Home Blog Page 1321

होस्टेल,पेईंगगेस्ट मिळकतींना सवलती देण्याऐवजी दुप्पट कर म्हणजे सामान्यांचा आर्थिक छळवाद :आप कडून उग्र आंदोलनाचा इशारा

पुणे- होस्टेल मध्ये राहणारे,किंवा पेईंगगेस्ट म्हणून राहणारे श्रीमंत नसतात ,अनेक विद्यार्थी आणि नौकरदार जे पुण्यात घर घेऊ शकत नाहीत , लॉजेस मध्ये राहू शकत नाहीत असे सामान्य लोक वसतिगृहंचा आसरा घेतात , पेईंगगेस्ट म्हणून राहतात , अशा मिळकतींना दुप्पट मिळकत कर लावण्याची महापालिका प्रशासनाने घोषणा केली आहे. असा दुप्पट कर लावला तर तो मालक तेथे राहणाऱ्या सामान्य वर्गाच्या मासिक भाड्यात वाढ करूनच वसूल करणार आहे, अशा सामान्य माणसाच्या सोयीसुविधांना सवलती देण्याऐवजी दुप्पट कर लावून वसुलीचा इरादा करणे म्हणजे सामान्यांचा आर्थिक छळवाद आरंभणे होईल असा आरोप करत महापालिकेने आपला इरादा त्वरित बदलावा अन्यथा आप ला उग्र आंदोलन हातही घ्यावे लागेल असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे कि,’पुण्यात शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी मिळकतीत वसतिगृह, कॉट बेसिस, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा धोरणात्मक प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे.
हा प्रस्ताव म्हणजे पुण्यात शिक्षण, परीक्षा आणि नोकरी साठी येणाऱ्या लाखो बॅचलर मुलामुलींना मोठा आर्थिक फटका ठरेल. पुणे शिक्षणाचे माहेरघर असून सरकारी परीक्षा तयारीसाठी, शिकण्यासाठी लाखो मुले मुली वर्षभर तर काही तात्पुरत्या काळासाठी कॉट बेसिस, पेईंग गेस्ट, भाडेकरू अश्या स्वरूपात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अनुरूप घर घेतात. मुलींच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न म्हणूनही मुली एकत्र राहतात. खानावळ खर्च वाचवण्यासाठीसुद्धा पेईंग गेस्ट म्हणून राहतात. तर अनेक जण रोजगार कमविण्यासाठी शहरात एकटे राहतात. यात मजुरांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.
हे सर्वजण मुख्यत्वे अर्थिक दृष्ट्या मध्यम व कनिष्ठ वर्गातील असतात. त्या घराना बिगर निवासी, व्यवसायिक आकारणी केल्यास घरमालक भाडेवाढ करतील व तो बोजा विद्यार्थ्यावर पडेल. बऱ्याचदा कॉलेज ला सुट्ट्या असताना भाडे मिळत नाही. ही सर्व वस्तुस्थिती पाहता या मिळकती बिगर निवासी ठरवून त्यांना व्यवसायिक ठरवणे अयोग्य आहे असे आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

मनपा मध्ये लोकप्रतिनिधी नसताना असा निर्णय प्रशासनाने घेवू नये. तसेच मोठे थकबाकीदार, सवलतीचा फायदा घेणारे मोठे व्यावसायिक, नोंद न झालेले मिळकतदार, सर्व्हिस अपार्टमेंट देणारे हॉटेल व्यवसायिक, मोठी व्यवसायिक वसतिगृह याबाबत कार्यवाही न करता छोट्या मिळकतदारास वेठीस धरू नये अशी मागणी सुदर्शन जगदाळे, अध्यक्ष आप पुणे यांनी केली आहे.

१८ वर्षाच्या WANTED आरोपीवर घरफोड्यांचे गुन्हे दाखल १७ ..

पुणे- महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या १८ वर्षीय आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ने अटक केली आहे या आरोपीने एकूण १७ गुन्हे केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि,’हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.१८४२/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४,४५७,३८० या गुन्हयाचा तपास युनिट-६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७ नितिन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हंसराज रणजितसिंग टाक याने केलेला असून तो कॅनॉल रोड, हडपसर, पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर रजनीश निर्मल, यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने हंजराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याने केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे गेलो असता आरोपीने सोन्याचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून एकुण ०६,१०,५००/- रु. किं. चे १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये खालील पो. स्टे कडील गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) हडपसर पोस्टे १८४२/२०२३ भादवि ३८०,४५४,४५७
२) लोणी काळभोर पो.स्टे ५९९/२३ भादंवि ४५४ ३८०
३) लोणी काळभोर पो.स्टे ७३१/२०२३ भादवि ४५४, ४५७,३८०
४) कोंढवा पो.स्टे १२५७/२०२३ भादवि ४५७,३८०
५) कोंढवा पो.स्टे गु.र.नं. १२०५/२०२३ भादवि ४५४,३८०
६) लोणीकंद पो.स्टे ४५९/२०२३ भादवि ४५४ ३८०
७) लोणीकंद पो.स्टे ६५१/२०२३ भादंवि ४५४ ३८०
आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो.स्टे. चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
१) कोतवाली पो.स्टे. अहमदनगर गु.र.नं. ११७९/२०२३ भा.द.वि.क.३९५,३८०,४५७
२) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.७३०/२०२३ भा.द.वि.क. ३९५,३९२,३४ आर्म अॅक्ट ३,४(२५)
३) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२२/२०२३ भा.द.वि.क.३८०,४५७ ४) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२९/२०२३ भा.द.वि.३५३
५) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७३२/२०२३ भा.द.वि.क.३७९
६) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.३८७/२०२३ भा.द.वि.क.३७९

(७) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.३८९/२०२३भा.द.वि.क.३७९
८) फौजदारी चावडी पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ६०५/२०२३ भा.द.वि.क.३७९
९) वळसंग पो.स्टे. सोलापुर ग्रामीण गु.र.नं. ४३९/२०२३ भा.द.वि.क ४५७,३८०
१०) हडपसर पो.स्टे गु.र.नं.१३४५/२०२३ भा.द.वि.क.३९५,३९७,५०४, ५०६ आर्म ऍक्ट ३(२५)
नमूद गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर रजनीश निर्मल, यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

