पुणे,– संगीत नाटक, भारतीय शास्त्रीय संगीताशी नवीन पिढी जोडली गेली. चित्रपटाने मला नवीन माणंस दिली. हा चित्रपट माझा करीअरचा महत्वाचा टप्पा असेल. या चित्रपटामुळे मला गुरू मिळाले. यशाची गोडी चाखता आली. नातवंडाना सांगायला छान गोष्ट मिळाली, चांगला प्रेक्षक वर्ग मिळाला. असे मत कलाकारांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटाविषयी व्यक्त केले. डीएसके फाउंडेशन आयोजित डीएसके गप्पांमध्ये काल कट्यारची टिम म्हणजेच सुबोध भावे, महेश काळे, मृण्मयी देशपांडे, वैभव चिंचळकर, निर्माते सुनील फडतरे यांच्याशी राजेश दामले यांनी मनमुराद गप्पा मारल्या.
दिग्दर्शनाच्या बाबतीत विचारले असता सुबोध म्हणाला की, कट्यार नाटक करत असतानाच मी या कथेच्या प्रेमात पडलो होतो. संगीत, मत्सर, माया, व्देष हे सगळं असलेली ही एक परीपूर्ण कथा आहे. दिग्दर्शनासाठी बऱ्याच जणांना विचारले पण कुणी रस दाखविला नाही. त्यामुळे मीच दिग्दर्शन करायचं ठरवलं.
नाटक करताना सदाशिव आवडायचा नाही. 2016 मध्ये असा सदाशिव लोकांना पटला नसता म्हणून कथानकामध्ये बदल केले. संपूर्ण चित्रपटभर पंडीतजी एक महत्वाची भूमिका करताना दिसतात. नाटकामध्ये तसं नाही आहे. प्रकाश तापडिया यांनी मला हवी तशी पटकथा लिहीली. ती ऐकल्यावर आपण या कथेला न्याय देऊ शकू की नाही असे वाटायला लागलं असेही तो म्हणाला.
उमा, झरीना आणि कवीराज ही पात्र मृण्मयी, अमृता व पुष्कर करतील हे आधीच ठरलं होतं. शोध सुरू होता तो खाँसाहेब, पंडीतजी आणि सदाशिवचा. खाँसाहेबांच्या भूमिकेसाठी सुबोधला पहिले रजनीकांतचे नाव सुचले हे एकून प्रेक्षकांमध्ये हस्याची लहर उमटली. कमल हसन चा ही विचार करण्यात आला पण ते त्याकाळात व्यस्त होते. शेवटी सचिन पिळगांवकरांनी ही भूमिका साकारली. तसेच पंडीतजी माझा जवळच आहे असा भास होत होता आणि शंकर महादेवन यांना विचारण्यात आले आणि त्यांची लूक टेस्ट घेण्यात आली. शेवटी सदाशिव मीच करणार असे सुबोधने सांगितले.
सुबोध विषयी बोलताना महेश म्हणाला की, स्वतःच स्वप्न दुसऱ्यांना दाखवण्याची त्याच्यात क्षमता आहे. चित्रपटामध्ये मला त्याचा आवाज होता आलं हे मोठं भाग्य आहे.मी शाळेपासून नृत्य, संगीत, सतार अशा विविध गोष्टी शिकत आले. त्या याच भूमिकेसाठी शिकत होते असे मला वाटले. दिग्दर्शकाच्या आखून दिलेल्या चौरटीत मला काम करायला आवडतं. म्हणून या व्यक्तीरेखेला न्याय देऊ शकले. आपल्या भूमिकेविषयी बोलताना मृण्मयी असे म्हणाली.
प्रेक्षकांमध्ये नाटक आणि चित्रपटाची तुलना होते व त्यामुळे टिका होते याबाबतीत विचारले असता ते म्हणाले की, नाटक आणि चित्रपट हे दोन्ही वेगळी माध्यम आहेत. नाटका सारखाच चित्रपट करायचा असता तर मी चित्रपट न करता नाटकाचेच प्रयोग केले असते. माध्यमांच्या गरजा समजून आणि 2016 चा काळ पाहता त्यात बदल करणे गरजेचेच आहे. नाटकात पंडीतजी नव्हते ते चित्रपटात आहे. लोकांनी चांगल-वाईट सांगाव पण ते चित्रपटाविषयी असावं. तुलना करू नये.
गप्पांची सांगता मृण्मयीच्या ‘वळणावरती वळताना’ या सुरेख कवीतेने आणि महेश काळेच्या ‘सूर निरागस हो…’ या बहारदार गाण्याने झाली.