पुणे ता.१६ : रुग्णांसाठी अल्प दरात सेवा उपलब्ध करून देणारे ताराचंद हॉस्पिटल हे गरीबांचा आधारवड असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. शेठ ताराचंद रामचंद्र धर्मार्थ रुग्णालयामधील श्री रसिकलाल धारिवाल बाह्यरुग्ण विभाग व लोकनेते यशवंतराव चव्हाण सुविधा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, प्रसिद्ध उद्योजक रसिकलाल धारिवाल, रुग्णालयाचे अध्यक्ष दत्ताजीराव गायकवाड,विश्वस्त डॉ.सुहास परचुरे,अधीक्षक डॉ. सदानंद देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, पुण्यात अनेक चांगली रुग्णालये आहेत पण अल्पदरात रुग्णांना सेवा पुरवणारे रुग्णालय म्हटले तर ताराचंद रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या रुग्णालयाला गेल्या ९० वर्षांची परंपरा आहे. व्यापारीकरणाच्या या काळात गरीब रुग्णांना हे रुग्णालय ५० टक्के सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देते, हे अतिशय कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार गरीबांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून आम्ही हृदय विकारांसाठी लागणाऱ्या स्टेंट अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार हे सर्वसामन्यांचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यकाळात सरकार, समाज आणि संस्थांच्या माध्यमातून या रुग्णालयाला सर्वोतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गरीब रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या या रुग्णालयाला सहकार्य करताना आम्हाला गरिबांसाठी सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे सांगत भविष्यात या रूग्णालयाला लागेल ते सहकार्य महानगरपालिकेकडून देण्याचे आश्वासन देखील महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक रुग्णालयाचे अध्यक्ष दत्ताजीराव गायकवाड यांनी तर आभार डॉ. राजेंद्र हुपरीकर यांनी मानले.