दक्षिण पुण्यात गुन्हेगारीचे साम्राज्य ? आपचा सवाल

आपच्या कार्यकर्त्यावर जीव घेणा हल्ला

पुणे- आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दक्षिण पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधून चिंता व्यक्त करत पुण्याचे दक्षिण प्रवेश द्वार गुन्हेगारीचे द्वार बनू देऊ नका असे आवाहन केले आहे. अवैध धंद्यांच्या समवेत बाल गुन्हेगारीने हा परिसर व्यापला असताना आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हि गुन्हेगारीची झळ पोहोचू लागली आहे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यावर वारंवार हल्ले होत असून रविवार सायंकाळी 7:15 वाजता सच्चाईमातानगर ,कात्रज पुष्पादेवी दुगड शाळे शेजारी जागडे पिठाची गिरण शेजारी आप कार्यकर्ते प्रा. ताठे व त्यांच्या कुटुंबीयांवर दहा ते बारा जणांनी जीव घेणा हल्ला केला. त्यात ते व त्यांचे दोनं बंधू हे जबर जखमी झाले होते. तरी त्यांनी जखमी अवस्थेत असताना भारती विद्यापीठ परिसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. मारणारे आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. या अगोदर पण येथील राहिवाश्यांना धमकी तसेच मारण्याचे प्रकार घडले असून भीतीपोटी नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.असे किर्दत यांनी म्हटले आहे .

ते पुढे म्हणाले,’सदर हल्ल्यात त्यांना तसेच त्यांच्या मोठ्या भावाला गंभीर दुखापत झाली असून परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व नागरिकांनी आपली घरे दार बंद करून घेतली होती. तरी गुन्ह्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन धनकवडी येथे देण्यात आली आहे व आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरी आप पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताठे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन परिसरातील नागरिकांशी चर्चा केली तसेच पक्ष्याच्या वतीने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना सदरील ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थापण टिकवण्यासाठी तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले आणि परिसरातील बंद असलेली पोलीस चौकी लवकरात लवकर चालू करावी याचे निवेदन परिसरातील जवळपास १०० नागरिकआणि आप पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे , प्रवक्ते मुकुंद किर्दत, निलेश वांजळे, दत्तात्रय कदम, ॲड प्रदीप माने ,ॲड.महादेव कापरे, प्रशांत कांबळे ,सूरेखाताई भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, सुनीता काळे,योगेश देशमुख, अविनाश पवार , तगदसिंहजी, विशाल डोंबळे, नौशाद अंसारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे केले उद्घाटन

0

सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे, शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.  यावेळी पंतप्रधानांनी नवीन टर्मिनल इमारतीची फिरून प्रत्यक्ष पाहणी देखील केली.

या संदर्भात पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवासाचा आनंद अनुभवतानाच यामुळे  आर्थिक विकास, पर्यटन आणि दळणवळणालाही चालना मिळणार आहे.”

यावेळी पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

पार्श्वभूमी

ही नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळी 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वर्दळ हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. या इमारतीची महत्त्वाच्या गर्दीच्या वेळेची क्षमता 3000 प्रवाशांपर्यंत वाढवून वार्षिक हाताळणी क्षमता 55 लाख प्रवाशांपर्यंत नेण्याची तरतूद आहे. ही नवी टर्मिनल बिल्डिंग, सुरत शहराचे प्रवेशद्वार असल्याने, इथली स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही इमारत निर्माण करण्यात आली आहे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील  बाजूला दोन्ही ठिकाणी येथील संस्कृती प्रतिबिंब व्हावी जेणेकरून अभ्यागतांमध्ये या स्थानाविषयी कुतुहलाची भावना निर्माण होईल याकडे लक्ष पुरवण्यात   आले आहे. सुरत शहराच्या रांदेर भागातील जुन्या वास्तूंप्रमाणे पारंपरिक आणि समृध्द  लाकडी कलाकुसर केलेल्या दर्शनी भागापासूनच  नवी सुधारित विमानतळ वास्तू प्रवाशांना संपन्न अनुभव देण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. ‘गृह-चार (GRIHA IV)’ अटींची पूर्तता करणारी नवी विमानतळ वास्तू विविध शाश्वत संतुलित वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये दुहेरी उष्णतारोधक छत, ऊर्जाबचत मंडप, कमीत कमी उष्णता शोषणारी दुहेरी चकचकीत आवरणाची एकके, पर्जन्यजलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे संयंत्र आणि सौर ऊर्जा निर्मिती- अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

छापा काटा:सिनेरिव्ह्यू

निर्माता : सुशीलकुमार अग्रवाल

अभिनेता:मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, तेजस्विनी लोणारी, रीना मधुकर, ऋतुराज फडके, पंकज विष्णु
दिग्दर्शक : संदीप नवरे
लेखन : संदीप नवरे, प्रकाश भागवत
संकलक : मीनल म्हादनाक
छायाचित्रण : गौरव पोंक्षे
प्रकार/शैली: (विनोदी – कौटुंबिक नाट्य )Comedy, Drama
कालावधी:2 Hrs 24 Min

