Home Blog

“प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती” – डॉ. नीलम गोऱ्हे

उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२६ :
उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो.

विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट.

महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत विमानात असलेले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एचसी विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.आता अपघाताच्या अगदी आधीची कहाणी समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती. सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना रनवे दिसला नाही. वैमानिकांनी विमान पुन्हा वर घेतले. थोड्या वेळाने पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले, पण रनवेला स्पर्श करण्यापूर्वीच ते उलटले आणि जमिनीवर आदळले. अपघाताच्या अगदी आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट.

विमानातील प्रवाशांची नावे

खाजगी VSR कंपनीचे विमान

  1. अजित पवार 2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक 5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,’डोंगराएवढे दुःख, मोठा भाऊ हरपला’

करतो, बघतो, पाहतो, हे शब्दच अजित पवारांच्या डिक्शनरीत नव्हते

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवार चुकीला चूक म्हणत होते. ते मनाने अतिशय निर्मळ होते. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळातही काम केले. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अजित पवारांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याचे उत्कृष्ट काम केले. त्याचा अनुभव मला आहे. एकदा करायचे ठरवले की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. होत नसेल तर होणार नाही असे ते ठामपणे सांगायचे.

असा स्पष्टवक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिला. मी असेन. मुख्यमंत्री असतील. अजित पवार असतील. आम्ही टिम म्हणून काम केले. आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. दादा पहाटे लवकर उठून कामाला लागत होते. देवेंद्र दिवसभर काम करतात.

ते पुढे म्हणाले, अजित पवारांनी पहाटे 6 वा. वेळ दिल्याचे अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी पाहिले आहे. अतिशय वेळेचे महत्त्व व वेळेचे भान ठेवणारा नेता हरवलेला आहे. खरे म्हणजे काल परवाच सरन्यायाधीशांसोबतच्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली. ते येण्यापूर्वी आम्ही तिथेच एका चेंबरमध्ये बसलो होतो. त्यावेळी झालेल्या चर्चा, गप्पा, गोष्टी आज मला त्यांच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा डोळ्यासमोरून गेल्या.

अजित पवार माझ्यापेक्षा वयाने व राजकारणाने मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक विषय हाताळले होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळी काही विषय यायचे त्यावेळी आपल्य राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे, आपल्या सर्वांना काटकसर करावी लागेल असे ते निर्भिडपणे सांगत होते. शिस्तिचा नेता म्हणूनही त्यांना अनुभवले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

अजित पवार माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. आमच्यात गत काही वर्षांपासून फार जवळीक निर्माण झाली होती. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. मनात दुःखाच्या फार भावना आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी. हे कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे झालेले नुकसान आहे. मी व मुख्यमंत्री आम्ही बारामतीला जात आहोत.

आम्ही सरकार म्हणून जे काही निर्णय घ्यायचो ते मिळूनच घ्यायचो. एखादी सूचना आली की, त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचो. अजित पवार कधीकधी असेही म्हणायचे की, नव्या योजनांमुळे आपल्याला काटकसर करावी लागेल. पण जेव्हा काही निर्णय आपल्याला जेव्हा घ्यावेच लागत होते तेव्हा ते मागे हटत नव्हते, याचा अनुभवही आम्ही घेतला आहे.

या अपघातात आमच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. ती नक्कीच होईल. कारण, यापुढेही अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचे आहे. त्यासाठी त्याची चौकशीही होईल.

नगरच्या देवळाली प्रवरा गावात जन्म, 1982 मध्ये राजकारणात प्रवेश

पुणे- बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळालगत झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत होते. विमान उतरत असतानाच हा दुर्दैवी अपघात झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचा दादा आपल्या बारामतीच्या मातीतच काळाच्या कुशीत विसावला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाची शोककळा पसरली आहे.

अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात झाला. त्यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार सुरुवातीला मुंबईतील राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते. त्यांच्यावर कौटुंबीक जबाबदारी लवकर आली. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण झाले. त्यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधून दहावी (एसएससी) उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदार खांद्यावर आल्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात शिक्षण सुरू केले, परंतु त्यांची अंतिम पदवी पूर्ण केली नाही. एकूणच, त्यांचे औपचारिक शिक्षण फारच मर्यादित झाले. पण शेतकरी, सहकारी संस्था आणि स्थानिक समस्यांची सखोल समज यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याची अमिट छाप समाजमनावर सोडली.

