Home Blog Page 1325

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

नागपूर, दि. १५:- शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक बाबतीत तातडीने कठोर पावले उचलण्यात यावीत. वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडचणीतील मध्यवर्ती सहकारी बँकांचा नागपूर विधानभवनातील समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधिमंडळ सदस्य सर्वश्री माणिकराव कोकाटे, संग्राम थोपटे, सतीश चव्हाण, नितीन पवार, मकरंद पाटील, पंकज भोयर, श्रीमती श्वेता महाले, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितिन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच विभागीय सहकार सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), बँकाचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, वर्धा व बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुस्थितीत आणण्यासाठी या बँकांवर चांगले प्रशासक नेमण्यात यावेत. बँकांच्या या स्थितीस कारणीभूत ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांच्यावर कारवाई करावी. तसेच दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासह बँकांच्या थकित कर्जदारांची मालमत्ता जप्त करावी. मालमत्तांचे लिलाव करून त्यातून वसुली करण्याच्या दृष्टीने बँकेने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

बँकांना भागभांडवल उपलब्ध करून देण्याच्या मागणीबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासह उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना आखण्यासाठी बँकांना शासन हमी किंवा भागभांडवल देण्याबाबत वित्त व नियोजन विभागाने उपाययोजना सूचवाव्यात. राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जाऊ शकतात. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वित्त विभागामार्फत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.

नागपुरच्या महारॅलीतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

0

राज्यभरातील १० लाख काँग्रेस कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार – नाना पटोले

काँग्रेस स्थापना दिनी २८ डिसेंबरला नागपूरात काँग्रेसची भव्य रॅली

नागपूर, दि. १५ डिसेंबर
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

नागपूरच्या हॅाटेल ली मेरिडीयन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री प्रदेश व कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिशन ओझा, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, अमर राजूरकर, नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, अभिजीत सपकाळ आदी नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना के. सी. वेणुगोपाल पुढे म्हणाले की, देशभरातून काँग्रेस पक्षाचे जनसमर्थन वाढत आहे, नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये भरघोस वाढ दिसून आली. कर्नाटकनंतर काँग्रेसने तेलंगणातही स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून देशाची संसदही सुरक्षित राहिलेली नाही तर देश कसा सुरक्षित असेल असा प्रश्न उपस्थित करून लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर आतापर्यंत दोनदा हल्ला झाला आणि दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाचेच सरकार होते. संसदेच्या सुरक्षे संदर्भात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारले असता, प्रश्न विचारणाऱ्या १४ सदस्यांनाच निलंबित करण्यात आले पण ज्या भाजपा खासदारांकडून या हल्लेखोरांना पास देण्यात आले होते त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली नाही.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, नागपूर मध्ये होणाऱ्या महारॅलीला राज्यभरातून १० लाख लोक उपस्थित राहतील. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, पक्षाचे सर्व सेल व विभाग ही महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवरच असल्याने ही महारॅली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व ऊर्जा निर्माण करण्याचे काम करेल. नागपूर मध्ये होणारी महारॅली ऐतिहासिक असेल व देशात परिवर्तनाचा संकेत देणारी ठरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आदिवासी शेतकरी,कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

