पिंपरी-मोठा गाजावाजा करीत अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. काही दिवसातच वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांची संगोपनाअभावी दुर्दशा होते आणि रोपटी जळून जातात. वृक्ष जगावेत, या उद्देशाने पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसोबतच मराठवाड्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेण्यात येत आहे. जेणेकरून लागवड केलेले वृक्ष जगले पाहिजेत, पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या सात वर्षापासून प्रतिवर्षी किमान एक हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही रोपटी जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी ट्रस्टमार्फत घेतली जाते. जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टॅकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. सन 2012 पासून आठवड्याच्या दर रविवारी वृक्ष संवर्धनासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबिवले जात आहेत. उस्मानाबाद जिल्यातील धारूर, चिंचोली, बिंजनवाडी सोनारी, निजाम जावळा येथे जाळीसह वृक्षलागवड करण्यात आली. तसेच पिंपळे गुरव, मरकळ गाव, भंडारा डोंगर येथेही वृक्षांची लागवड करण्यात आली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे गेल्या 4 जुलै रोजी पाचशे रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडूलिंब, आवळा, तुती आदी सहा फुटी रोपांची लागवड करण्यात आली. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची वेळोवेळी निगा राखण्यात येत आहे. या रोपांना नुकताच बाम्बूच्या काट्यांचा आधार देण्यात आला आहे. जेणेकरून जोरदार वार्यामुळे रोपे वाकून त्यांचे नुकसान टळण्यास मदत होईल. आपण स्वत: ट्रस्टचे उपाध्यक्ष भैरुजी मंडले, सचिव सूर्यकांत कुरुलकर, सहसचिव वामन भरगंडे यांच्यासह वृक्षलागवड केलेल्या ठिकाणी लक्ष देत असतो, असेही अरुण पवार यांनी सांगितले.
वृक्षांसाठी मोफत टँकरसाठी संपर्क साधा : अरुण पवार
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. मात्र, त्यातील अनेक रोपे पाण्याअभावी जळून जातात. या रोपांना पाणी मिळाल्यास यातील बहुतांश रोपे मोठे वृक्ष होतील. अशी रोपे पाण्याअभावी नष्ट होऊ नयेत, यासाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टकडे मागणी केल्यास या रोपांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जाईल. वृक्षांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने मोफत पाणीपुरवठ्यासाठी ट्रस्टशी संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले आहे.