पुणे :
सौरउर्जा वापराबद्दल जागरुकता वाढल्याने, तंत्रज्ञानाने सौर वस्तुंची आकर्षकता आणि टिकाऊपणा वाढल्याने आगामी काळात सौर उपकरणे निर्मिती क्षेत्रात क्रांती होणार असल्याचे मत ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’मध्ये आयोजित सादरीकरणात व्यक्त करण्यात आले.
‘इनो-सोलर एनर्जी प्रा.लि.’ ने आयोजित या सादरीकरणात ‘वामॉल’, ‘हुआई’, ‘वारी’ ’ऊन्पा’या सौरउर्जा उपकरणे निर्मिती कंपन्यांंनी भाग घेतला. सौरऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, उत्पादक, व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.
उदय धारिया (मुख्य कार्यकारी अधिकारी ‘वामॉल’), ‘वामॉल’चे शीतल दोशी, ‘वारी’ चे योगेश बोरसे, ‘हुआई’चे नितीन कापडणीस, ‘इनो-सोलर एनर्जी प्रा.लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेश जगताप यांनी सौरऊर्जा क्षेत्रातील बदलांची माहिती उपस्थितांना दिली.
उदय धारिया म्हणाले, ‘सौरउर्जा उपकरणे सुंदर, टिकावू आणि उपयुक्त बनू लागल्याने त्यांचा वापर वाढला आहे. गार्डन लाईट, स्मार्ट स्ट्रीट लाईट पासून पॉवर बँकेपर्यंत अनेक गोष्टी ग्राहकांना पसंत पडत आहेत.
नितीन कापडणीस म्हणाले, ‘भारतात मोठ्या प्रमाणावर सौरउर्जा मिळविण्यासाठी रुफटॉप सोेलर एनर्जी प्रकल्प उभारले जात आहेत. ग्रामीण भागात उर्जा पोहोचविण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील.’
‘ग्रामीण भागात टी.व्ही., फ्रीझ पासून गृहोपयोगी प्रत्येक गोष्ट आगामी दशकात सौरउर्जेवर चालताना दिसणार आहे. त्यादृष्टीने कंपन्यांनी सौर उपकरणांच्या किंमती परवडण्यायोग्य होतील याकडे लक्ष दिले पाहिजे.’ असे ‘इनो-सोलर’चे उन्मेश जगताप यांनी सांगितले. पुण्याजवळील रुळे व अंबी गावात दुर्गम भागातील घरांसाठी सोलर कीट्स व हॉस्पीटल साठी उभारण्यात आलेल्या रुफटॉप सोेलर एनर्जी प्रकल्पाची यशगाथा यावेळी सांगण्यात आली.
या प्रसंगी नविन तंत्रज्ञाने बनविलेली स्मार्ट सोलर स्ट्रीट लँप्स , ग्रामीण घरांसाठी सोलर होम कीट्स व सोलर फ़्रीज़ सादर करण्यात आले.
इनो-सोलरच्या बिझनेस हेड अश्विनी जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बाळासाहेब जगताप, डॉ.सुनील जगताप, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.