आ.कुणाल पाटील यांनी केला बुलंद आवाज

नागपूर/धुळे दि. १५ डिसेंबर

धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली. दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी मोर्चातील पदाधिकार्‍यांशी शासन पुन्हा चर्चा करील असे आश्‍वासन दिले.
आदिवसाी शेतकरी कष्टकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार-धुळे-मुंबई बिर्‍हाड मोर्चा निघाला आहे. 432 कि.मी.पायपीट करीत 12 दिवसात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. या बिर्‍हाड मोर्च्यात तब्बल दहा हजार आदिवासी शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चातील शिष्टमंडळ आपल्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटायला नागपूर येथे आले,आदिवासी मंत्र्यांनी केवळ दहा पंधरा मिनटे चर्चा केली त्यामुळे या शिष्टमंडळाची घोर निराशा झाली. आदिवासी,कष्टकरी बांधवाच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज आज पुन्हा एकदा आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठवित एल्गार पुकारला. त्यामुळे शेतकरी कष्टकर्‍यांचा आवाज बुलंद झाला. आज दि.15 डिसेंबर रोजी दुपारी नागपूर हिवाळी अधिवेशनात अति तातडीचा मुद्दा मांडतांना आ.कुणाल पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारला.अधिवेनशनात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी आदिवासी शेतकरी व कष्टकर्‍यांचा प्रश्‍न पोटतिडीकीने मांडत त्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली. हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्या आधीच मागण्या मान्य कराव्या असेही आ.पाटील यांनी यावेळी सांगितले. आ.कुणाल पाटील यांनी बिर्‍हाड मोर्चाच्या मागण्या विधानसभेत मांडतांना सांगितले कि, नंदुरबार,धुळे,नाशिक जिल्हा पूर्णपणे दुष्काळ जाहिर करावा.अतिवृष्टी,गारपीठ,नैसर्गिक आपत्ती,दुष्काळात नुकसान झालेल्या वनहक्क दावेदार आदिवासीसह सर्व शेतकर्‍यांना एकरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,दुष्काळी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करावी, साक्री तालुक्यातील 2018 मधील दुष्काळाची शेतकरी व वनहक्क दावेदारांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. आदिवासी व इतर जंगलनिवासी वनहक्क कायदा 2006ची अंमलबजावणी करुन दावेदारांना हक्काचा सातबारा उतारा द्यावा अशा विविध मागण्या घेवून हा मोर्चा निघालेला आहे. त्यामुळे मोर्चा मुंबईत पोहचण्या आधीच शासनाने मध्यस्थी करुन आदिवासी बांधव,शेतकरी,कष्टकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल-
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाच्या मागण्या आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सांगितले कि, बिर्‍हाड मोर्चाबाबत शासनाने दखल घेतली असून ना.गिरीष महाजन आणि ना.गावीत यांनी मोर्चातील पदाधिकार्‍यांशी चर्चाही केलेली आहे.तरीही शासन लवकरच त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढेल असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात दिले.

ज्ञानसरिता ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वदिनी गरवारे महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालयादरम्यान ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ढोल-ताशा, टाळ मृदुंगाच्या साथीने झालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील ३० महाविद्यालयांतील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ग्रंथदिंडीला झेंडा दाखवला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के, ज्येष्ठ साहित्यिका श्यामा घोणसे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस, डॉ. सुनील भंडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले या वेळी उपस्थित होते.

ज्ञानसरिता दिंडीमध्ये ढोलताशा आणि टाळ मृदुंगाचा गजर करत पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथ असलेल्या पालख्या खांद्यावर घेतल्या होत्या. तसेच वाचनाचे महत्त्व, महापुरुषांचे विचार सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. महर्षी वाल्मिकी, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, लहुजी वस्ताद साळवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महादजी शिंदे, क्रांतिवीर उमाजि नाईक, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिवीर चाफेकर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि संविधान दिंडी यांचा समावेश होता.

बालवाचकांची दिंडी
लोकसेवा ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक” असा संदेश देत बालभारती ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गावर बाल साहित्य दिंडी काढण्यात आली. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक ल. म. कडू, राजीव तांबे, कवयत्री डॉ. संगीता बर्वे, श्यामची आई चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ, बालसाहित्यिक (लेखिका) आराध्या नंदकर, पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक ज्ञासाचे युवराज मलिक, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, ईस्कूलच्या मुख्याध्यापिका चैत्राली जैन, संवाद पुणेचे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. रंगीबेरंगी फुगे सोडून बालदिंडीचा प्रारंभ झाला. ढोल -लेझीम पथक, पालखी, महाराष्ट्राची महान संत परंपरा, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेषभूषेतील मुले, कॉमिक वर्ल्ड, मोराल स्टोरीज, विविध राज्यातील पारंपारिक वेषभूषेतील बाल कलाकार, ऑटो बिओगर्गिस, नो आबाऊट पोएट, रामायणातील वेषभूषेतील कलाकार असे सुमारे पाचशे शालेय विद्यार्थी बालदिंडीमध्ये सहभागी झाले.
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात स्थिर, शाश्वत जीवन जगता यावे यासाठी वाचन आवश्यक आहे, असे मत कडू यांनी मांडले. पुस्तके समाजाला आणि जीवनाला जोडतात. त्यामुळे मुलांना पुस्तके वाचनाची गोडी लावणे आवश्यक असून दिंडीतील वारकरी पुणे पुस्तक प्रदर्शनाचे ब्रँण्ड अम्बेसिडर असल्याचे मलिक म्हणाले.

