पुणे-लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोदींविरोधात सुप्त लाट असल्याचे आढळून आले आहे. विदर्भात हे चित्र जागोजागी दिसले. त्यामुळे केंद्रातील भावी सरकार हे काँग्रेस आघाडीचे असेल असा विश्वास काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सोनवणे, गोपाळ तिवारी, सुनील शिंदे, शानी नौशाद आदी उपस्थित होते.
२०१४ साली सत्तेवर येण्यासाठी मोदी यांनी जी आश्वासने दिली होती त्यातील एकही आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही असे सांगून खासदार हुसेन दलवाई म्हणाले, या निवडणुकीत देखील मोदी, आपल्या सरकारने काय विकास केला हे न सांगता राष्ट्रवाद, देशभक्ती अशा गैरलागू मुद्यांवरच बोलत
आहेत. प्रचाराला मुद्दे नसल्याने महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर त्यांच्याकडून केली जाणारी वैयक्तिक टीका निषेधार्ह आहे असेही ते म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर यावे अशी इच्छा व्यक्त करतात त्यावरून उभयतांमध्ये नक्कीच
‘साटेलोटे’; झाले असावे अशी शंका येते असे सांगून दलवाई म्हणाले, पाकिस्तान नव्हे तर भारतातील मुसलमान हे मोदी सरकारचे ‘लक्ष्य’आहे.
महाराष्ट्र सरकार हे घोटाळेबाज मंत्र्यांचे सरकार आहे असे सांगून खा. दलवाई म्हणाले, तूरडाळ- घोटाळा, चिक्की-घोटाळा, औषध-घोटाळा, शैक्षणिक घोटाळा असे अनेक घोटाळे महाराष्ट्रात झाले आहेत त्यामुळे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून परदेशी पळून जाणाऱ्यांची संख्या मोठी असेल असेही त्यांनी
उपहासाने सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी जहाल मुस्लिम नेते ओवैसी यांच्याशी युती करून वंचित विकास आघाडी स्थापन केल्यामुळे दलित समाज नाराज आहे हा समाज काँग्रेसच्याच पाठीशी आहे.
त्यामुळे राज्यात वंचित विकास आघाडीचा काँग्रेस आघाडीवर परिणाम होणार नाही असे दलवाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी पालकमंत्री म्हणून केलेल्या अकार्यक्षम कारभारावर टीका केली. गेल्या पाच वर्षात वारंवार मागणी करूनही त्यांना ‘म्हाडा’घरकुलासंबंधी साधी नियमावली तयार करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले. अकलूज येथील भाजपच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षातर्फे लवकरच कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मोदींविरोधात सुप्त लाट-केंद्रात सरकार काँग्रेस आघाडीचे येईल -खा. दलवाई
Date: