पुणे : क्रांतीज्योती महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते, त्यांच्या विचारावरच राज्य सरकार काम करत असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.
मोशी ता. हवेली येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या २५० विद्यार्थी क्षमतेच्या मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन श्री. बडोले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमाताई साळवे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त एल.बी. महाजन, अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.ए. तेलंग, सहाय्यक आयुक्त के. एस. आढे उपस्थित होते.
श्री. राजकुमार बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचीत घटकांना शिकण्याचा संदेश दिला. हा समाज शिकला तरच त्यांची प्रगती शक्य आहे. त्यामुळे या वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. शहरात विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून राज्यशासनाच्यावतीने अनेक वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. मात्र उपेक्षीत समाजातील ज्या मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, त्यांच्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही शहरात वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शासन निर्वाह भत्ता देणार आहे. त्याच बरोबर विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सरकाने वाढ केली आहे. शिक्षणाबरोबरच या समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी विशेष योजनाही सरकाने आणल्या आहेत. तसेच डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राज्यातील वेगवेगळ्या ५० स्थळांचा सरकार विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, समाजातील शेवटच्या वर्गाचे हित डोळ्या समोर ठेवून राज्य सरकार काम करत आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवरच सरकारचे मार्गक्रमण सुरु आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून वंचित समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या बरोबरच आपल्या समाजाचा विकास साधण्याचे आवाहन श्री. कांबळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार एल.बी. महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.