क्रिटिक रेटिंग
३.५/५

मकरंद अनासपुरे म्हणजे पोटभरून हसण्याची १०० टक्की खात्री. त्याच्या कायद्याच बोला, गाढवाचं लग्न, जाऊ तिथं खाऊ, गल्लींत गोंधळ, दिल्लीत मुजरा, गुलदस्ता, दे धक्का, सगळं करून भागलं अशी उलाढाल आपण पाहून मनमुराद हसलो आहोत. अशीच खसखर पिकवणारा त्याचा छापा काटा हा नवाकोरा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. ‘मेलोड्रामा’नं खच्चून भरलेलं कथानक असलेल्या हा धम्माल विनोदी चित्रपट मकरंदच्या टिपिकल पठडीतला असल्याने निखळ मनोरंजन अपेक्षित असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी ‘छापा काटा’ हा अलीकडच्या मराठी सिनेमांहून काहीसा वेगळा म्हणता येईल. टिपिकल टाळी घेणारी वाक्यं, मिश्किल आणि खुसखुशीत संवाद, तगड्या कलाकारांची जुगलबंदी, मोनोलॉग आणि उत्कंठावर्धक क्लायमॅक्सनंतर होणारं ‘हॅपी एंडिंग’… असा रंगारंग माहोल लेखक – दिग्दर्शक संदीप मनोहर नवरे यांनी पडद्यावर रंगवला आहे. चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा उठावदार झाल्या असून त्यातील कलाकारांनी आपापली पात्र तन्मयतेनं साकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. पात्रांच्या वर्तनानं पेच निर्माण होतात आणि केवळ वास्तविक दर्शन एवढाच हेतू न ठेवल्यामुळे हा सिनेमा निर्माण झालेल्या पेचांवर आपल्या परीनं उपायही सुचवतो. प्रसंगी पटकथेत तणाव निर्माण करत आणि मेलोड्रामा घडवत लेखक त्यामध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

सिनेमाचा नायक नामदेव उर्फ नाम्या (मकरंद अनासपुरे) लग्नाचं वय उलटून गेलेला अविवाहित आहे. त्याला तीन लहान बहिणी. वडिलांच्या पश्चात मोठ्या भावाचं कर्तव्य बजावत त्यानं दोन बहिणींच लग्न लावून दिलं आहे. आता घरातील शेंडेफळ असलेल्या अर्चनाचं (रीना मधुकर) लग्न व्हायचं बाकी आहे. तिच्या लग्नासाठीच नाम्या ‘नाटक’ रंगवतो. त्याचं झालंय असं की, प्रेमविवाह करू पाहणाऱ्या अर्चनाच्या होणाऱ्या सासऱ्यांना त्यांची सून ही श्रीमंतांच्या घरची हवी आहे. पण, आपला नाम्या मात्र विविध विमा, स्किम, योजना विकणारा एजंट. गोडीगुलाबीनं तो एकेकाला आपल्या विम्याच्या जाळ्यात ओढत असतो आणि घर चालवत असतो. पाहुण्यांना आपण गर्भश्रीमंत आहोत असं दाखवण्यासाठी नाम्या खोटं नाटक उभं करतो.

दुसरीकडे सिनेमाच्या समांतर ट्रॅकवर आणखी एक ‘नाटक’ सुरू असतं. या नाटकातही नाम्या मध्यवर्ती भूमिकेतच असतो. नाम्या आणि शनायाचं (तेजस्विनी लोणारी) ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ होतं. कारण, शनायाला तिच्या आजोबांची (मोहन जोशी) कोट्यवधी रुपयांची संपत्ती हवी असते. संपत्ती मिळवण्यासाठी तीसुद्धा नाम्यासोबत एक ‘नाटक’ उभं करते. आता सिनेमात एकाच वेळी दोन वेगवेगळी कथानकं असलेली समांतर दुहेरी-नाट्य सुरू असतात. आत हे ‘नाटक’ खरंच सुफळ-संपूर्ण होतं का? याचं उत्तर तुम्हाला सिनेमा बघूनच मिळेल. एकीकडे नाम्याचं गर्भश्रीमंत असल्याचं नाट्य आणि दुसरीकडे शनयाचं संपत्ती बळकावण्याचं नाट्य. दोन्हीकडे बरीच रंजक वळणं येतात. पडद्यावरील कलाकारांची जुगलबंदी लक्ष वेधून घेते. मामाच्या भूमिकेत असलेले विजय पाटकर त्यांच्या शैलीत प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाले आहेत.

कथानकातील गोंधळ, घोटाळे आणि लपवाछपवीचा खेळ हे सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. लेखक-दिग्दर्शकानं सिनेमातील प्रत्येक पात्र फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच कलाकारांना आवश्यक तो मोकळेपणाही दिल्याचं जाणवतं. अनेक प्रसंग मजेशीर झाले असल्याने पडद्यावर हे ‘नाट्य’ पाहण्यात मजा येते. विनोदाचं अचूक टायमिंग आणि सेन्स असलेल्या कलाकारांमुळे संपूर्ण सिनेमा मेरी-गो-राऊंडप्रमाणे म्हणजे जत्रेतल्या आकाशपाळण्यासारखा फिरतो. बघण्याच्या टिपिकल कार्यक्रमापासून ते लग्न होण्यापर्यंतच्या घटनांची साखळी दृश्यं प्रेक्षकांना अनुभवता येतात. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चांगली निभावली आहे. हा सिनेमा मकरंदच्या टिपिकल विनोदी मराठी सिनेमांच्या बाजासारखा आहे. सिनेमा तांत्रिक पातळीवर साधा-सरळ असून या सिनेमाचं शीर्षक ‘छापा काटा’ असं असण्याचं गुपित नाम्याच्या खिशात लपलेलं आहे. पोटभरून हसायला लावणारे हे नाणे हवेत उडवून तुम्ही हा ‘सिनेमा’ पाहायचा की नाही? हे ठरवू शकता.

  • SHARAD LONKAR

अण्णा हजारे 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ते झोपलेले – भास्कर जाधव

मुंबई-लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ठाकरे सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, कायदा केला नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत अण्णांना आता ठाकरे दिसले का? असा सवाल उपस्थित केला आहे.दरम्यान भास्कर जाधव पुढे बोलताना म्हणाले की, अण्णा कधी जागे झाले? 2014 साली भाजपाचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना विचारला आहे.