आठ दिवसात हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू ; शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे –

हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून हडपसरकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रवास करतांना तासनतास आपला वेळ ट्रॅफिकमध्ये वाया घालवावा लागत आहे. प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याबाबत कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे आज महात्मा फुले चौक, मुंढवा येथे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुंढव्यातील महात्मा फुले चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेणुकामाता मंदिर, केशवनगर या रस्त्यावर सद्याच्या घडीला खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच येथील वाहतूक व्यवस्थेचे सुरळीत नियोजन करण्यासाठी, महानगरपालिकेने केशवनगर ते मांजरी पर्यंत जिथे उड्डाणपूल आहे तिथे अंडरपास करावा तसेच येथील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे या मागणी साठी आज महात्मा फुले चौक, मुंढवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्ता रोको केल्यानंतर काही शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी एक रुग्णवाहिका आणून कश्याप्रकारे या वाहतूक कोंडीमध्ये एखाद्या रुग्णाचे प्राण जाऊ शकतात, याचा जिवंत देखावा प्रशासनाला दाखवून दिला. तसेच आंदोलनस्थळी बोलताना, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की “येथील स्थानिक नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून संपूर्ण हडपसर हे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे, पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यासंबंधी निवेदन देवूनही, प्रशासन याविषयी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणतेही नियोजन करत नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसात केशवनगर मांजरीचा अंडरपास करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला नाही, तर आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू” अशा पद्धतीचा इशारा दिला.

येथील आमदार, खासदार, प्रशासन यांना या समस्येविषयी वारंवार, निवेदन, पत्रे, सूचना देवूनही त्यांच्याकडून या प्रश्नावर काहीच मार्ग निघत नाही. दरम्यान या परिसरात असणाऱ्या IT कंपन्या या ट्रॅफिकच्या त्रासाला कंटाळून स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात फटका पोहचू शकतो. आणि म्हणून येणाऱ्या भविष्याची जाण ठेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासना विरोधी आज शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो शिवसैनिक व हडपसर भागातील शेकडो स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी होते. व प्रशासनाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी महापालिका उपायुक्त श्री. काटकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मागणी केलेल्या प्रश्नावर, तातडीचे बैठक घेण्यासंबंधी निर्देशित केल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे, शहर प्रवक्ते, अभिजित बोराटे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख विकी माने, संतोष राजपूत, लक्ष्मण आरडे, शहर उपसंघटक दिपक कुडाळ, शहर संघटक खन्नासिंग कल्याणी, युवासेना हडपसर विधानसभा उपाध्यक्ष सुमित बोबडे, विभागप्रमुख प्रकाश लाकडे, विभागप्रमुख स्वप्नील गायकवाड हडपसर-केशवनगर विभागप्रमुख अक्षय तारू, हडपसर महिला आघाडी अध्यक्ष निशीगंधा थोरात, युवतीसेना शहराध्यक्ष सलोनीताई गुंजाळ आणि हजारो शिवसैनिक व हडपसर परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकसभा घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाइंड ललितने केले सरेंडर

0

न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची कोठडी सुनावली
13 डिसेंबर रोजी संसदेत घुसखोरी करणारे दोन आरोपी आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चारही आरोपींवर यूएपीए कारवाईही करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे- हा नियोजित हल्ला होता.

नवी दिल्ली – संसदेतील घुसखोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित मोहन झा याने गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी ललितला अटक केली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ललित एका व्यक्तीसोबत दिल्लीच्या कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात पोहोचला होता.

या घटनेचा व्हिडिओ बनवल्यानंतर ललित घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने त्याच्या सर्व साथीदारांचे मोबाइलही काढून घेतले होते. ललित बसने राजस्थानमधील नागौरला पोहोचला. तेथे तो त्याच्या दोन मित्रांना भेटला आणि एका हॉटेलमध्ये रात्र काढली. पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे लक्षात येताच तो बसने दिल्लीला परत आला. येथे त्याने आत्मसमर्पण केले. सध्या तो पोलिसांच्या विशेष कक्षाच्या ताब्यात आहे.

त्याच वेळी, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक शनिवारी किंवा रविवारी संसदेतील सुरक्षा त्रुटीचे दृश्य पुन्हा तयार करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी सर्व आरोपींना संसदेच्या संकुलात नेण्यात येणार आहे. याद्वारे आरोपी संसद भवनात कसे घुसले आणि त्यांनी त्यांचा प्लॅन कसा राबवला हे दिल्ली पोलिसांना कळेल.

