पुणे : शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या हितासाठी बंद पडलेला ‘यशवंत’ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्री म्हणून मी आग्रही आहे. कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची सरकारची तयारी आहे. असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही पालकमंत्र्यांच्या बोलण्याला दुजोरा देत राज्य शासन याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे यशवंत कारखाना सुरु करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट,आमदार बाबुराव पाचार्णे, यांच्यासह कारखान्याचे प्रशासकीय मंडळ उपस्थित होते.
सहकारी साखर कारखाना हा त्या परिसरातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असतो. गेल्या काही वर्षापासून ‘यशवंत’ सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने या भागाचा आर्थिक विकास मंदावला आहे. कारखाना बंद पडल्याने शेतकरी व कामगार अडचणीत आहे. या भागाचा विकास व्हायचा असेल तर हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे. शेतकरी, कामगार यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असल्याने निर्णयप्रक्रियेत त्यांना सामावून घ्या. कारखान्याची सर्वसाधारण सभा घेवून गाळप सुरु करण्यासाठी येणाऱ्या सध्यस्थितीतील अडचणी सभासदांसमोर मांडा आणि सर्वानुमते निर्णय घ्या अशी सूचना पालकमंत्री बापट यांनी केली. यावेळी प्रशासकीय मंडळाने गाळप सुरु करण्याबाबत येणाऱ्या अडचणी सांगून यासाठी शासनाच्या सहकाऱ्याची अपेक्षा व्यक्त केली. कारखाना सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. सर्व अडचणीवर पर्याय काढून पुढील हंगामापर्यंत कारखान्याचे गाळप सुरु व्हावे यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.