अजित पवारांनी सहकार, शेती व ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपले चुलते शरद पवारांच्या नेतृत्वात बारामती परिसरात संघटनात्मक कामातून आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवली. त्यामुळे लवकरच राज्य पातळीवर एक प्रभावी नेता म्हणून त्यांचा उदय झाला.

अजित पवार 1982 मध्ये पुण्यातील एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. यामुळे त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांचे काका शरद पवार यांच्या निगराणीखाली त्यांनी झपाट्याने प्रगती केली. अजित पवार पहिल्यांदा 1991 मध्ये बारामती येथून लोकसभेचे खासदार झाले, परंतु त्यानंतर त्यांनी शरद पवारांसाठी ही जागा सोडली. त्याच वर्षी ते बारामती येथून आमदार झाले आणि त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग विजयी झाले. त्यांनी सिंचन, वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी महाराष्ट्राचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि डिसेंबर 2024 पासून देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा काम केले. ते नियमितपणे सार्वजनिक सभा घेत असत आणि त्यांच्या जलद निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध होते. अजित पवार यांचे 1985 साली महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कन्या सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न झाले. त्यांना जय आणि पार्थ ही दोन मुले आहेत. पार्थ राजकारणातही सक्रिय आहे.

संस्थात्मक व सामाजिक भूमिका

अजित पवारांनी 1991 पासून आतापर्यंत उपमुख्यमंत्री, वित्त नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास आदी आदी विविध पदे भूषवली. ते बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते, त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे, रयत शिक्षण संस्था सातारा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आदी विविध संस्थांवर ते अध्यक्ष ते सदस्य म्हणून कार्यरत होते. या सर्व संस्थांवर त्यांनी आपल्या कामाची छापही पाडली होती.

बारामतीकरांवर आभाळ फाटले,सुप्रिया सुळे म्हणाल्या उद्धवस्त झालो:युगेंद्र पवारांना अश्रू अनावर

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे पवार कुटुंब, बारामतीकर आणि संबंध राज्यवर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच युगेंद्र पवारांना अश्रू अनावर झाले. तर सुप्रिया सुळे यांनी उद्धवस्त झाल्याची प्रतिक्रिया दिली. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतलीय.
अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचे समजताच त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीहून तात्काळ बारामतीकडे रवाना झाल्याचे समजते. सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एकाच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी devasted असे व्हॉटसअप स्टेटस ठेवून आम्ही उद्धवस्त झालो आहोत, अशा भावना व्यक्त केल्या.

अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवारांचे पणतू युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा फोनवर बोलतानाच बांध फुटला. यापू्र्वी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर पवार कुटुंबाने आम्ही सारे एकच आहोत, हा संदेश नेहमीच महाराष्ट्राला दिला होता.

विमानात कोण कोण होते?
  1. अजित पवार
  2. विदीप जाधव
  3. पिंकी माळी
  4. कॅप्टन सुमित कपूर
  5. कॅप्टन शांभवी पाठक

 ‘दादा, दादा’ म्हणत एकच रडारड, बारामतीत प्रचंड गर्दी

पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. आपल्य लाडक्या नेत्यच्या मृत्यूमुळे बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्राकव व विदारक दृश्य दिसून येत आहे. येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या नेत्यासाठी अनेकजण ढसाढसा रडताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली आहेत. आजूबाजूच्या गावातील हजारो नागरीक व कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाले असून, आमचे दादा आम्हाला परत द्या, अशा आर्त हाका मारताना घाय मोकलून रडताना दिसत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावरील अजित पवारांसह सर्वांचेच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेत. या अपघातामुळे मृतदेहांची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, त्यांची अद्याप ओळख पटू शकली नाही.
आम्ही तांत्रिक तपासणी व ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत, असे गिल यांनी स्पष्ट केले. सध्या बारामतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी लोकांच्या मनातील भावना अनावर झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

डीजीसीएने अजित पवारांच्या विमानाची दिलेली माहिती

तारीख: २८.०१.२०२६ संचालक: व्हीएसआर विमानाचा प्रकार: लियरजेट ४५ विमानाची नोंदणी: व्हीटी-एसएसके स्थळ: बारामती विमानतळ विमानातील व्यक्तींची संख्या: चालक दलासह ०५

तपशील: विमानाचे बारामती येथे अपघातग्रस्त लँडिंग झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ इतर व्यक्ती (१ पीएसओ आणि १ सेवक) आणि २ चालक दलाच्या सदस्यांसह (पायलट इन कमांड + फर्स्ट ऑफिसर) विमानात होते.