संसदेत घुसखोरी करणारे आणि धुराचे डबे वापरणारे सर्व आरोपी भगतसिंग फॅन्स क्लबमध्ये सामील होते. हे लोक आपली विचारधारा सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट करायचे. अनेक राज्यातील लोक या क्लबशी जोडले गेले आहेत. गुरुग्राममधील पाचवा आरोपी विशाल शर्मा याची कोठडीत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आलेले नाही. सुमारे दीड वर्षांपासून संसदेत घुसखोरी करण्याचा घाट सर्वांचा होता. त्यानंतर ते म्हैसूरमध्ये भेटले.

मार्चमध्ये मनोरंजनला संसद भवनाची रेकी करण्यास सांगितले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित झाने मार्चमध्ये मनोरंजनला संसद भवनाची रेकी करण्यास सांगितले. सागर जुलैमध्ये संसद भवनातही आला होता, पण आत जाऊ शकला नाही. मनोरंजन आणि सागर यांच्या लक्षात आले की येथे शूज तपासले जात नाहीत. म्हणूनच शूजमध्ये स्मोक कॅन लपविला होता.

  • 10 डिसेंबरला सर्वजण दिल्लीला पोहोचले, मनोरंजन विमानाने आला. राजस्थानमधून आणखी एकजण दिल्लीला पोहोचणार होता.
  • अमोलने ठाण्याहून आणलेल्या स्मोक कॅनचे डबे इंडिया गेटवर सर्वांना वाटले. तसेच सदर बाजारातून तिरंगा ध्वज खरेदी केला. सागरने दोन पास मिळवले, त्यामुळे केवळ सागर-मनोरंजन यांनी संसदेत प्रवेश केला. लखनौमध्ये सागर या कारागिराने चपलामध्ये डबा लपवण्यासाठी जागा तयार केली होती.
  • ललितने अमोल-नीलमचे स्मोक कॅन संसदेबाहेर करतानाचे व्हिडिओ बनवले आणि बंगालमध्ये एनजीओ चालवणाऱ्या नीलक्षकडे पाठवले. नीलक्षने पोलिसांना सांगितले की, ललित एप्रिलमध्येच एनजीओमध्ये सामील झाला होता, त्याने आपली ओळख गुप्त ठेवली होती.
  • ललितला धुमाकूळ फेसबुकवर लाईव्ह सुरू करायचा होता. ललितने चार आरोपींचे मोबाइल फोन जवळ ठेवले होते.
  • आरोपींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आक्षेपार्ह पत्रकेही सापडल्याचे दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

ऊर्जा संवर्धनाला पुरक सौर प्रकल्पांना आणखी गती द्या

अभियंत्यांच्या कार्यशाळेत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे निर्देश

पुणे: पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जेचे लघु व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीमध्ये आतापर्यंत २८६ मेगावॅट क्षमतेचे १२ हजार ३९७ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. वीजग्राहकांचा सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) आणखी तत्पर सेवा देण्यात यावी असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी गुरुवारी (दि. १४) दिले.

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त रास्तापेठ येथील सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय सभागृहात मंडल, विभाग व उपविभाग कार्यालयात छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणाऱ्या ९७ अभियंत्यांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड, प्रणाली विश्लेषक श्री. बाळकृष्ण पाटील, व्याख्याते डॉ. नीलेश रोहणकर, डॉ. संतोष पाटणी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेण्यात आली.  

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, पारंपरिक वीजनिर्मितीचे प्रामुख्याने कोळसा, वायू व इतर इंधन साठे मर्यादित झाले आहेत. संपुष्टात येणाऱ्या या नैसर्गिक इंधनामुळे ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देणे अतिशय महत्वाचे आहे. पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वेग देण्यात आला आहे. छतावरील सौर प्रकल्प उभारणीसाठी ग्राहकाने अर्ज केल्यापासून प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्पर सेवा द्यावी. काही अडचणी आल्यास त्यासंबंधी ग्राहकांना योग्य माहिती द्यावी असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

या कार्यशाळेत डॉ. संतोष पाटणी यांनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया आणि डॉ. नीलेश रोहणकर यांनी सौर धोरण या विषयावर इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत उपविभाग कार्यालयप्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, सहायक अभियंते व कनिष्ठ अभियंते सहभागी झाले होते.