या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांच्यावर पलटवार केला आहे. अण्णा कधी जागे झाले? 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांना विचारला आहे. आता लोकायुक्त कायदा विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. हा क्रांतीकारण निर्णय आहे. फक्त नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे. वेळ पडली तर 88 व्या वर्षी हा कायदा समजवण्यासाठी महाराष्ट्रात फिरेन. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण केला पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, हा कायदा केला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. देवेंद्र फडणवीसांनी कायदा करण्यास वेळ घेतला. मात्र, कायदा केला, असेही अण्णा हजारे म्हणाले होते. त्यावर भास्कर जाधव यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. फडणवीस प्रत्येक समाजाला खोटे आश्वासन देत आहेत. धनगर समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळ म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला एका कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य अनेकदा केले. पण आजपर्यंत दिले का.? 2014 च्या निवडणुकीत आमचे सरकार आले तर विदर्भ वेगळा करू. त्याशिवाय मी लग्न करणार नाही असे म्हणाले होते. लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहित आहेत. असा टोला भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शेकडो भक्तांचा घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तचरणी मंत्रघोष

दत्तजयंती उत्सवानिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन

पुणे : सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. नर्मदे हर हर… च्या निनादात तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी प्रत्येक भाविक मनोभावे नतमस्तक होत होता.
दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, इंदौर येथील योगाभ्यानंद माधवनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त संजय नामजोशी, त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरि मुस्तिकर, नागपूर शाखेचे राजीव हिंगवे व मुंबई शाखेचे आण्णा वडनेरकर आदी उपस्थित होते.

तसेच अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे व्यासपीठावर उपस्थित होते. दत्तमंदिर उत्सवाचे यंदा १२६ वे वर्ष असून दत्तजयंती उत्सवाचा प्रारंभ स्तोत्र पठणाने झाला. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, समाजातील कष्ट दूर होऊन सुख संपन्नात मिळविण्याकरिता केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामुहिकपणे भाविक एकत्र येतात, हे कौतुकास्पद आहे. श्री दत्त गुरु सगळ्यांना मार्ग दाखवितात. आता देशभरात निवडणूका येत आहेत, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चांगले असेल तेच होवो, अशी प्रार्थना देखील त्यांनी दत्त महाराजांच्या चरणी केली.

प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, मनोजैविक व्याधींकरीता उपचार करणे, हे लोकमंगल स्तोत्राच्या पाठातून सहज शक्य आहे. याचा परिणाम पर्यावरण, माणूस, समाजमनावर होतो. सगळ्या दत्तक्षेत्रांमध्ये या स्तोत्राचे पठण होते. समाज मनाचे आरोग्य आजच्या काळात महत्वाचे आहे. मनाचे आरोग्य स्थिर ठेवण्याकरिता हे स्तोत्र आवश्यक आहे. अनेक भाविक मनोभावे दत्त महाराजांकडे प्रार्थना करतात. आज लोकांचे दु:ख, कष्ट, विवंचना दूर करणारे हे स्तोत्र म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने दत्तमहाराजांना नमन केले आहे.

युवराज गाडवे म्हणाले, घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव आढळतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.रजनी उकरंडे यांनी आभार मानले.

उत्सवांतर्गत मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत भजन आणि सायंकाळी ५ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट:9 जणांचा मृत्यू

0

नागपुर-एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत.या वर्षी ऑगस्टमध्येही या कंपनीला आग लागली होती. त्यावेळी कचऱ्यात स्फोट झाला त्यात दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.या घटनेला पाच महिनेही उलटले नव्हते इतक्यात रविवारी मोठा स्फोट झाला.

सोलर ग्रुपद्वारे चालवले जाणारी इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड ही कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादकांपैकी एक आहे. सध्या येथे भारतीय लष्कर आणि नौदलासाठी विविध शस्त्रे तयार केली जातात. तसेच या कंपनीच्या माध्यमातून भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रे निर्यात केली जातात.

रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात हा स्फोट झाला. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट झाला आहे.

या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. तर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले आहे.

देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चांगलं असेल ते घडावं; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना

घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून शेकडो भक्तांचा श्री दत्तचरणी मंत्रघोष

पुणे दि.१७: विधिमंडळातील भाषण ऐकून नेहमीच प्रभावित व्हायचे मात्र कष्ट दूर करणे, त्याचबरोबर सुखद संपन्नता मिळणं, मनाला स्वास्थ्य मिळणं या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आत्ताच्या काळामध्ये एवढे भाविक एकत्र येतात आणि स्तोत्र म्हणतात हे पाहून मन प्रभावित झाले आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे काही चांगलं असेल ते घडावं अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रार्थना केली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्त मंदिरा समोरील उत्सव मंडपात दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभा निमित्ताने करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घोरात्कष्टात मंत्र पठणातून सर्वांचे मंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज या कार्यक्रमानिमित्ताने प पू तराणेकर गुरुजींशी परिचय झाला असला तरी इंदोरशी आमच्या घराण्याचे पूर्वीपासूनचे एक नात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉ. गोऱ्हे यांचे आजोबा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते ते माधवनाथ महाराजांचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे घरामध्ये आजतागायत गेली शंभर वर्ष तरी सातत्याने दर गुरुवारी दत्ताची आरती आणि उपासना होत असते. अगदी अधिवेशन असले तरी त्याचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. दत्तगुरु महाराजच आपल्याला सगळा मार्ग दाखवतात त्यांच्यावर आपला विश्वास आहे, ठाम खात्री आहे आणि त्यामुळे जे आम्हाला विरोध करतात त्यांना पण दत्तगुरु कधी ना कधी चांगली सद्बुद्धी देतील अशी खात्री देखील डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

दत्त मंदिर विश्वस्त मंडळाने शासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यापूर्ण करण्याबद्दल सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा!२२ जानेवारीच्या उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी करावी

