणाल्या.

“मी वयाला फारसे महत्त्व देत नाही. माझ्या भूमिकांना न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आले आहे. प्रेक्षकांनी तुमच्या व्यक्तिरेखेवर विश्वास ठेवण्याची अर्धी लढाई, तुम्ही तसे दिसलात की जिंकली जाते”, असे सांगत राणी  मुखर्जी यांनी वया विषयी स्वतःचा दृष्टिकोन सांगितला.

सामुदायिकरीत्या संविधानाचे वाचन, आणि रक्षणाची शपथ

पुणे-मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने आज संविधान दिना निमित्त आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे क्रीडा संकुल भवानी पेठ या ठिकाणी संविधानाच्या प्रती वाटुन सामुदायिक रीत्या संविधानाचे वाचन करण्यात आले व २६/११ च्या मुंबई हल्यांत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे ,माजी नगरसेवकअविनाश बागवे , अंकलजी सोनावणे, मातंग समाजाचे जेष्ठ नेते ,विठ्ठल, थोरात, पुणे शहर अध्यक्ष, ,दयानंद अडागळे , सुनील बावकर, सुरेखाताई खंडाळे, विलास कांबळे ,डॉ . रमाकांत साठे, बुवा कांबळे, मधुकर चांदणे, दत्ताभाऊ झोबाडे , व इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित पुणे मनपा भवानी पेठ वॉर्ड ऑफिस चे सह. आयुक्त सौ .अस्मिता धुमाळ, उपअभियंता वासुदेव कुर्बिट , अधिकारी लांडगे , सोनाळकर जी, महेश वाघमारे, आरोग्य विभागाचे, ईसाक शेख, निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड मध्ये पहिल्यांदाच ऑटो, टॅक्सी व असंघटित कष्टकरी जनतेचे राष्ट्रीय अधिवेशन

पुणे – पिंपरी-चिंचवड मध्ये पहिल्यांदाच ऑटो, टॅक्सी व असंघटित कष्टकरी जनतेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 1 व 2 डिसेंबर 2023 रोजी हे अधिवेशन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातून प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. यामध्ये ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक व सर्व प्रकारचे ड्रायव्हर वाहतूकदार व फेरीवाले, घरकाम करणार्‍या महिला, साफसफाई कामगार, बांधकाम मजूरांसह असंघटित कामगार कष्टकऱ्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती ऑटो, टॅक्सी, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन व कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.

पुणे येथे आयोजित रिक्षा रिक्षा चालकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बाबा कांबळे यांनी माहिती दिली.
परिषदेच्या तयारीसाठी पुणे कॅम्प येथे पुणे शहरातील रिक्षा स्टँड प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अधिवेशनाच्या पत्रकाचे वाटप देखील करण्यात आले यावेळी रिक्षा चालकांना व रिक्षा स्टॅन्ड प्रमुखांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते,
अधिवेशनात दिल्ली, जम्मू, कश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, आसाम, ओडिसा, बिहार, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशसह देशभरातील सर्व राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बाबा कांबळे म्हणाले की, देशभरात 25 कोटी ऑटो, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक व सर्व प्रकारचे ड्रायव्हर आहेत. 45 कोटी पेक्षा अधिक बांधकाम मजूर, फेरीवाले, घरकाम महिला यांच्यासह संघटित कामगार कष्टकरी आहेत. या सर्व घटकांना एकत्र करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली. राज्यानिहाय बैठका घेतल्या. सर्वांना संघटित करण्यासाठी नुकताच देशातील 17 राज्यांचा व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा केला आहे. आगामी काळात कष्टकर्‍यांच्या मागण्यांसाठी मोठा लढा उभारू, असा निर्धार बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