राजस सोसायटी चौकात बिबवेवाडीचा सराईत गुंड जेरबंद

सनी जाधव,बबल्या कोठारी, सल्ल्या शेखची भाईगिरी मोडून काढणार

पुणे-खुनाच्या प्रयत्नातील गुन्हयात दोन महिन्या पासुन फरार असलेला सराईत गुंड सनी शंकर जाधव वय २६ वर्षे रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर १०, माताजी सुपर मार्केट शेजारी अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी याला पोलिसांनी जेरबंद केले आहे .या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२५/१०/२०२३ रोजी बालाजीनगर येथील शिळीमकर पेट्रोल पंप जवळ फिर्यादी रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन भांडणात मध्यस्थी करतोस काय, जास्त शहाणा झालास का, याला मारून टाकू, याला आता संपवायचाच असे असे बोलून बबलू कोठारी, सल्या शेख सनी जाधव यांनी संगनमत करुन जिवे मारण्याच्या हेतुन कोयत्याने वार केले व हातातील कोयते, बांबू हवेत फिरवून आजूबाजूच्या लोकांसमोर आम्हीच इथले भाई आहोत. कोणी नडला तर त्याला तोडणारच असे जोरजोराने ओरडून दहशत केली व त्यानंतर ते सर्वजण गाडीवर बसून तेथून निघून गेले. त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २७७/२०२३ भादवि कलम ३०७,३२३,५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७, मोका कायदा कलम ३(१) (ii),३(२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हया मध्ये सनी जाधव हा गुन्हा झाले पासुन २ महिने फरार होता.
सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे येथे हजर असताना मोक्का मध्ये पाहिजे असलेला टोळी प्रमुख सराईत गुन्हेगार सनी जाधव याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत फरार असलेला आरोपी हा कात्रज येथे राजस सोसायटी चौकातील गणपती मंदिरा जवळ मित्र भेटण्यासाठी येणार म्हणुन वाट पाहत थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पो उपनिरी. राहुल खंडाळे व अंमलदार यांची टीम तयार करुन बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सनी शंकर जाधव वय २६ वर्षे रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर १०, माताजी सुपर मार्केट शेजारी अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे असे सांगितले असुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बबलू कोठारी, सलमान शेख यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील,सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, सागर सुतकर, बजरंग पवार, विशाल वाघ नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली आहे.

 संसदेत घुसणाऱ्या तरुणांची शिक्षा सरकारने माफ करा-प्रकाश आंबेडकर

अकोले-संसदेत घुसणाऱ्या तरुणांनी सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केले आहे. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने या तरुणांची शिक्षा माफ करावी अशी मोठी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लोकसभेत घुसखोरी करून चार तरुणांनी घातलेल्या गोंधळानंतर आंबेडकरांनी अकोल्यात हे वक्तव्य केले आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने तरुणांची शिक्षा माफ करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सरकारला केले आहे. सरकार नोकऱ्या देऊ शकले नाही. त्यामूळे त्या मुलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला. हे बरोबर आहे, मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायाची, हे सरकारने ठरवले पाहिजे.असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडूंचे आभार मानले, बच्चू कडू यांनी जरी ही इच्छा व्यक्त केली असली तरी शेवटी लोकशाहीत यासाठी लोकांचा आशीर्वाद आणि संख्याबळ महत्वाचे असते, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणारऱ्या चार आरोपींमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचा देखील सहभाग आहे. चाकूर तालुक्यातील झरी (खू.) गावात राहणारा अमोल शिंदेला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठी मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडले. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संसदेची सुरक्षा कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिली आहे? जुनी सुरक्षा व्यवस्था मजबूत होती. उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचं हे सरकारने ठरवावे. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा इश्यू क्लोज करावा.

महापालिकेचा काेट्यावधी रूपयांचा टीडीआर घाेटाळा..नियत साफ ठेऊन चौकशी केली तर डझनभर अधिकारी गोत्यात येतील

पुणे/नागपूर पिंपरी-चिंचवड महापालिकेत काेट्यावधी रूपयांचा टीडीआर घाेटाळा झाल्याचा खळबळजनक आराेप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर अधिवेशनात केला. या आराेपांमुळे महापालिका आयुक्तांसह डझनभर अधिकारी घरी जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारची नियत साफ असेल तर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

विराेधी पक्षनेते वडेट्टीवार पुढे म्हणाले,  महापालिका विकास आरखड्यातील आरक्षित भूखंड खासगी विकसकाकडून  विकसीत करून घेण्याची तरतूद आहे. त्याचाच वापर करून  नियमांना फाटा देत हा घाेटाळ केला आहे. वाकड, भुमकर चाैकाजवळ महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्र. 4/38 ट्रक टर्मिनस व पार्किंगसाठी 4.31 आर तर 4/38 अ एमपीएमपीएल डेपोसाठी राखीव आहे. दोन्ही आरक्षणांचे मिळून 10 हजार 274 चाै. मी  क्षेत्र आहे. विकास आराखड्यातील समावेशक आरक्षणांच्या तरतुदींनुसार भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा. लि या संस्थेने महापालिकेसोबत 6 नोव्हेंबर 2023 रोजी एक करार केला. कंपनीने 87 हजार 318 चौरस मीटर बांधकाम करून देण्याच्या मोबदल्यात महापालिकेला 6 लाख 93 हजार 448 चौरस मीटर एमिनीटी टीडीआर देण्याचे ठरले.

