पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेलं पुणे सध्या निपचित पडले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं पुणेकरांनी पुढाकार घेत सकाळपासूनच बाहेर पडणं टाळले होते. पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कायम वर्दळ असणाऱ्या पुण्यात आज स्मशान शांतता पसरली आहे.
नेहमी गजबजलेली महात्मा फुले मंडई आज मात्र चिडीचूप आहे. यावरून एकूण पुण्यातील परिस्थितीचा अंदाज येतो. स्वारगेट, रविवार पेठ, डेक्कन, मंडई, दगडूशेठ गणपती, लक्ष्मी रोड, आणि तुळशी बाग या सारख्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणांवर आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.