- महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीसाठी मदत करण्याची शिष्टमंडळाची इच्छा
- मुख्यमंत्र्यांना दिले शांघाय भेटीचे निमंत्रण
- महाराष्ट्रात चीनच्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत श्री.झेंग यांच्यासह चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री चेन फेनझिंग, शांघाय महानगरपालिकेचे उपमहापौर झोऊ बो, यांच्यासह २५ जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई महानगर प्राधिकरण विकास मंडळाचे आयुक्त यू.पी.एस. मदान, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेठी, शांघायमधील भारताचे कौन्सिल जनरल प्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई व शांघाय शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी करार आता पुढील टप्प्यात नेण्यात येऊन या शहरांमधील नाते आणखी घट्ट करण्यात येईल. शांघायमधील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनने तेथील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे. आम्ही या कंपन्यांचे स्वागत करून त्यांना सर्व सहकार्य करू. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून चीनमधील जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक, उत्पादन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करावी.
महाराष्ट्रातील अनेक उद्योजक शांघायमध्ये आहेत. तसेच शांघायमधील अनेक उद्योजक महाराष्ट्रात आहेत. ही द्विपक्षीय मैत्री अशीच पुढे सुरू रहावी, अशी इच्छा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतामध्ये बॉलिवूडचे महत्त्व मोठे आहे. बॉलिवूडचा महत्त्वाचा आयफा पुरस्कार वितरण कार्यक्रम लवकरच शांघाय येथे होणार आहे. शांघायवासीयांना तसेच चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. त्या कार्यक्रमासाठी चीन शासनाने व कम्युनिस्ट पक्षाने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. ‘आयफा’ पुरस्कार वितरण सोहळ्यास चीन सरकार व पक्षातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.
श्री.झेंग म्हणाले, महाराष्ट्र हे भारतातील एक महत्त्वाचे राज्य असून आर्थिक व वित्तीय क्षेत्राच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे कार्य चीनमधील जनता अजूनही विसरली नाही. त्यामुळे महाराष्ट्राबरोबर सहकार्य करण्यात आम्हाला आनंद आहे. शांघाय व मुंबई या दोन्ही शहरांमध्ये खूप साम्य असून ही दोन्ही शहरे त्या त्या देशाची वित्तीय व आर्थिक केंद्रे आहेत. या दोन्ही शहरांमध्ये झालेल्या मैत्री कराराच्या पुढच्या टप्प्यासाठी कम्युनिस्ट पार्टी सर्व मदत करेल.
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात दुष्काळ पडत आहे. अशा परिस्थितीवर उपाय योजण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चीन सरकार व पक्षातर्फे मदत करण्याची इच्छा श्री.झेंग यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची त्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र व शांघायमधील उद्योगांची देवाणघेवाण आणि सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येतील. शांघाय व महाराष्ट्रातील हे मैत्रीपूर्ण संबंध वाढावे, यासाठी पक्षातर्फे सर्वतोपरी मदत करू. हे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांघाय शहराला भेट द्यावी, असे निमंत्रणही श्री. झेंग यांनी यावेळी दिले.
श्री.झेंग यांच्या निमंत्रणाबद्दल त्यांचे आभार मानून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लवकरच शांघाय शहराला भेट देण्याचे आश्वासन दिले.