– महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
– पुणे महापौर चषकची महापौरांकडून घोषणा
– यंदा स्पर्धेत अश्वारोहन स्पर्धेचाही समावेश
पुणे (प्रतिनिधी)
पुणे महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे यंदाही दिमाखदार आयोजन करण्यात येणार असून यंदा प्रथमच अश्वारोहन स्पर्धेचा समावेश या चषकांतर्गत करण्यात आला आहे. शिवाय कबड्डी, फुटबॉल, शुटींग बॉल, खो-खो, दिव्यांग क्रिकेट स्पर्धांचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर चषक स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती महापौर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन गेली २५ वर्षांपेक्षा जास्त काळ पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी ७३ लाख, ६९ हजार रुपयांची बक्षिसे विजेत्यांना मिळणार असून ११ हजारपेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत.
या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘महापौर चषक २०१९-२० मध्ये एकूण २७ क्रीडा प्रकार आहेत. त्यातील कबड्डी, फुटबॉल, शुटींग बॉल, खो-खो, अश्वारोहण, दिव्यांग क्रिकेट हे खेळ राज्यस्तरीय घेण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय खेळांमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होत असतात. त्यातील नितीन मदने, रीशांक देवाडीका, कृष्णा मदने तसेच प्रो कबड्डी मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश महापौर चषक स्पर्धेमध्ये होत असतो.’
‘वेटलिफ्टिंग, कॅरम, बुद्धीबळ, ज्युदो, जलतरण, फुटबॉल, मल्लखांब, टेबल टेनिस, योगा, हॅन्डबॉल, धनुर्विद्या, नेमबाजी, बॉक्सिंग, रोलर स्केटिंग, शुटींग बॉल, सॉफ्टबॉल, दिव्यांग क्रिकेट, बॉल बडमिंटन, सिलंबम, ट्रायथलॉन, कुस्ती, शरीर सौष्ठव, क्रिकेट हे खेळ जिल्हास्तरीय घेण्यात येणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ठ असलेल्या अश्वारोहण व ट्रायथलॉन खेळाचे पुणे महापौर चषकमध्ये आयोजन करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
कबड्डीचा थरार जीत मैदानात !
महापौर चषक अंतर्गत होणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन महापौर मोहोळ करणार असून यासाठी जीत मैदान सज्ज झाले आहे. दिमाखदार आयोजन व्हावे आणि स्पर्धा दर्जेदार व्हावी, यासाठी महापौर मोहोळ यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. उद्यापासून (२३ फेब्रुवारी) कोथरुडच्या जीत मैदानात कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.