प्राथमिक माहितीनुसार, विमानात असलेल्यांपैकी कोणीही या अपघातातून बचावलेले नाही.

अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य बारामतीला रवाना झाले आहेत.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह बारामतीला रवाना झाले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला. विमानात अजित पवारांसह एकूण ६ जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. य घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन:वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी, विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू

बारामतीराज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज (28 जानेवारी) सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पवार एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला गेले होते. लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते.

महाराष्ट्र पंचायत निवडणुकीसाठीच्या चार सभांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पवारांचे कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरुन रवाना झाले आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेले राष्ट्रीय नेते
गोपीनाथ मुंडे
दिनांक: ३ जून २०१४
मृत्यू: रस्ते अपघातात निधन (कार अपघात)
नेते: भारतीय जनता पक्ष (भाजपा)
पद: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री

संजय गांधी
दिनांक: २३ जून १९८०

मृत्यू: दिल्ली (सफदरजंग विमानतळाजवळील विमान अपघातात)
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

माधवराव सिंधिया
दिनांक: ३० सप्टेंबर २००१

मृत्यू: चार्टर्ड विमान अपघातात निधन
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद: माजी नागरी विमान वाहतूक मंत्री, ज्येष्ठ नेते

जी.एम.सी. बालयोगी
दिनांक: ३ मार्च २००२

मृत्यू: कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर अपघातात निधन
स्थळ: आंध्र प्रदेश (कृष्णा जिल्ह्यातील तलावात कोसळले)
पक्ष: तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), लोकसभेचे अध्यक्ष होते

वाय.एस. राजशेखर रेड्डी
दिनांक: २ सप्टेंबर २००९

मृत्यू: हेलिकॉप्टर अपघातात निधन
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते

अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेचे आक्षेपार्ह वक्तव्य; संविधान व मानवी अधिकारांच्या चौकटीत दखल आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका

“न्यायाच्या नावाखाली हिंसक आणि अमानवी भाषेला प्रोत्साहन देता येणार नाही” – डॉ. गोऱ्हे

मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६ :
भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत वापरलेली निंदनीय व आक्षेपार्ह भाषा अत्यंत अस्वस्थ करणारी असून ती कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्याजोगी नाही, अशी ठाम प्रतिक्रिया शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचीही जबाबदारी आहे की कार्यक्रमातील वक्तव्ये ही संविधानाच्या चौकटीत आणि सामाजिक भान राखून केली जातील. अमृता फडणवीस या सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला आहेतच; मात्र मुळातच कोणत्याही महिलेबद्दल दुसऱ्या महिलेने अशा प्रकारची भाषा वापरणे हे संविधानविरोधी असून मानवी अधिकारांचा भंग करणारे आहे. अशा वक्तव्यांमुळे महिलांवरील अपमान आणि हिंसेला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले जाते, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, बलात्काराच्या बदल्यात बलात्कार किंवा पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट विच्छेदन करण्यासारखी वक्तव्ये समाजाला चुकीच्या दिशेने नेणारी आहेत. अशा भाषेचे समर्थन होणे म्हणजे हिंसाचाराची साखळी निर्माण करण्यास खतपाणी घालण्यासारखे आहे. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर, विशेषतः महिलांवर, अशा प्रकारे आक्रमक आणि अमानवी भाषा वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे त्या म्हणाल्या.

दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारांचा आणि बलात्कारांचा निषेध करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत. दलित हक्क संरक्षण आयोग, ॲट्रॉसिटी कायदा यांसारख्या माध्यमांतून न्याय मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मोठे काम केले आहे. मात्र न्याय मागण्याच्या नावाखाली दुसऱ्याच्या मानवी अधिकारांवर अतिक्रमण करणारी भाषा स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घ्यावी, तसेच गृह विभागानेही गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक जीवनातील महिलांबाबत वाढत चाललेल्या ट्रोलिंग, अपमानास्पद वक्तव्ये आणि हिंसक भाषेचा ठाम निषेध केला.

