पुणे-लंडनमध्ये विजेवर बस चालते, भारतातही तशी बस चालावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागणारी बॅटरी शास्त्रज्ञांनी तयार केली असून पुढील वर्षभरामध्ये भारतामध्ये विजेवर चालणारी बस, स्कूटर रस्त्यावर धावेल, असा विश्वास भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार, हरियाणामधील शिवयोग धामचे अवधूत शिवानंद, माजी मंत्री विनय कोरे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांना विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. तर, अवधूत शिवानंद आणि विनय कोरे यांनी यंदाचा डी.लीट हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गडकरी म्हणाले,‘‘ संशोधनामध्ये खूप मोठी ताकद आहे. संशोधनामुळे अनेक गोष्टी यशस्वी होऊ शकतात.ज्ञान, तंत्रज्ञानाचे रुपांतर संपत्तीमध्ये केले तरच आपला देश पुढे जाईल. इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केला. त्यामुळे संशोधनामध्ये खूप मोठी ताकद आहे हे त्यावरुन सिद्ध होते. देशाला दरवर्षी ७ लाख कोटी रुपयांचे इंधन खरेदी करावे लागते. हे महागडे आणि प्रदूषण करणारे इंधन आपण वापरतो. त्याऐवजी इथेनॉल वापरले तर फायदा होऊ शकतो. इथेनॉलची निर्मिती केली तर येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे देशामध्ये इलेक्ट्रिकल बायोडिझेल, इथेनॉल, मिथेनॉल निर्मितीचे कारखाने उभे राहिले तर देशातील शेतकरी इंधन देऊ शकतो.नागपूरमध्ये ५७ बस बायोडिझेलवर चालतात. यामुळे प्रदूषण कमी होऊन शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. लंडनमध्ये हिंदुजा बंधूंच्या अशोक लेलँड कंपनीची बस विजेवर चालते. त्या बसची किंमत दोन कोटींच्या आसपास आहे. त्या बसला लागणाऱ्या लिथियम बॅटरीची किंमत ५५ लाख असल्याचे कळले. इस्रोच्या शास्त्रज्ञांना बॅटरी तयार करायला सांगितले.त्यांनी ती बॅटरी तयार केली असून तिची किंमत फक्त पाच लाख आहे. संशोधनाने काहीही साध्य होऊ शकते. पुढील वर्षभरात लंडनप्रमाणेच देशात विजेवर चालणाऱ्या बस तसेच स्कूटर सुरु होतील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन सार्वजनिक वाहतूकही स्वस्त होणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.