अधिवेशनातील मुद्दे –
या अधिवेशनात विविध मागण्यांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. या मागण्यांमध्ये ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो व सर्व प्रकारच्या ड्रायव्हर साठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या ड्रायव्हरसाठी वेल्फेअर बोर्ड स्थापन करून देशातील 25 कोटी ड्रायव्हर यांना सामाजिक सुरक्षा, म्हातारपणी पेन्शन द्यावी. महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो, टॅक्सी, चालक-मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ घटित करण्यात यावे. महाराष्ट्रातील रिक्षाचा मुक्त परवाना तातडीने बंद करून देशभरातील सर्व इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट सक्ती करण्यात यावी. फेरीवाले, बांधकाम मजूर, सफाई कामगार, घरकाम महिला, कंत्राटी कामगारांसह महाराष्ट्रातील तीन कोटी व देशभरातील 45 कोटी पेक्षा अधिक असंघटित कामगार कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, मुलांना उच्च शिक्षण, म्हातारपणी पेन्शन देणारा कायदा तातडीने करून त्याची अंमलबजावणी करावी.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन ; महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिव्यांची आरास

पुणे : प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली….विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास…  नानाविध फुलांची सजावट व विद्युतरोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात जय श्रीराम… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात तब्बल ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व विश्वकर्मा विद्यालय यांनी दीपोत्सवातील पणत्यांची आरास केली. महिलांनी विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभाग घेतला. सुगंधी फुलांद्वारे आणि दिव्यांच्या प्रकाशातून अयोध्येतील श्रीराम मंदिर उजळून निघू देत, अशी शुभेच्छा व प्रार्थना यानिमित्ताने देवीचरणी करण्यात आली.

ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने दीपोत्सव साजरा करीत आहोत. दिव्यांच्या प्रकाशाने ज्याप्रमाणे अंधकार दूर होतो, त्याप्रमाणेच समाजातील वंचित व गरजू घटकाच्या आयुष्यातील  अंधकार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान सभेने भारतीय संविधान निर्माण केले. दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हे संविधान देशाला अर्पण केले. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दर वर्षी संविधान दिन साजरा केला जातो.
यावर्षीही संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत जगताप यांनी उपेक्षित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना लोकशाही मूल्यांचे जतन करून संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मा. जयदेवराव गायकवाड़, भगवानराव सालुंखे, डॉ. सुनील जगताप, किशोर काम्बले, रोहन पायगुड़े, सुवर्णाताई माने संजय गाड़े आदि मान्यवर उपस्थित होते.

‘सेल्फि विथ मेरी माटी’ विश्वविक्रम शहीदांना समर्पित- चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, ता. 26 : सेल्फि विथ मेरी माटी हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा गिनिस वर्ल्ड बूकमध्ये नोंदविला गेलेला विश्वविक्रम राज्यासाठी आणि देशासाठी मोठा असून, तो शहीदांना समर्पित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेशी जोडणारा असल्याचे मत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तिंचा सन्मान करताना बावनकुळे बोलत होते. राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संयोजक राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे,भाजप महाराष्ट्र सरचिटणीस. मुरलीधर मोहोळव्यासपीठावर उपस्थित होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण केलेला विश्वविक्रम पुढील पंचवीस वर्षांत अन्य कुठलाही देश तोडू शकणार नाही. हा एकविसाव्या शतकातील मोदींनी निर्माण केलेला आत्मनिर्भर भारताचा आत्मिक, भावनात्मक विश्वविक्रम आहे. या विक्रमाची कल्पना, नियोजन, अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा वापर, मोठा लोकसहभाग याची केंद्राने नोंद घेत कौतुक केले आहे, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

पाटील म्हणाले, या विक्रमासाठी 25 लाखांहून अधिक छायाचित्रे अपलोड करण्यात आली. देशभक्तीने वेडे झालेले तरूण ज्या देशात असतील, त्या देशाचा पराभव करणे कोणालाही शक्य होणार नाही. या उपक्रमातून मोठी उर्जा निर्माण झाली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना नवीन कामाची प्रेरणा मिळते.

पांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमासाठी 75 दिवस चोवीस तास अथकपणे परिश्रम घेतले. नेतृत्वाचा विश्वास आणि सामुहिक प्रयत्नांचा आविष्कार यांच्या जोरावर तिसरा विश्वविक्रम करता आला. असे यश मिळविणारे पुणे विद्यापीठ पहिलेच आहे.