या बांधकामाला स्थापत्य विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार बांधकामाचा खर्च 568 कोटी 26 लाख आहे. बांधकामाचे क्षेत्र 78 हजार 318 चौरस मीटर आहे. 65 हजार 80 रुपये प्रमाणे प्रति चौरस मीटर बांधकाम खर्चाला मान्यता दिली. प्रत्यक्षात 2023-24 च्या  रेडी रेकनरनुसार ती 26  हजार 620 रुपये होती. 38 हजार 640 रुपये प्रति चौरस फूट जादा दराप्रमाणे या प्रकल्पाचे अंदाजपत्रक फुगवले. त्यामुळेच एमिनीटी टीडीआरमध्ये मोठी वाढ झाली. 665 कोटी रुपयांचा टीडीआर मिळणे अपेक्षित असताना 1136 कोटींचा जादा टीडीआर विकासकाला मिळणार आहे. 671 कोटींचा फायदा पालिका अधिकाऱ्यांनी विकासकला करून दिल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी सभागृहात केला.

6 नोव्हेंबरला करार होतो, 7 नोव्हेंबरला बांधकामाचा दाखला दिला जातो आणि बेसमेंट खोदून पूर्ण झाल्याचे दाखवले जाते. तब्बल 8 लाख टीडीआर दिला. एका दिवसात एवढ्या मोठ्या कामाचे खोदकाम होते का याचा विचार केला पाहिजे. जोत्याचे बांधकाम झाल्याशिवाय 25 टक्के टीडीआर देता येत नाही, असा नियम आहे. 5 टक्के टीडीआर खोदाकाम झाले म्हणून कसा दिला ? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नियमानुसार व कायद्यानुसार हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगत जावडेकर यांनी आरोप फेटाळले आहेत.

वाकडमध्ये मुख्य ठिकाणी या जागेचे आरक्षण आहे. ग्राऊंडला पीएमपीएमएल बस डेपाे हाेणार असून 21 मजली वाणिज्य वापरासाठी इमारत उभारण्यात येणार आहे. आरक्षणाच्या विकसनासाठी पालिकेस आरक्षणाची जागा व संपूर्ण बांधकाम विनामुल्य मिळणार आहे. पालिकेला एक रूपयांचाही खर्च येणार नाही. वाणिज्य बांधकामातून पालिकेला उत्पन्नाचा स्त्राेत सुरू हाेणार आहे.

त्यामुळे पालिकेचे हित विचारात घेऊन कायदेशीर प्रक्रिया राबवूनच प्रक्रिया केली आहे. यामध्ये काेणतीही अनियमितात झाली नाही. मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा. लि या कंपनीने दि. 3 आँक्टाेबरला खाेदकाम सुरू केले. दि. 6 नाेव्हेंबरला माेबदला म्हणून 5 टक्के टीडीआरची मागणी केली हाेती. त्यानुसार टीडीआर दिला, असे महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड ( PCMC TDR)  म्हणाले.

