मुंबई -बंडखोरांवर टीकास्त्र सोडून ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे , नंतर २४ तासात ठाकरेंच्या विरोधात बंड करणारांच्या गटात सामील होणारे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. 2009 सालापासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते. बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर बांगर यांच्या तोडीस तोड देणारा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी सुद्धा पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचणी करताना दिसून येत आहेत.
बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरेंसोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसून आले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी हेच संतोष बांगर ढसाढसा रडले होते. अख्ख्या मराठवाड्यातले शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात होते, फक्त संतोष बांगर ठाकरेंसोबत उभे होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढसाढसा रडलेही होते. पण स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणवणारे बांगर अवघ्या 24 तासांत हे शिंदे सैनिक झाले होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बांगर त्यांच्यासोबत कसे आले? याचा किस्सा सांगितला होता.