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुणे-भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्या जबाबदारी आणि अपेक्षांचे योग्यप्रकारे निर्वाहन करावे; असा कानमंत्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच आगामी २२ जानेवारी हा सर्वांसाठी आनंदोत्सवचा दिवस आहे. त्यामुळे या आनंदोत्सवची सर्व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्ष कोथरुड मंडल कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप आणि कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, खडकवासला मंडल अध्यक्ष गणेश वर्पे, भाजपा नेते सुशील मेंगडे, कोथरुड मंडल समन्वयक गिरीश भेलके, निवडणूक प्रमुख नवनाथ जाधव, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, प्रा. अनुराधा एडके, श्रीधर मोहोळ, सचिन पवार, उत्तर मंडलाच्या शरद भोते, सचिन दळवी, उमाताई गाडगीळ, विवेक मेथा, मोरेश्वर बालवडकर, काळुराम गायकवाड, कोथरुड मंडल महिला मोर्चा प्रभारी आणि मंडल सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, दक्षिणच्या महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे, उत्तरच्या अस्मिता करंदीकर, दक्षिणचे युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, उत्तरचे रोहन कोकाटे यांच्या सह नगरसेवक, शहर आणि मंडचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नाही, तर सामाजिक संघटना म्हणून काम करते. त्यामुळे पक्षाचे पद हे केवळ पद नसून जबाबदारी आणि अपेक्षा आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. तसेच संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही पक्षाची रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील ही जबाबदारी आणि अपेक्षा योग्य पद्धतीने पार पाडाव्यात. त्यासाठी आवश्यक सर्वती ताकद पक्षाकडून दिली जाईल.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पक्षाचे संघटन वाढीसाठी आणि बूथ सक्षमीकरणासाठी सुपर वॉरियर्स ही संकल्पना राबविली आहे. माझ्याकडे ही या अनुषंगाने बूथची जबाबदारी असून, मी देखील यात सक्रीय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील बूथ सशक्तीकरणावर भर दिला पाहिजे असे आवाहन केले.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्ण होऊन २२ जानेवारी रोजी रामचंद्रांची प्रतिष्ठापना होणार आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या आनंदोत्सवसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. त्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी करावी अशी सूचना केली.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताना येणारी जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते. मला खात्री आहे; नवनियुक्त पदाधिकारी निश्चितपणे पूर्ण क्षमतेने, निष्ठेने पक्ष बांधणी आणि वाढीसाठी कार्यरत असतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप बुटाला यांनी केले. कोथरुड मंडल उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा एडके यांनी केले.

पिंपरी चिंचवड येथे होणार सामाजिक सलोखा आरक्षण परिषद …

सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे (दि.१७ डिसेंबर २०२३) महाराष्ट्रात विविध समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने, उपोषण करीत आहेत. तसेच सरकार दरबारी निवेदने देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री वेळ मारून नेण्यासाठी सरकारच्या वतीने आश्वासने देत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरक्षण प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे. त्यामुळे जाती जातीत दुरावा आणि संभ्रम निर्माण होत आहे. महागाई, पाऊस पाणी, बेरोजगारी या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक तणावात आणि त्रस्त आहेत. समतेचा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रात या परिस्थितीत सामाजिक सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. सर्व समाजास न्याय मिळावा कुणावरही अन्याय होऊ नये सर्वांच्या मागण्या, अडचणी समजून घ्याव्यात. सर्व जाती जातीमध्ये, धर्मांमध्ये सलोखा, सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे. यासाठी पिंपरी चिंचवड शहरात
सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेचे लवकरच आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शनिवारी (दि.१६) झालेल्या बैठकीत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. यावेळी मानव कांबळे, प्रकाश जाधव, सतिश काळे, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, देवेंद्र तायडे, मारुती भापकर, के. डी. वाघमारे, गुलामभाई शेख, विशाल जाधव, विश्वनाथ जगताप, प्रदीप पवार, पांडूरंग परचंडराव, प्रकाश बाबर, बी. बी. शिंदे, रावसाहेब गंगाधरे, किरण खोत, शितल घरत, सुनीता शिंदे, अशोक सातपुते, चंद्रशेखर कणसे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, संदीप मुटकुळे, ब्रम्हानंद जाधव, राहुल मदने, संतोष कदम, सुरेश भिसे, रजनीकांत क्षिरसागर आदी उपस्थित होते.
नियोजित सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेत एससी, एसटी, ओबीसी, मराठा, मुस्लिम, धनगर, समाजाचे वक्ते आप आपल्या समाजाच्या आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सिरवी समाजाच्या वतीने श्रीराम पूजा मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

पुणे (दि.१७ डिसेंबर २०२३) आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील सिरवी समाजाच्या वतीने आई माता मंदिर परिसरातून श्रीराम पूजा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत रथावर आरूढ झालेले बाल श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. झांज, ढोल ताशे वाजवत आबालवृद्धांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिला भाविक पारंपरिक वेषात आणि श्रीरामाची प्रतिमा हातात घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते.
अयोध्येत ४९५ वर्षांनी २२ जानेवारी २०२४ ला श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशासह महाराष्ट्रात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलश दर्शनासाठी आला आहे. मंगल अक्षता कलशातील अक्षतांचे वाटप १ ते १५ जानेवारी दरम्यान घरोघरी करण्यात येणार असून २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिनी सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या देव्हाऱ्यातील देवांवर अक्षता वाहून पूजा करून श्रीरामाचा नाम जप करावा असे आवाहन सिरवी समाज आईमाता मंदिर प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहनलाल अगलेचा यांनी केले आले.
मंगल अक्षता कलशाचे आईमाता मंदिरात आगमन झाल्यानंतर विधीवत पूजन करून महाआरती करण्यात आली.शोभायात्रेचे नियोजन आणि कलशाचे पूजन सिरवी समाज आईमाता मंदिर प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहनलाल अगलेचा, सचिव रामलालजी लचेटा, माजी अध्यक्ष तेजाराम लचेटा, युवा अध्यक्ष प्रकाश सोलंकी, महिला अध्यक्ष धापूबाई काग, महिला सचिव अनिता जगदीश, लीला परमार यांनी केले होते.

पंतप्रधानांनी सूरत हिरे बाजाराचे केले उद्घाटन,15 मजले असलेले 9 टॉवर, ही सर्वात मोठी इंटरकनेक्टेड बिल्डिंग

0

यूएस डिफेन्स हेडक्वार्टर पेंटागॉनपेक्षा ही सर्वात मोठी एकमेकांशी जोडलेली आणि ऑफिसची इमारत आहे. त्याची 4500 हून अधिक कार्यालये आहेत. तत्पूर्वी, पीएम मोदींनी सुरत विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटन केले आणि रोड शो देखील केला.सुरत डायमंड बाजार 3,500 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू झाले. त्याचे काम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झाले. SDB ची स्थापना सूरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हीसाठी एक-स्टॉप हब म्हणून केली आहे. सुरत जगातील 92% नैसर्गिक हिरे बनवते.

