१६००० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
पुणे :- अॅनिमिया विषयी जनजागृती करण्याच्या विधायक उद्देशाने आज फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रेटिक अँड गायनालॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय) आणि एमक्युअर फार्मासुटिकल्स तर्फे देशातील एकाचवेळी एकूण ३५ ठिकाणी मोफत हिमोग्लोबिनची तपासणी (एचबी) शिबीर घेण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या या शिबिराचा लाभ सुमारे १६ हजारहून अधिक नागरिकांनी घेतला. या स्तुत्य उपक्रमाची दखल लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे. पिंपरीतील डी वाय पाटील हॉस्पिटल येथे डॉ. जितेंद्र भावलकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील एकूण २५०० पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल व डी वाय पाटील रुग्णालय येथे तर पुण्यातील भारती हॉस्पिटल, काशीबाई नवले हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटल याठिकाणी हे शिबीर घेण्यात आले. तर पुण्यासह महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नांदेड आणि मिरज अशा विविध शहरात एकाचवेळी हा उपक्रम पार पडला. नागरिकांचाही यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एफओजीएसआयच्या अध्यक्षा डॉ. रिश्मा पै , राष्ट्रीय समन्वयक डॉ. कनन येलीकर, ऋषिकेश पै,डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ.रीना वाणी, डॉ.गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या व्यापक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले .
याबद्दल माहिती देताना एफओजीएसआयच्या अध्यक्षा रिश्मा पै म्हणाल्या की, “ शरिरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यावर पंडुरोग म्हणजेच अॅनिमिया होतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात अॅनिमिया चे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातून उदभवणारे गंभीर आजार टाळण्यासाठी‘अॅनिमिया फ्री इंडिया’ ही मोहीम आम्ही हाती घेतली. अॅनिमियाविषयी जनजागृती करून वेळेस रूग्णांवर उपचार व्हावेत, हा या शिबिरामागील हेतू होता. या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची हिमोग्लोबिनची पडताळणी करण्यात आली.
त्या पुढे म्हणाल्या , शरिराला आवश्यक पोषणमूल्य न मिळाल्याने शरिरातील रक्ताचे प्रमाण घटते. विशेषत: आंबट, तेलकट, मसालेदार तसेच पचायला जड पदार्थांचं वारंवार सेवन केल्यानं शरिराला पोषणमूल्य कमी होऊन अॅनिमियाला सामोरे जाण्याची वेळ येते. विशेषतः स्त्रियांना याचे गंभीर परिणाम सोसावे लागत असल्याचे निरीक्षणात दिसून आले. डब्लूएचओच्या सर्वेक्षणानुसार, अॅनिमियाचे प्रमाण गर्भवती महिलांमध्ये ८७ टक्के, महिलांमध्ये ५५ टक्के, पुरुषांमध्ये २४ टक्के तर बालकांमध्ये ७० टक्के इतके आहे. गर्भधारणेच्या वेळेस अॅनिमियाचे वाढता दर तसेच उच्च बाल मृत्यू दर यास अॅनिमिया कारणीभूत असल्याचे दिसून येते. हे पाहता, या आजाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
स्त्रियांमध्ये अॅनिमिया मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने स्त्रियांसाठी कार्यरत असणाऱ्या एफओजीएसआय आणि एम्सक्युअर या संस्थांमार्फत घेण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.हेमंत देशपांडे, डॉ.गिरीजा वाघ, डॉ.राजेश दिघे, डॉ.तुषार पंचनंदीकर, डॉ. यशवंत कुलकर्णी, डॉ.कल्पना जमदाडे, डॉ. पी. टी. जमदाडे यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.