पुणे – व्यंगचित्र क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून व्यंगचित्रकार व पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
दिवा प्रतिष्ठान आणि कराडवैभव चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दिवाळी अंकांच्या संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन व स्व. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील कराड येथे संपन्न झाला.
दिवाळी अंक हे मराठी भाषेचे अनोखे वैशिष्ट्य असून या अंकांचे महत्त्व आणि गोडी कायम राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. यावेळी आमदार आनंदराव पाटील, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाध्ये, चंद्रकांत शेवाळे, अॅड. धनंजय सिंहासने, शिवाजी धुरी, दीपक अरबुणे हे उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी दिवाळी अंकांचे महत्त्व विशद करतांना सांगितले की, मराठी ही एकमेव अशी भाषा आहे की ज्या भाषेचे साहित्य संमेलन होते, नाट्य संमेलन होते, काव्य संमेलन होते. एखाद्या सणानिमित्त विशेष अंक प्रकाशित करण्याची शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा मराठी भाषेत आहे. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आक्रमणातही दिवाळी अंकांचे महत्त्व आणि गोडी अबाधित राहिली पाहिजे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जावेत. दिवाळी अंक वाचकांची सेवा करण्याचे काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिवाळी अंकांमध्ये समाजाचे मन दिसते, असे नमूद करुन डॉ. पाटील यांनी जाहिरात ही एक कला असून ती मिळवणे हे कौशल्यपूर्ण काम असल्याचे सांगितले.
डॉ. पाटील यांच्या हस्ते धुंडीराज जोशी, मेधा जोग, विष्णू शेटकर या वाचकांचा तसेच सुनील गायकवाड, प्रभाकर दिघेवार यांचा दिवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राजाभाऊ देशपांडे, आण्णासाहेब जाधव, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात, अरुण सावळेकर, श्रीकांत हिडकल, उदय किरपेकर, डॉ. योगेश कुमार, मीनल ढापरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. कार्यक्रमास ज्ञानेश्वर जराड, महेंद्र देशपांडे, भारतभूषण पाटकर, विवेक मेहेत्रे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, शारदा धुळप, सन्ना मोरे, विजय सामंत, उल्हास पाटकर, मारुती विश्वासराव, राजेंद्र गोसावी, दगडू चौधरी, गौरव कुलकर्णी, शिवाजीराव यादव, शहाजीराव जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दुपारच्या सत्रात ‘दिवाळी अंक काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, महेंद्र देशपांडे, डॉ. बसवेश्वर चेणगे, विनायकराव जाधव, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, महादेव साने यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