सुरत– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सूरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली, सुरत  हिरे बाजार आणि स्पाइन-4 च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी देखील केली. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.

सुरत हिरे बाजार उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी हा बाजार म्हणजे सूरत शहराच्या वैभवात नवा हिरा बसवला  गेला अशी टिप्पणी केली.  “हा सामान्य हिरा नसून जगातील सर्वश्रेष्ठ हिरा आहे”, असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, सूरत हिरे बाजाराची चमक जगातील सर्वात मोठ्या वास्तूंना दिपवून टाकत  आहे. या बाजाराचे श्रेय पंतप्रधानांनी वल्लभभाई लखानी आणि लालजीभाई पटेल यांच्या नम्रतेला आणि एवढ्या मोठ्या मिशनच्या यशासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भावनेला दिले. पंतप्रधानांनी याप्रसंगी सूरत हिरे बाजाराच्या यशासाठी झटणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.  “जगातील हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीच्या चर्चेत भारतातील सूरत हिरे बाजाराचे नाव अभिमानाने घेतले जाईल”, हे त्यांनी अधोरेखित केले.  “सुरत हिरे बाजार भारतीय कलाकुसर, कारागीर, साहित्य आणि संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  ही इमारत नवीन भारताच्या क्षमता आणि संकल्पांचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.  सूरत हिरे बाजाराच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिरे उद्योग, सुरत, गुजरात आणि भारतातील लोकांचे अभिनंदन केले.  पंतप्रधानांनी आज सकाळी सूरत हिरे  बाजार इमारतीला दिलेली भेट आठवून या इमारतीच्या स्थापत्य कलेवर प्रकाश टाकत हरित इमारतीचा उल्लेख केला. ही इमारत जगभरातील पर्यावरण समर्थकांसाठी एक उदाहरण बनू शकते तसेच इमारतीची एकूण वास्तुकला विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी शिकण्यासाठी एक साधन म्हणून उपयोगी ठरु शकते असे पंतप्रधानांनी या इमारती संदर्भात बोलताना सांगितले. पंचतत्व उद्यानाचा उपयोग लँडस्केपिंगचे आदर्श उदाहरण म्हणून केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

सुरतला मिळालेल्या इतर दोन भेटवस्तूंबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सुरत येथे नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुरत विमानतळाचा दर्जा उंचावण्याचा उल्लेख केला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीची  पूर्तता झाल्यामुळे सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पंतप्रधानांचा सन्मान केला.  सुरत दुबई विमान सेवा सुरू झाल्याची तर हॉंगकॉंगसाठी लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  “सुरतसह, गुजरातमध्ये आता तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत”, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनचे सुरत शहराशी असलेले वैयक्तिक संबंध आणि शिकण्याची संधी देणाऱ्या   अनुभवांवर प्रकाश टाकताना त्यांनी सबका साथ सबका प्रयास या भावनेचा उल्लेख केला.  “सुरतची माती इतरा शहरांपेक्षा वेगळी आहे” असे ते म्हणाले. या प्रदेशात उत्पादीत कापसाची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.  सुरतच्या आजवरच्या प्रवासातील चढ-उतारावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, ब्रिटिश जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हा सुरतच्या भव्यतेने त्यांना आकर्षित केले.  सुरत हे जगातील सर्वात मोठे जहाज बांधणीचे केंद्र होते आणि सुरतच्या बंदरावर 84 देशांच्या जहाजांचे झेंडे फडकत असत, त्या काळाची पंतप्रधानांनी आठवण करून दिली.  “आता, ही संख्या 125 पर्यंत वाढेल”, असे ते म्हणाले.  शहराला भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी आरोग्यविषयक गंभीर समस्या आणि पूर यांचा उल्लेख केला तसेच शहराच्या स्फूर्तीवर कसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते याची आठवण करून दिली.  आजच्या प्रसंगाची दखल घेत पंतप्रधानांनी आत्मविश्वास व्यक्त केला आणि सूरत हे जगातील सर्वोत्कृष्ट 10 वाढत्या शहरांपैकी एक बनल्याचे सांगितले. त्यांनी सुरतची उत्कृष्ट खाऊ गल्ली, स्वच्छता आणि कौशल्य विकासावर प्रकाश टाकला.  पूर्वी सन सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरतने येथील लोकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने स्वतःचे डायमंड सिटी, सिल्क सिटी आणि ब्रिज सिटीमध्ये रूपांतर केले आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  “आज लाखो तरुणांसाठी सुरत हे ड्रीम सिटी म्हणजे स्वप्न पूर्ण करणारे शहर बनले आहे”, असे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरतच्या वाटचालीचीही त्यांनी नोंद घेतली.  सुरतसारख्या आधुनिक शहराला हिरे बाजाराच्या  रूपात एवढी भव्य इमारत मिळणे हा एक  ऐतिहासिक क्षण आहे, असे  पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, “मोदींनी दिलेली हमी ही सुरतमधील जनतेच्या दीर्घकालीन परिचयाची आहे.” ते म्हणाले की हिरे बाजार हे सुरतच्या लोकांसाठी मोदींच्या हमीचे उदाहरण आहे. हिरे व्यापारातील लोकांशी केलेली चर्चा, दिल्लीत 2014 मध्ये झालेली जागतिक हिरे परिषद व या परिषदेतील हिरे व्यापारासाठी क्षेत्र अधिसूचित करण्याची घोषणा आणि त्यातून सुरतेत साकारलेला मोठा, एकछत्री हिरे बाजार या प्रवासाच्या स्मृतींना पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. “पारंपरिक हिरे व्यावसायिक, कारागिर आणि व्यापारी या सर्वांसाठी सुरत हिरे बाजार हे वन स्टॉप केंद्र ठरला आहे, ” असे पंतप्रधान म्हणाले. या बाजारात आंतरराष्ट्रीय बँकिंग, सुरक्षित तिजोऱ्या, दागदागिन्यांचा मॉल या सुविधा उपलब्ध होणार असून त्यातून 1.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