सशक्त भारत निर्मितीसाठी सर्वांचे योगदान महत्वपूर्ण-मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया

एमआयटी डब्ल्यूपीयूत ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे, दि. २७ जानेवारी : “वारसाने मिळालेल्या आपल्या देशाला सशक्त बनविण्यासाठी घुसखोरी थांबविणे, संविधानात बदल, लक्ष्य निर्धारण, प्रत्येकाला आरोग्यासाठी प्रेरणा देणे व भारतीय संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने बहुमूल्य योगदान द्यावे.” असे विचार फिटीस्थान-एक फीट भारतचे संस्थापक व एक्स स्पेशल फोर्सचे मेजर (डॉ.) सुरेंद्र पुनिया यांनी व्यक्त केले
एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन कोथरुड कॅम्पस येथे साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश बी.जोशी व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी ले. कर्नल ऋषीकेश बर्गे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटीडब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, माईरचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व माईर अंतर्गत असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती कार्यक्रमाचे सादरीकरण केले. एनसीसीच्या कॅडेट ने सादर केलेल्या परेड ने सर्वांना आकर्षित केले.
मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया म्हणाले,” सैनिकासाठी राष्ट्र आणि समाज हे प्रथम असते. यामुळेच पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनात राष्ट्र निर्मितीसाठी व आरोग्यपूर्ण समाज निर्मितीसाठी रोज ३५ करोड लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. अशा वेळी सर्वांची जबाबदारी आहे की, एक दुसर्‍याला आरोग्यासाठी प्रेरित करावे.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,” राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी कोणतेही कार्य करतांना लक्ष्य निर्धारित करावे, मैदानात  रोज  किमान २ तास खेळावे आणि नोकरी करतांना ५ वर्ष कोणताही जॉब सोडू नये. यामुळे विद्यार्थ्यांना आपले कार्य आणि देशाप्रती आदर निर्माण होईल. ”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. त्यासाठी ‘लाईफ ट्रान्सफॉरर्मेशन सेंटर’ ची स्थापना करून युवकांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टिने प्रगल्भ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून भारतीय संस्कृती व परंपरेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील सर्व समस्यांचे उत्तर हे शैक्षणिक संस्थेतून मिळू शकते. यासाठी उच्च शिक्षणात एनसीसी ला अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना मांडली. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रताप फुंडे यांनी आभार मानले.

पीएमआरडीएकडून घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ;आता २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घर खरेदीची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेठ क्र. १२ तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील सदनिकांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून, आता नागरिकांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

पीएमआरडीएने पेठ क्र. १२ मधील ३४० तसेच पेठ क्र. ३०-३२ मधील ४९३ अशा एकूण ८३३ शिल्लक सदनिकांसाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची मूळ अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ होती. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या गृहनिर्माण योजनेचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मुदतवाढीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता विभाग) पूनम मेहता यांनी केले आहे. अर्ज प्रक्रियेसंदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी नागरिकांनी पीएमआरडीएच्या ०७९३५४८३०४२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे – रामदास आठवले

बाळासाहेब जानराव यांच्यावर कोणतीही कारवाई नाही : रामदास आठवले

पुणे : पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्याबाबत काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या पूर्णतः तथ्यहीन असून त्यांच्या विरोधात पक्षाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. शिष्टमंडळामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, माजी नगरसेवक जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले असून एक उमेदवार केवळ १३८ मतांनी पराभूत झाला आहे, तर दोन उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. ही पक्षासाठी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी असल्याचे आठवले यांनी नमूद केले.

मागील कार्यकाळाप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे, यासाठी आपण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे दोन्ही नेत्यांनी मत व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब जानराव यांच्याविरोधात खोटे आरोप करत वर्तमानपत्रांत बातम्या प्रसिद्ध केल्याबाबत रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब जानराव हे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची शिस्त सर्वांनी पाळावी आणि कोणीही कार्यकर्त्यांची बदनामी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

रामदास आठवले यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच निष्ठेने काम करून पुणे महानगरपालिकेत पक्षाचे नगरसेवक निवडून आणता आले, असे बाळासाहेब जानराव यांनी सांगितले. पक्षाला उपमहापौर पदासह इतरही जबाबदाऱ्या मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

१२० फुटी डीपी रस्त्याचे काम (शिवणे ते खराडी – कर्वेनगर हद्दीमधील) त्वरित पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाठलाग

