पुणे – येथील व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती निमित्त हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सोमवार, दि. 24 जुलै रोजी पुण्यात खा. डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
राजेंद्र सरग यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे झाले. त्यांनी काढलेले पहिले व्यंगचित्र नाशिकच्या ‘साप्ताहिक गांवकरी’ मध्ये मार्च 1987 मध्ये प्रकाशित झाले. तेव्हापासून ते या व्यंगचित्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र पोलीस दलाच्या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत सन 2004 पासून सन 2007 पर्यंत सलग 4 वर्षे प्रथम पुरस्कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्थेचा सन 2007 चा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, दक्षतातर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत सन 2008 मध्ये द्वितीय पुरस्कार, दैनिक रत्नभूमी, रत्नगिरी तर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत सन 2008 मध्ये प्रथम पुरस्कार, रोटरी क्लब, बीड तर्फे सन 2003 चा व्यवसाय गौरव पुरस्कार, दैनिक गांवकरी, औरंगाबादतर्फे व्यंगचित्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन 2004 मध्ये गौरव पुरस्कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2008-2009 चा राज्यस्तरीय चौथा स्तंभ व्यंगचित्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सन 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आकाशवाणी मुंबईच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, अहमदनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल 2017 मध्ये गौरव तसेच नागपूर येथे जानेवारी 2017 मध्ये आयोजित अखिल भारतीय व्यंगचित्र स्पर्धेत रेखाटलेल्या व्यंगचित्रास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्वच्छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्या प्रबोधनपर व्यंगचित्र प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. याशिवाय त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विविध दिवाळी अंकांत त्यांची 10 हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.
पुरस्काराबद्दल विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र घाटपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार, जगदीश कुंटे, रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार, संजय मिस्त्री, लहू काळे, सुरेश राऊत, राजीव गायकवाड, चारुहास पंडित,राजेंद्र सोनार, प्रभाकर दिघेवार, योगेंद्र भगत, अनंत दराडे, अशोक बुलबुले, अरविंद देशपांडे, विश्वास सूर्यवंशी, भरत जगताप, दिनेश धनगव्हाळ, राहूल सावे, संतोष घोंगडे, शिवाजी गावडे, अरविंद गाडेकर, डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, शरयू फरकांडे, अमोल गवळी आदी व्यंगचित्रकारांनी राजेंद्र सरग यांचे अभिनंदन केले आहे.