कोथरुडकरांठी मोफत महा ईसेवा केंद्र

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

पुणे-कोथरूड मधील नागरिकांना आपले विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळणे आता आणखी सोपे आणि सहज होणार आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला असून, आपल्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात मोफत ईसेवा केंद्र सुरू केले आहे. नामदार पाटील यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दुर्बलांना मोठा आधार मिळाला आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा दक्षिण कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या उपस्थितीत ही सेवा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका तथा कोथरुड मंडल महिला मोर्चा प्रभारी मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस प्रा. अनुराधा एडके, गिरीश खत्री, दीपक पवार, उपाध्यक्ष हेमंत बोरकर , दिनेश माझिरे , शंतनू खिलारे, प्रदीप ज़ोरी, प्रभाग १३ अध्यक्ष ॲड. प्राची बगाटे, प्रभाग ११ चे अध्यक्ष अशुतोष वैशंपायन, युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, युवा मोर्चा सरचिटनीस कुणाल तोंडे, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर, महिला मोर्चा सरचिटनिस सौ केतकीताई कुलकर्णी, चिटणीस अभिजीत गाड़े, सौ निर्मला राइरिकर, जनार्दन क्षिरसागर, कैलास मोहोळ, विजय राठोड, स्वीकृत नगरसेवक बापु मेंगड़े, अद्वैत जोशी, राजेश राठौड़, राहुल देशपांडे, सौ. पूनम कारख़ानिस यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजने अंतर्गत, महाराष्ट्रात महा ई-सेवाकेंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या सामान्य सेवा केंद्र योजना (सीएससी) स्थापन करण्यात आल्या आहेत. यालाच महा-ईसेवा केंद्र असेही म्हटले जाते. या केंद्रामधून राज्यातील नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डेमेसाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला, नॉन क्रीमिलेअर यांसह विविध प्रकारचे दाखले आपल्या आवश्यकतेनुसार तात्काळ उपलब्ध होत असतात. यामुळे नागरिकांचा वेळही वाचतो. त्यासोबतच सरकार कार्यालयात मारावे लागणारे खेटे ही वाचतात.‌

नागरिकांना आपले विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार शुल्क आकारुन सदर दाखले उपलब्ध करून दिले जातात. मात्र, अनेकांना हे दाखले मिळवताना मोठी काटकसर करावी लागते. आपल्याला उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून काटकसर करुन पैसे जमा करावे लागतात. त्यानंतरच ईसेवा केंद्रात जाऊन दाखले मिळवावे लागतात.

त्यामुळे कोथरुडकरांची ही अडचण दूर करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत महा ईसेवा केंद्र सुरू केले असून, या उपक्रमाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना मोठा आधार मिळाला आहे.

रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

नागपूर – नागरिकांना त्रास होत असल्याने रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावीत, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना आज (गुरुवारी) केली.

अधिवेशनामध्ये लक्षवेधी मुद्द्यांद्वारे बांधकाम नियमावलीचा विषय शिरोळे यांनी मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहर हे वेगाने वाढत आहे. शहरभर दुप्पट वेगाने बांधकामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी रात्री बे रात्रीच्या वेळेस बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होत असतो. याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना आजू‌बाजूच्या नागरिकांना काही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी कोणतीही नियमावली तयार केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. तरी पुणे महानगरपालिकेस बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेतच बांधकामे करता येतात. त्या व्यतिरिक्तच्या वेळात बांधकामे करता येणार नाहीत, असे आदेश आहेत. पण, हे आदेश डावलून रात्रीच्या वेळी बांधकामे सुरू असतात. ही बाब आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप

पुणे, दि. १४ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, एनइएफटी-२०२५ साठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र असणाऱ्या ९२ विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पुणे येथे आयोजित कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक विशाल लोंढे, समाजकल्याण निरीक्षक वैभव लव्हे, महाज्योती कार्यालयाचे विभागीय समन्वयक पल्लवी कडू उपस्थित होते. यावेळी ५५ विद्यार्थ्यांना टॅबलेट व सिमकार्डचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी श्री. लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील करिअरचे क्षेत्र निवडून टॅबलेट व सिमकार्डचा वापर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक कामकाजासाठी करावा, असे सांगितले.

मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि.१४: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम बारा पोटजाती या समाजातील विद्यार्थांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना पूर्वरत सुरु करण्यात आली असून योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत देशांतर्गत शिक्षणासाठी ३० लाख रुपये आणि परदेशातील शिक्षणासाठी ४० लाख रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात व परदेशातील शिक्षणासाठी तीन लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आहे.

देशांतर्गत शिक्षणाकरीता महिलांसाठी ५.५ टक्के व पुरुषांसाठी ६ टक्के आणि परदेशातील शिक्षणाकरीता महिलासाठी ६.५ टक्के व पुरुषासाठी ७ टक्के व्याजदर आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी दहा लाखापर्यतच्या कर्जाकरीता १० वर्ष तसेच दहा लाखापेक्षा अधिक कर्जाकरीता १२ वर्षे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ६ महिने अथवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेंव्हापासून कर्ज परतफेडीची सुरुवात करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जासाठी असलेल्या अभ्यासक्रमांची यादी https://www.nsfdc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, तळमजला, ए.विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स.क्र.१०३/१०४, मेन्टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर, येरवडा, ४११ ००६ येथे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेतील नागरिक सहभागाने ओलांडला 2 कोटींचा टप्पा

0

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

विकसित भारत संकल्प यात्रेने जनतेच्या उल्लेखनीय पाठिंब्याच्या साथीने, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 2 कोटीहून अधिक सहभागींसह मोठा टप्पा गाठला आहे. सहभागातील ही अभूतपूर्व वाढ, यात्रेचा खोलवर  प्रभाव आणि विकासाच्या सामूहिक प्रयत्नात लाखो लोकांना एकत्र आणण्याची  अद्भुत  क्षमता अधोरेखित करते.

