पुणे : ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांनी वसतीगृहाचा योग्य उपयोग करुन फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा पुढे चालवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
समाज कल्याण विभागाच्या येरवडा (गोल्फ क्लब) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा.अनिल शिरोळे, विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, विधानसभा सदस्य जगदिश मुळीक,पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, समाज कल्याणचे प्रादेशिक आयुक्त पी.एस.कवटे, कार्यकारी अभियंता एन.ए.तेलंग, सहाय्यक आयुक्त एच.डी.डोंगरे उपस्थित होते.
हे वस्तीगृह 216 विद्यार्थी क्षमतेचे असून हडपसर येथील 120 विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह या इमारतीत स्थालांतरीत करण्यात येणार आहे. या वसतीगृहात स्वच्छतागृहसह 54 खोल्या आहेत. यामध्ये 3 अभ्यासिका कक्ष, 2 बहुउदे्दशीय कक्ष, 2 गृहपाल निवासस्थान, 2 गृहपाल कार्यालय, 1 अभ्यासकक्ष, दोन भोजनकक्ष, 2 खेळाची मैदाने, जॉगींग ट्रॅक, उद्यान, कार्यक्रमासाठी खुला मंच व वाहनतळ आहे.
श्री.बडोले म्हणाले, ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षण घेण्यास येणाऱ्या प्रत्येक मागास व गरजू विद्यार्थ्याने या वसतीगृहाचा योग्य उपयोग करुन स्वत:ला सक्षम करावे. तसेच फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार पुढे न्यावेत. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याच प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिष्यवृत्ती योजनेसाठी देशभरात आता एकच वेबपोर्टल होणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार लोकांपर्यंत पोहचवावा हाच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा उद्देश असून त्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री श्री.कांबळे म्हणाले,मोठया महानगरांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रयत्नशील आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील व या योजनांचा योग्य उपयोग करुन विद्यार्थ्यांनी स्वत: सह घरची आणि समाजाची सुधारणा करावी,
असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त पी.एस.कवटे यांनी तर आभार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एच.डी.डोंगरे यांनी मानले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.