पुणे- शहरी नक्षलवादाचा धोका कायमस्वरूपी प्रभावीपणे संपविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. रावत बोलत होते. आरपीआयचे (ए) प्रसिद्धी प्रमुख ऍड मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रावत म्हणाले, ‘माओवादाचे लोकशाहीला थेट आव्हान आहे. परिवर्तन बंदुकीतूनच होते अशी त्यांची भूमिका आहे. राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य संविधानाद्वारे मिळू शकते यावर त्यांचा विश्वास नाही. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. धर्मांमध्ये आणि जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे हेतू हाणून पाडले. मोदी सरकारने शहरी नक्षलवाद्यांचे आवाहन मोडून काढल्याने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारला निवडून देणे गरजेचे आहे.’
रावत पुढे म्हणाले, ‘नागरी क्षेत्रात नक्षलवाद्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात सैन्यदल लढत असते. नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून काढावी लागणार आहेत. अंतर्गत सुरक्षेच्या धोक्याची जाणीव सर्वांना करून देणे आवश्यक आहे. तरूणांना तथ्य समजावून सांगणे हे आव्हानात्मक काम आहे. हा वैयक्तिक संघर्ष नसून वैचारीक लढा आहे.’

