“बघ हं, ही कशी वाटते डॉल? की ही घेऊ?” माधवीच्या या प्रश्नाने मी भानावर आले. मॉलमधील एक मोठ्या खेळण्याच्या शॉपमध्ये आम्ही येऊन ठेपलो होतो. माधवीच्या मुलीच्या मैत्रिणीसाठी डॉल हवी होती. शॉपमधील रॅकवर नाना तऱ्हेच्या बाहुल्या म्हणजेच डॉल्स मांडून ठेवल्या होत्या. किती आकर्षक, सुबक, नाजूक, छान-छान कपड्यांनी सजविलेल्या. कुणी फ्रॉक, कुणी साडी तर कुणी पंजाबी ड्रेस…बार्बी डॉल…बघतच बसावंसं वाटलं त्यांच्याकडे. हाच अनुभव आशु मावशींच्या (आशा कुलकर्णी) घरी गेले की येतो. त्यांच्याकडे काही बार्बी डॉल नाहीत परंतु त्यांनी स्वतः बनविलेल्या भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील पारंपरिक वेशभूषेतील बाहुल्या आहेत. (१९७८-७९ साली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या ‘इंटरनॅशनल डॉल्स एक्झिबिशन’मध्ये आशु मावशींनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.)
बार्बी डॉल…आमच्यावेळी नव्हत्या ना अशा डॉल! साधी प्लास्टिकची बाहुली असायची, ती ही बहुदा जत्रेत घेतलेली. असे मोठ्ठाले मॉल त्यावेळी नव्हते, खेळण्यांची छोटी-छोटी दुकाने असायची. मला आठवतं त्यावेळी दादरला डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये एक आणि रानडे रोडला दोन-तीन खेळण्यांची दुकाने होती.
मोठ्या डोळ्यांची, चपट्या नाकाची. पण तरीही ती बाहुली खूप सुंदर वाटायची. मग तिला सजवलं जायचं, आईच्या जुन्या साडीचा तुकडा गुंडाळून. तिला टिकली लावायचो आणि एवढचं काय तर बाहुला-बाहुलीचं लग्नही लावून द्यायचो. आता हे सगळं आठवलं की मजा वाटते व हसूही येतं.
काळानुरुप सगळंच बदलत गेलं. छोटी-छोटी दुकानं जाऊन आता भव्य मॉल आले. खेळण्यांचे नवनवीन प्रकार आलेत, बाहुलीचं रूपही बदललं…ती मॉडर्न बार्बी डॉल झाली. आता तर बार्बी डॉलबरोबर वेगवेगळे सेट ही मिळतात. फॅशन सेट, हाऊस सेट, बार्बी ड्रीम विथ बिग टेबल…
माझ्या विचारांत मी गढून गेले होते आणि तिकडे माधवी बार्बी डॉल घेण्यात मग्न होती. शेवटी एकदाची तिला हवी तशी बार्बी डॉल घेऊन आम्ही दुकानातून बाहेर पडलो ते बाहुलीच्या आठवणीत रमतच. डोळ्यांसमोर होती, ती मोठे डोळे असणारी बाहुली आणि त्याबरोबर बाहुलीची कविताही –
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली…
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068