सुरतेच्या सक्षमतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या अर्थव्यवस्थेने जगात 10 व्या क्रमांकावरून 5 वा क्रमांक गाठल्याचा उल्लेख केला. ही अर्थव्यवस्था मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात  तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, ही मोदींची हमी असल्याचे ते म्हणाले. आपल्या सरकारकडे पुढच्या 25 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलिअन डॉलर व त्यानंतर 10 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा आराखडा तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

निर्यातवाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या हिरे व्यापाराची यात मोठी भूमिका असेल. हिरे व्यापारातील मातब्बर व्यक्तींनी  सुरतहून देशाची निर्यात वाढवण्याच्या शक्याशक्यता आजमावून पाहाव्यात. भारत सध्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत अग्रणी आहे, सिल्वर कट हिरे आणि प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीसह देशाचा मौल्यवान खडे, दागिन्यांच्या निर्यातीतील वाटा फक्त 3.5% आहे. “मात्र सुरत ने ठरवले तर हा वाटा दोन अंकी संख्येवर जाईल,” असे सांगत सरकारच्या पाठबळाचा त्यांनी पुनरुच्चार केला. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हे क्षेत्र प्राधान्याचे म्हणून घोषित करणे, नक्षीसाठी पेटंटला प्रोत्साहन, निर्यातक्षम उत्पादनांमध्ये विविधता आणणे, चांगल्या तंत्रज्ञानासाठी सहकार्य, प्रयोगशाळेत हिरे उत्पादनाला, ग्रीन डायमंडला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी आदी उपाययोजना करण्याचा मानस असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगाच्या भारताकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा आणि ‘मेक इन इंडिया’ ब्रँडची वाढती लोकप्रियता यांचा हिरे क्षेत्राला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरतच्या  क्षमता  वाढवण्यासाठी  शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकार भर देत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे आणि हजिरा बंदरासह सुरतमधील बंदरे, खोल पाण्यातील एलएनजी टर्मिनल आणि बहुद्देशीय मालवाहतुकीसाठी बंदर यांनी सुरतला अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रांशी जोडले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जगातल्या मोजक्याच शहरांना अशी आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हिटी असल्याचे त्यांनी सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्प आणि  वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे सुरु असलेले काम यामुळे सुरतची उत्तर आणि पूर्व भारताशीही असलेली जोडणी अधिक दृढ होईल, दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गामुळे सुरतमध्ये व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, या सर्वांचा शहरवासियांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सुरतेच्या प्रगतीमुळे गुजरातची प्रगती शक्य होईल व पर्यायाने देशाचीही प्रगती होईल, असे सांगून पंतप्रधानांनी पुढच्या महिन्यात नियोजित ‘वायब्रंट गुजरात शिखर परिषदे’साठी शुभेच्छा दिल्या.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय व पुरषोत्तम रुपाला, केंद्रीय राज्य मंत्री दर्शना जरदोश, खासदार सी. आर. पाटील, सुरत हिरे बाजाराचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी, धर्मानंदन डायमंड लि.चे लालजीभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अधिक माहिती

सुरत हिरे बाजार हे जगातील अत्याधुनिक व सर्वात मोठे हिरे व दागिने व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र असेल. पॉलिश केलेले आणि न केलेले हिरे आणि आभूषणे व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल. इथे आयात व निर्यातीसाठी सीमाशुल्क विभागाचे कार्यालय, किरकोळ व्यवहारांसाठी दागिने मॉल व आंतरराष्ट्रीय बँकिंग, सुरक्षित तिजोऱ्यांची सुविधा यांचा समावेश असेल

हृदयरुपी समुद्राच्या मंथनातून निघेल अमृतकलश -कवी डॉ. कुमार विश्वास 

 पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी उद्बोधन 

पुणे : आपण पूजा करतो, परमेश्वराची प्रार्थना करतो, ती प्रत्येकाने मनापासून करायला हवी. जेवढी मनापासून प्रार्थना करू, त्यापेशा जास्त श्रद्धेने ईश्वर आपला स्वीकार करेल. समुद्रमंथानातून १४ रत्ने निघाली ही आपली आस्था आहे. जशी समुद्राची खोली काळात नाही, तशी ह्रदयाची खोली देखील कळत नाही. त्यामुळे आपण या ह्रदयरुपी समुद्राचे मंथन करत राहायला हवे, त्यातून शेवटी नक्कीच अमृतकलश प्राप्त होईल, अशी आशा प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी पुणेकरांशी बोलताना व्यक्त केली. 

पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे  ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले आहे. त्याच्या दुस-या  दिवशी (शनिवार, दि.१६ डिसेंबर) डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते. 

श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, रामा रामा रटते रटते…बिती रे उमरिया, जो सुख पायो राम भजन मै, बोलो जय हनुमान यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. 

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, समुद्रमंथनाच्या सुरुवातीला ‘विष’ बाहेर आले. त्याप्रमाणे आजच्या काळात सुरुवातीला प्रत्येकाला विषरुपी अपमानाला सामोरे जावे लागते. त्यानंतरच आपल्याला प्रतिभारूपी गाय म्हणजे ‘कामधेनू’ प्राप्त होते. त्यानंतर हळूहळू आपल्या संकल्पाना गती देणारा ‘उच्चैश्रवा’हा घोडा मिळतो. त्यावर बसून संघर्ष करणा-या आणि दृष्ट्या भावाने जगाकडे पाहणा-या व्यक्तीस ‘ऐरावत’ हत्ती मिळतो. 

