पुणे- देशाच्या औद्योगिक क्षेत्राचे नेतृत्व महाराष्ट्र करत असून राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, आता भारत हा उत्पादन क्षेत्राचे हब म्हणून ओळखला जात असून त्यात महाराष्ट्राला देशात अग्रस्थान प्रात्प झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
फोर्स मोटर्सच्या चाकण येथील नवीन प्लँटचे उद् घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, मर्सिडीज बेंझ कंपनीचे फ्रँक डाईस, पीयुष आरोरा, ॲन्ड्र्यूज ॲग्ली उपस्थित होते.
जगभरात मॅन्यूफॅक्चरींग हब म्हणून चीनची ओळख आहे, मात्र आता भारत चीनलाही मागे टाकण्याच्या तयारीत असून भारताच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्राची महत्वाची भूमिका असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, युवा शक्ती हीच आपल्या देशाची शक्ती आहे. या युवा शक्तीला कौशल्याची जोड देण्यावर राज्य शासनाचा भर आहे. पंतप्रधानांचे “मेक इन इंडिया”चे स्वप्न सत्यात उतरत आहे. मर्सिडीज कंपनीचे इंजीन फोर्स कंपनीत तयार होत आहे, हाच याचा मोठा पुरावा आहे. मेक इन इंडिया बरोबरच येथील तरुणांच्या आणि उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना बळ देवून डिझाईन ऑफ इंडिया आपल्याला साकारायचा आहे. पुणे हे स्टार्ट अप हब असून येत्या काही दिवसातच पुणे बंगळूरच्या पुढे जाईल. राज्यातील युवकांमध्ये उंच भरारी घेण्याची क्षमता आहे, या क्षमतेला बळ देण्यासाठी त्यांचा कौशल्याधारीत विकास साधण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यापुढे पर्यावरण पुरक उद्योग विकास साधण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर म्हणाले, देशाचे औद्योगिक धोरण योग्य दिशेने जात असल्याने या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पावसाच्या प्रमाणाचा विचार करता यापुढे औद्योगिक क्षेत्रातही पाणी बचतीसाठी विशेष प्रयत्न करण्यावर शासन भर देणार आहे. राज्य शासनाचे जलयुक्त शिवार हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याचा दृष्य परिणाम लातूर सारख्या दुष्काळी भागातही दिसू लागला आहे. देशातील गुंतवणुकीसाठी एफडीआय अत्यंत आवश्यक असून हे धोरण स्वीकारताना देशाच्या संरक्षणाबाबत कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फोर्स कंपनीतील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोर्स मोटर्स कंपनीच्या नवीन सुरु करण्यात आलेल्या प्लॅन्टला भेट देवून तेथील कामाची माहिती घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोर्स मोटर्सचे प्रसन्न फिरोदीया यांनी केले. तर आभार चेअरमन अभय फिरोदीया यांनी मानले.






