गोयल गंगा फाउंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्कार वितरण
पिंपरी ता. १५ :- “विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मुलामुलींचे आपल्याला केवळ यश दिसते. पण त्यांच्या अपयशात त्यांना खंबीरपणे साथ व प्रोत्साहन देणारे, त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे त्यांचे पालक असतात. म्हणूनच त्यांचा त्या यशात मोलाचा वाटा असतो. आज गुरुवर्य पुरस्काराने अशा पालकांचा होणारा गौरव म्हणजे यशस्वी पालकत्वाचा सन्मान आहे,” अशा शब्दांत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी गुरुवर्य पुरस्काराच्या संकल्पनेचे कौतुक केले.
पालकांच्या कष्टाला कौतुकाची थाप देण्यासाठी नुकतेच गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे या पुरस्कराचे आयोजन केले होते. यावेळी गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल,गीता गोयल,अतुल गोयल, सोनू गुप्ता गोयल,अरुण गुप्ता, इतिहासकार शिवप्रसाद मंत्री, इस्कॉनचे माजी उपाध्यक्ष बाल गोविंद दास , गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलीच्या परिश्रमात तिला खंबीरपणे साथ देणाऱ्या प्रसिद्ध टेनिसपटू अंकिता रैनाच्या आई ललिता रैना यांना, बेघर मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या राधिका दळवी यांना जयप्रकाश गोयल आणि विशाल सोळंकी यांनी सन्मानित केले. भारतीय महिला रग्बी संघाच्या कर्णधार वाहबिझ भरुचा यांचे प्रशिक्षक संजय कांबळे यांच्या वतीने वाहबिझ भरुचा हिनेच अतुल गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ऑलिंपिकमध्ये जलतरणात शानदार कामगिरी करणाऱ्या कॅमिला पटनायक हिच्या पालकांना बाल गोविंद दास यांच्या हस्ते तर अनुभवावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी आपल्या मुलींना होम स्कूलिंगच्या माध्यमातून शिकवणारे मंदार व सविता कापशीकर यांना शिवप्रसाद मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अतुल गोयल म्हणाले की,पालक हा मुलाचा पहिला गुरु असतो आणि म्हणूनच प्रत्येक यशस्वी व्यक्तिमत्वामागे कणखरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पालकांचा व गुरूंचा आहे. आपल्या मार्गदर्शनातून अनेक यशस्वी विद्यार्थी घडवून देशाच्या प्रगतीस मोलाचा हातभार लावणाऱ्या पालकांचा ,शिक्षकांचा, प्रशिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आम्ही गुरुवर्य यावर्षी पुरस्कार देत असतो.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पालकांसाठीच्या चर्चासत्राचे पार पडले. यावेळी आयआयटीचे प्राध्यापक मनीष जैन प्रात्यक्षिकांच्या आधारे पालकांना मार्गदर्शन केले. तेम्हणाळे की, केवळ पुस्तकी ज्ञान देणे आवश्यक नसून प्रत्येक उत्तरामागचे तर्कशास्त्र समजून घेण्यावर भर दिला जावा. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून घेतलेल्या शिक्षणामुळे विषयाचे आकलन सहजसुलभ होते. यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता व विषयातील रुची वाढण्यास मदत होते.
मानसशास्त्रज्ञ श्रीधर माहेश्वरी यांनी पालकांचे मुलांबरोबरचे नाते मैत्रीचे असावे. त्यांच्यामधील चूका दाखवण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालविणे , त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणे, त्यांच्याशी संवाद साधायला हवा. आपल्या कृतीतून मुलांना मार्गदर्शन करण्यावर भर द्यावा असा सल्लाही त्यांनी उपस्थित पालकांना दिला.
प्रीती बाणे यांनी पालकांना मुलांशी संवाद साधताना कोणकोणत्या प्रभावी संभाषण कौशल्याचा उपयोग केला पाहिजे ज्यामुळे मुले आपल्या कोणत्याही समस्यांविषयी पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतील, याविषयी मार्गदर्शन केले.
याशिवाय गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलसाठी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर व्यक्तींचा १० वर्ष केलेल्या कामासाठी सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृती नृत्याच्या माध्यमातून सादर करत एकीचा संदेश दिला.