यात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून  पहिल्या एक कोटी नागरिकांच्या सहभागाचा आकडा 22 दिवसांत गाठला गेला तर पुढच्या एक कोटींना केवळ 7 दिवस लागले. प्रत्येक दिवसागणिक, यात्रेची व्याप्ती विस्तारत असून लोकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे तिची तीव्र गती कायम आहे.

ही यात्रा सुमारे 60,000 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचल्याने,  देशाच्या कानाकोपऱ्यात प्रगतीचा संदेश पोहचला आहे. अल्पावधीतच या यात्रेने आपले अस्तित्व जाणवून दिले असून 2047 पर्यंत विकसित भारतासाठी प्रयत्न करण्यासाठी 1.6 कोटींहून अधिक नागरिकांनी संकल्प केला आहे. यात्रेच्या ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, देशभरातील नागरिकांचे वैविध्यपूर्ण अनुभव आणि आकांक्षा प्रदर्शित करत, 1 कोटी 30 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सामायिक केले आहेत.

नागरिकांचे निरामय आरोग्य ही यात्रेची मुख्य संकल्पना असल्याने देशभरात आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.  या अंतर्गत आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

एक राष्ट्र, एक प्रवास

सर्व प्रदेशांमध्ये मनापासून स्वीकारली गेलेली ही यात्रा अगदी दुर्गम भागापर्यंत पोहोचत सरकारी सेवा आणि पाठबळ पोहोचवण्यासाठी थेट माध्यम म्हणून काम करत आहे. सहभागाच्या बाबतीत, उत्तर प्रदेश सुमारे 80 लाख सहभागींसह आघाडीवर आहे, त्यानंतर 29 लाखांहून अधिक सहभागींसह महाराष्ट्र आणि 23 लाखांहून अधिक सहभागींसह गुजरात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत 16 लाखांहून अधिक सहभागींनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. 11 लाखांहून अधिक सहभागींसह आंध्र प्रदेशने महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे.

सरकारी योजनांची 100% पूर्तता

सरकारच्या प्रमुख उपक्रमांची परिपूर्णता साध्य करणे आणि त्यांचे लाभ सर्व इच्छित प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करणे हा विकसित भारत संकल्प यात्रा या देशव्यापी प्रयत्नाचा उद्देश आहे.

(नवी दिल्लीतील बारा हिंदू राव येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ दरम्यान बसवलेल्या सेल्फी पॉईंटवर एक महिला छायाचित्र काढत आहे)

यात्रेदरम्यान साध्य झालेले टप्पे महत्त्वपूर्ण आहेतः 29,000 हून अधिक ग्रामपंचायतींनी आयुष्मान कार्डांच्या पूर्ण ओळखपत्रासह संपूर्ण व्याप्ती साध्य केली आहे; 18,000 हून अधिक ग्रामपंचायतींनी ‘हर घर जल’ योजनेची 100% व्याप्ती साध्य केली आहे; 34,000 हून अधिक ग्रामपंचायतींनी भू अभिलेखांचे  पूर्ण डिजिटलीकरण साध्य केले आहे; आणि स्वच्छ भारत उपक्रमाच्या समर्थनार्थ, 9,000 हून अधिक ग्रामपंचायतींनी ओ. डी. एफ. प्लस प्रारुपाच्या 100% अनुपालनासाठीच्या   निकषांची पूर्तता केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनात्मक मोहिमेची सुरुवात करत, 15 नोव्हेंबर रोजी झारखंडमधील खुंटी  येथून सुरू केलेली विकसित भारत संकल्प यात्रा, भारतभरातील नागरिकांशी सखोल संबंध दृढ करत आहे. सरकार आणि जनता यांच्यातील दरी भरून काढणे, समुदायांचे सक्षमीकरण करणे आणि सर्वसमावेशक आणि विकासात्मक भारताचा पाया रचणे हा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश आहे.