पुणे – क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी श्रीकांत परांजपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून २०१७ ते २०१९ दरम्यान त्यांचा कार्यकाळ राहील. परांजपे यांनी क्रेडाईच्या कार्यकारी समितीत 20 वर्षांहून जास्त काळ काम केले आहे. ते यापूर्वी क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी २०१७ ते २०१९ या कार्यकाळासाठी रोहित गेरा, सुहास मर्चंट, अनिल फरांदे, किशोर पाटे (वाणी), अमर मांजरेकर,मनीष जैन यांची निवड झाली आहे. रणजीत नाईकनवरे यांची मानद सचिवपदी, अनुज भंडारी यांची मानद खजिनदारपदी व अतुल गोयल यांची मानद सहसचिवपदी निवड करण्यात आली.
क्रेडाई- पुणे मेट्रो ही पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असून तीची स्थापना १९८२ मध्ये झाली आहे. गेल्या ३५ वर्षापासून ही संघटना बांधकाम क्षेत्रातील आपल्या सभासदांच्या विकासासाठी काम करीत आहे. बांधकाम मजुरांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी क्रेडाईने कायमच प्राधान्याने उपक्रम हाती घेतले आहेत. क्रेडाईने सरकारी आणि निमसरकारी संस्थांशी समन्वय साधून विविध उपक्रम राबविले आहेत. तर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने क्रेडाई पुणे मेट्रोने बांधकाम मजुरांच्या आरोग्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी, एड्स विषयी जनजागृती, पोलीओ लसीकरण, यांसारखे विविध उपक्रम राबविण्यातही कायम पुढाकार घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी क्रेडाईने १६ हजाराहून अधिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात सहाय्य केले.
बांधकाम क्षेत्रात गेल्या तीस वर्षांत झाले नसतील असे महत्त्वाचे दूरगामी बदल येत्या काळात होणार आहेत. तसेच पीएमआरडीएमुळे पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला आणि विस्ताराला अभूतपूर्व चालना मिळणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे पुण्याचा चेहरामोहरा बदलून जाईल. या सर्व बाबींमुळे पुण्याच्या विकासाची घोडदौड सुरू होईल. पर्यायाने हे बदल होत असताना बांधकाम क्षेत्रावरही त्याचे चांगले परिणाम दिसून येतील व या क्षेत्रातही महत्त्वाचे बदल घडतील, त्यासाठी क्रेडाई प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून सांगण्यात आले.


