कागदी पिशव्या तयार करण्याचे पाचशे विद्यार्थ्यांना धडे
पुणे-
‘कागदी पिशवीचा उत्तम पर्याय’ या मोहिमे अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना शनिवारी कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुमारे पाच हजार पिशव्या १८ आणि १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेवा संगम या प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना सप्रेम भेट दिल्या जाणार आहेत.
‘सेवा सहयोग’ या संस्थेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या तयार करण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत प्रत्यक्ष कागदी पिशव्या तयार केल्या.
पुण्यात १८ आणि १९ जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रातील १०० सेवा कार्यांचे दर्शन घडवणारे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘कागदी पिशव्यांचा वापर करा’ असा संदेश या प्रदर्शनात दिला जाणार आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कागदी पिशव्यांची भेट दिली जाणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पिशव्या नागरिकांना दिल्या जाणार आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा मिनोचा आणि सेवा सहयोग संस्थेचे शैलेश घाटपांडे, प्रसाद शिरसीकर यांनी उपक्रमाचे संयोजन केले.