पांडे यांनी प्रास्ताविक, डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन आणि पुनीत जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

अयोध्येला राज्यातून जाणार 15 लाख नागरिक
या वर्षी 22 जानेवारी रोजी देशातील सर्वात मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आठ महिन्यात राज्यातून 15 लाख नागरिकांना अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी नेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी राजेश पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पुण्यात संकल्प नव्या पर्वाचा, आम आदमीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिनी निर्धार ….

पुणे- अकरा वर्षाच्या अल्पशा कालखंडात दिल्ली आणि पंजाब सारख्या दोन राज्यात एक हाती सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने आज आपला वर्धापन दिन आणि संविधान दिन अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आपटे रोड येथील सेंट्रल पार्क च्या हॉलमध्ये साजरा केला. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि महाराष्ट्र सचिव प्राजक्ता देशमुख या उपस्थित होत्या. तसेच संपूर्ण पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षातील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. इंडिया अगेंस्ट करप्शन सारख्या चळवळी च्या प्रेरणेतून निर्माण झालेला हा पक्ष हा संपूर्ण देशभरात वेगाने आपली घोडदौड करत आहे. अकरा वर्षाच्या अल्पशा काळात पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यापर्यंतची मजल मारली आहे. ही मजल मारताना पक्षाने दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवली आणि पक्षाची विचारसरणी जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, दिल्लीतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी मोफत बस सेवा, मोफत वीज, मोफत पाणी, मोहल्ला क्लिनिक, अनेक सरकारी दाखले तसेच कागदपत्रे यांची घरपोच सुविधा देणे यासारख्या जनहिताच्या अनेक योजना या अकरा वर्षाच्या कालावधीत पक्षाने राबवल्या ज्या अत्यंत लोकप्रिय झाल्या असून नागरिकांना या सर्व भ्रष्टाचार विरहित योजनांचा खऱ्या अर्थाने फायदा झालेला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येण्यापूर्वी २०१४-१५ चे बजेट हे ३५,००० करोडचे होते जे आज वाढून २०२२-२३ मध्ये ७९,००० करोडचे झाले आहे यावरून दिल्ली सरकारच्या गुड गव्हर्नन्स चा प्रत्यय येतो.

भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार करता दिल्ली सरकारने राज्यात अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स बनवण्यास सुरुवात केली आहे, दिल्ली मधील अनेक तलावांचे सुशोभीकरण करत दिल्ली सरकारने एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. उदयन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारतर्फे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ची सुरुवात देखील करण्यात आली आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यात सरकारी क्षेत्रातील अनेक नोकऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिला जात आहेत. शिक्षक भरती सारखा विषय उत्कृष्टपणे हाताळून दोन्ही राज्यांना अधिकाधिक सुशिक्षित बनवण्याचा आटोकाट प्रयत्न आम आदमी पक्षाच्या सरकारतर्फे केला जात आहे. जुनी पेन्शन योजना देखील दिल्ली सरकारने पुन्ह:च्या लागू करताना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

गुजरात आणि गोवा यासारख्या राज्यात काही प्रमाणात विधानसभेच्या निवडणुका जिंकतानाच, अनेक राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये आम आदमी पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच काही ग्रामपंचायती देखील आम आदमी पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत आणि भविष्यात यात आणखी जोमाने वाढ होईल असे सध्या चित्र आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्याकडून नियमितपणे मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातही लवकरच आम आदमी पक्षाचा झाडू इतर पक्षांची राजकारणाच्या मैदानातून सफाई करताना दिसेल असे यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात स्वतः लक्ष घातले असल्याने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत याची सुरुवात लवकरच येऊ घातलेल्या निवडणुकांपासून सुरू होईल. तसेच आम आदमी पक्ष हा लवकरच पुणे महानगरपालिकेत देखील आपले खाते उघडेल अशी आशा यावेळी बोलताना पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शाहीन पठाण, ॲड.अमोल काळे आणि किरण कद्रे यांनी केले.