पुणे-📍मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६

शिवणे ते खराडी – कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्याचे काम त्याची अवस्था महापालिका युक्तांच्या लक्षात आणून देत या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी नगरसेवक स्वप्निल देवराम दुधाने यांनी पुन्हा पाठलाग सुरु केला आहे.त्यांनी आज पुणे मनपाच्या पथ विभागाचे उप अभियंता वझे आणि कनिष्ठ अभियंता भोंडे यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत परिस्थिती दाखवून दिली .या ठिकाणी पदपथ, रस्ता दुभाजक, काँक्रिटीकरण अशी अनेक कामे पूर्णत्वास न गेल्याने रस्त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन अधिकारी वर्गाकडे त्यांच्या भावना पोहोचविल्या . आणि दुपारी दोन वाजता त्वरित आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देऊन पूर्ण झालेल्या रस्त्याची अवस्था सुधारावी, तर उर्वरित रस्त्याचेही काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी भूमिका मांडली . आणि प्रभागातील एक आदर्श रस्ता म्हणून हा रस्ता नावारूपास यावा, अन्यथा नागरिकांच्या सहकार्यातून लोकआंदोलन उभे करत सदर काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने आमची असेल, असेही सांगितले .

आपल्या प्रभाग क्र. ३०,(कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी) मधील शिवणे ते खराडी हा नदीपात्रालगतचा कर्वेनगर हद्दीतील महत्वपूर्ण रस्ता आहे. आपल्या प्रभागात सव्वादोन किमी लांबीचा रस्ता आपल्या प्रभागात स्थित असून यापैकी १.८ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के रस्ता मनपाच्या मिसिंग लिंकमध्ये असल्याने रस्त्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.


दुर्गाशंकर मिश्रा यांनी घेतली पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांची माहिती

पुणे- उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे माजी सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी आज महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध प्रकल्पांची माहिती घेतली.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे माजी सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, यांनी अमृत २.०, रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण इत्यादी विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. सदर प्रकल्पांसंदर्भात दुर्गाशंकर मिश्रा यांनी सविस्तर पणे माहिती घेतली तसेच महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर,अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, तसेच अन्य विभागांचे उपायुक्त, खातेप्रमुख तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या सभागृहात रंगली कवींची काव्यस्पर्धा

पुणे :पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आयोजित काव्य स्पर्धा
मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपक्रमा अंतर्गत दिनांक २७ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कवींची काव्यस्पर्धा सभागृहात पार पडली.
दरवर्षी पुणे महानगरपालिकेमार्फत मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ साजरा केला जातो. या पंधरवड्यानिमित्त आयोजित काव्य स्पर्धेत पुणे शहरातील व पुणे शहराबाहेरील मान्यवर कवीनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक सर्वश्री कवी संजय जाधव, ( बारामती ) द्वितीय क्रमांक सुजित कदम ( पुणे की व तृतीय क्रमांक संतोष गाढवे ( राजगुरू नगर ) यांनी प्राप्त केला.
विजेत्यांना यावेळी रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वि. ग. सातपुते व सौ.कवयित्री वंदना घाणेकर यांनी काम पाहिले.
पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी या काव्य स्पर्धेतील स्पर्धकांचे स्वागत केले. आणि स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली.
श्री गोपाळ कांबळे यांनी या काव्य स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.

या काव्य स्पर्धेमध्ये सर्वश्री खेताराम परीयारिया, रा.वि.शिशुपाल, संतोष गाढवे, रमेश जाधव, सुजित कदम, मिनाक्षी शिलवंत, वृंदा भांबुरे, डॉ.दाक्षायणी पंडीत, ज्योती हमीने, संजय माने,अमोल सुपेकर, विनोद अष्टुळ, आशा यमगर, संजय जाधव इत्यादी कवींनी मानवी संवेदना, प्रेम, निसर्ग, दुःख, विरह व सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या उत्तम कविता सादर केल्या. न्याय,ऊसतोड, कुटुंब पद्धती, झाड, माय मराठी, सांगावा,जगून घे थोडं, प्राण आहे मायभूमी, सखी, कथा, सोळा ऑगस्ट ओरडला, माझी शाळा- माझी मुले माझे हिरो अशा अनेक विषयांवरील कविता यावेळी सादर झाल्या.
परीक्षक मा. वि. ग. सातपुते यांनी काव्य प्रवासातील आपले अनुभव कथन करुन तीन रचना सादर करून वाचन , मनन , चिंतन ,आणि वास्तव लेखन यांनी आत्ममुख होवून कवींनी आपल्या रचना कराव्यात असे विचार व्यक्त केले.
त्यानंतर आभार प्रदर्शनाने काव्य स्पर्धेची सांगता झाली.