ते पुढे म्हणाले, अशा यशस्वीतेच्या हत्तीवर बसून मार्गक्रमण करताना जग आपल्या कपाळावर ‘कौस्तुभ मणी’ रुपी विजय तिलक लावते. त्यानंतर आपण जी इच्छा मागू, ती पूर्ण करणारा ‘कल्पवृक्ष’ आपल्याला प्राप्त होतो. याच वेळी अनेकदा अप्सरा रुपी असलेली ‘रंभा’वासनेच्या रूपात येण्याची शक्यता देखील असते. त्या अप प्रवृत्तीवर विजय मिळविला, तर ‘लक्ष्मी’ माता आपल्यावर प्रसन्न होते आणि ‘चंद्र’ शीतलतेच्या माध्यमातून विराजमान होतो. त्याचवेळी आपल्या विजयाचा घोष ‘पांचजन्य’ च्या माध्यमातून जगात दुमदुमतो. अंतिम टप्प्यात जगातील दु;खावर उपचार करणारा ‘धन्वतरी’ प्राप्त होतो आणि शेवटी ‘अमृत’ मिळवून आपण मृत्यूनंतरही जिवंत राहतो, हे समुद्रमंथन, १४ रत्ने आणि मानवी जीवनातील संबंधाचे सार आहे. 

पुण्यामध्ये गणेशोत्सवात आनंद व दु:खाचा मिलाफ हीच खरी आस्था 

गणेशोत्सवात पुण्यामध्ये मातीच्या गणपतीचे आगमन होते, त्यानंतर उत्साहात पूजन आणि विसर्जन होते. यावेळी आगमन होताना पुणेकरांच्या चेह-यावर आनंद असतो आणि विसर्जनाच्या वेळी पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा दिसतात, तेथे दु:ख असते. त्यामुळे पुण्यात आस्था प्रत्येकामध्ये दिसून येते. लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला. त्यांच्यामध्ये महत्वाकांक्षा होतो. ती ठेवणे चुकीचे नाही, मात्र त्यामागे वेडे होणे चुकीचे आहे. महत्वाकांक्षा अमृत आहे, तर त्यातून काहीतरी मिळविण्याची हावरटपणाची वृत्ती ही विष आहे. हेच आजच्या युवकांना अध्यात्माद्वारे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

वैभव वाघ लिखित ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन

मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवेल-परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव

पुणे : “मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवतो. समाजातील प्रत्येकाने कर्तव्य हाच धर्म मानून मानवी कल्याणाचे काम केले, तर देशात, समाजात शांततेचे वातावरण नांदेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती व त्याच्या पूर्तीसाठी कर्तव्यनिष्ठा, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड उपयोगी ठरते,” असे मत  कारगिलच्या लढ्यातील शौर्याबद्दल १९ व्या वर्षी परमवीर चक्र हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव यांनी व्यक्त केले. तरुणाईने तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता त्याचा गरजेपुरता चांगला वापर करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. 
सामाजिक जाणीवेतून वैभव सुनंदा पंडित वाघ लिखित व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘#व्हायरल_माणुसकी’, निगेटिव्ह काळातील पॉजिटीव्ह गोष्ट पुस्तकाचे प्रकाशन योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते झाले. प्रसंगी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे संचालक शरद तांदळे, वैभव वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक लोकांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या योद्ध्यांची कथा वाघ यांनी या पुस्तकातून मांडली आहे. प्रसंगी या लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मातांचा, तसेच कोरोना काळात कार्यरत विविध संस्थांचा सन्मान यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
योगेंद्रसिंग यादव म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या पावन भूमीवर येणे, हे माझे भाग्य समजतो. कोरोना काळात वाघ यांनी केलेले कार्य कौतूकास्पद आहे. आपल्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्व आहे. आईच आपल्याला जीवन जगत असताना प्रेरित करते. भारत देशाला आपण माता संबोधतो. आईच्या प्रेरणेतून हे कार्य करण्याची ऊर्जा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. वाघ यांनी आपल्या सामाजिक जाणिवेतून समाजाप्रती कर्तृत्वाचे जबाबदारीचे, केलेल्या कार्याचे शब्दांमधून बंधुतेचे, मानवतेचे उत्तम दर्शन घडवले आहे.”
“मानवता हाच धर्म समजून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मानवतेचे कल्याण व आपल्या संस्कृतीचे संरक्षण करायचे असेल, तर आपण सर्वानी एकत्र येऊन समाजाप्रती असणारी कर्तव्ये, भारतीय संस्कृती प्रत्येक भारतीयांमध्ये रुजवायला हवीत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल स्वतःला एक सूत्रामध्ये बांधायला हवे. भारतीय म्हणून संरक्षण करायचे असेल, तर प्रत्येकाला सैन्यात जायची गरज नाही. आपण आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडूनही राष्ट्रभक्ती करता येते,” असेही योगेंद्रसिंग यादव म्हणाले.
योगेंद्रसिंग यादव पुढे म्हणाले, “देशाची प्रगती साधायची असेल, तर शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. सामाजिक शांततेप्रमाणे वैयक्तिक शांतताही महत्वाची आहे. जीवनात यशस्वी व्हायचे, तर स्वप्न बघा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रत्येक गोष्टीकडे सकरात्मकतेच्या दृष्टीने पाहायला हवे. नकारात्मक विचार दूर ठेवून स्वतःला आत्म्याशी जोडून घ्यावे. नैराश्यातून बाहेर येण्यास ‘#व्हायरल_माणुसकी’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. परंतु त्याचा अत्याधिक वापर आपल्यासाठी घातक आहे, हे समजायला हवे. जेव्हा आपण एखाद्या अधिकाराविषयी बोलतो तेव्हा त्यासोबतच येणाऱ्या कर्तव्यांची जाण असायला हवी. ध्येयपूर्तीसाठी उद्दिष्ट, आवड आणि प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.”
वैभव वाघ म्हणाले, “कोरोना काळातील चळवळीतून ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाची सुरुवात झाली. आज अनेकदा युवा पिढी नैराश्याने ग्रासलेली दिसते. हेच नैराश्य दूर करायचे असेल, तर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहावे. या दोन वर्षांच्या कठीण काळातील नकारात्मक वातावरणात घडलेल्या अनेक सकारात्मक गोष्टींचा हा लेखाजोखा आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अनेक योद्ध्यांनी केलेल्या कार्याची कथा यातून मांडली आहे.”
सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले. शरद तांदळे यांनी आभार मानले.