पुणे- आंतरराष्ट्रीय कविता दिनाचे औचित्य साधून प्रेरणा आर्ट फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद येथे काव्यमैफलचे आयोजन करण्यात आले होते. या काव्यमैफला अनेक कवींनी हजेरी लावून उस्फूर्त प्रतिसाद दिला. मानवी भाव – भावनांचा ठाव घेणारा अविष्कार म्हणजे कविता होय. मानवी मनाला सुसंस्कारित करणाऱ्या कवितेबद्दल जनसामान्यांचा आपलेपणा वाटावा, म्हणून युनेस्कोने १९९९ पासून आंतरराष्ट्रीय कविता दिनाला सुरवात केली.
आपल्या मराठी भाषेतील काव्यसंसार समृद्ध करणारे आद्यकवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई त्याच बरोबर मराठी कवितेला आधुनिक रूप देणाऱ्या केशवसुतांपासून गोविंदाग्रज, बालकवी, कुसमाग्रज, नारायण सुर्वे, विदा करंदीकर यांच्यापर्यंत अतिशय दमदारपणे कवितेंची वाटचाल आहे. कवितेच्या प्रांगणात लक्ष लक्ष दीप लावणाऱ्या या कवींचा मराठी काव्यात मोलाचा वाटा आहे.
कवी अनिल कांबळे प्रस्तुत व ज्योत्सना चांदगुडे आयोजित या कार्यक्रमात चित्रपट निर्माती अभिनेत्री भाग्यश्री देसाई, हेमंत जोगळेकर, भूषण कटककर आदींचा सहभाग होता. यावेळी भाग्यश्री देसाई यांच्या
‘अजून आठवतय मला
ते गाव, तो रस्ता,
ते दुकान, तुझं घर, आणि ते चाफ्याचे झाड.
या कविताने उपस्थितांची मने जिंकून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.
या कार्यक्रमात अनेक कवींनी सहभाग घेतला होता. त्यात अभिनेत्री भाग्यश्री देसाई संदीप अवचट, संगीता बर्वे, तेजस्विनी शिरोडकर, मंजिरा पाटील, वि. दा. पिंगळे आदी कवी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिकम शेखावत यांनी केले.