१५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ‘कोन्निचिवा पुणे’ महोत्सव
पुणे : भारत आणि जपान यांच्यामध्ये सांस्कृतिक, शैक्षिणक आणि व्यवसायिक पातळीवर देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने ‘इंडो जपान बिझिनेस कौन्सिल’, ‘कॉन्सुल जनरल ऑफ जपान इन मुंबई’ आणि ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोन्निचिवा पुणे २०१९’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘कोन्निचिवा पुणे २०१९’मध्ये १५ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एमसीसीआयए येथे उद्योग परिषद, तर १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी फिनिक्स मॉल येथे सांस्कृतिक महोत्सव होणार आहे, अशी माहिती इंडो-जपान बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष श्रीकांत अत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कौन्सिलचे उपाध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, अभिषेक चौधरी, ‘एमआयटी’चे प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी उपस्थित होते.
श्रीकांत अत्रे म्हणाले, “दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध दृढ होण्यास चालना मिळावी, यासाठी हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १५) सकाळी १०.०० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या सभागृहात होणार आहे. कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई मिचिओ हरडा, जपान एक्सटर्नल ट्रेंड ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल मुनेनोरी मात्सुनगा, जपान नॅशनल टुरिझमचे कार्यकारी संचालक युसुके यामामोटो, प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. जळगावचे खासदार उन्मेष पाटील, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, ऑल निप्पोन एअरवेजचे जनरल मॅनेजर योशीयुकी मिझुची, द जपान फाउंडेशनचे पश्चिम विभागीय संचालक हिरोको ओझांकी यांच्यासह इतर तज्ज्ञ आणि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय आणि जापानी व्यवसाय, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, भारतीय व जपानी कलाकार, जपानी द्विभाषिक तज्ञ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. निरनिराळे संस्कृतिक कार्यक्रम, माहितीपट स्क्रीनिंग, वैविध्यपूर्ण गोष्टींची प्रदर्शने, बिझनेस फेअर, बिझनेस सेमिनार, चर्चासत्रे, फूड स्टॉल असणार आहेत.”
“यामध्ये आयोजित चर्चासत्रांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. ‘स्मार्टसिटीसाठी विकसित होणारा हैप्पीनेस इंडेक्स’, ‘भारत आणि जपान यांच्यात अनुकूल वातावरण‘, ‘2020 ऑलिम्पिक दरम्यान जपानचा दौरा’ आणि ‘जपानमधील करिअर आणि शैक्षणिक संधी’ या विषयांवर होणाऱ्या या चर्चासत्रांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, माजी आयुक्त दिलीप बंड, आर्किटेक्ट अनीता बेनिंजर-गोखले, मशाल एनजीओचे संस्थापक शरद महाजन, लेफ्टनंट कर्नल शशी आनंद, सिद्धार्थ देशमुख, मुन्नेरी मत्सुनागा, ओनिशी तातसुनोर, शैलेंद्र गोस्वामी, अभिषेक चौधरी, योशियुकी मिझुची, झेलम चौबळ, सुधीर पाटील, मुकुंद यत्नाळकर, श्रीकांत अत्रे, हिरोको ओझाकी, एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा. मिलिंद पांडे, पीआयसीटीचे प्रा. प्रल्हाद कुलकर्णी, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्री, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. गीताली टिळक मोने आदी सहभाग घेणार आहेत,” असे सिद्धार्थ देशमुख यांनी नमूद केले.
डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, “फिनिक्स मार्केटसिटी येथे रंगणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात भारत आणि जपानमधील उत्साही आणि समविचारी व्यक्ती एकत्र येतील. तसेच यानिमित्ताने दोन्ही देशामध्ये कला, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून परस्पराशी जोडले जातील. कला, संस्कृती, संगीत, नृत्य आदीचे दर्शन घडणार आहे. खास जपानी संगीत आणि नृत्य अनुभवण्याची संधीही पुणेकरांना आहे.”