आदिवासी जीवनावरील ‘बैगा ट्रेल्स’ कला प्रदर्शनाचे उद्घाटन आदिवासी कलेला शहरांनी आपलेसे करावे : बाबासाहेब पुरंदरे
पुणे :
‘कान्हा अभयारण्यातील ‘बैगा’ आदिवासींच्या जीवनावरील त्यांच्यातील कलाकारांनी काढलेली चित्रे आणि काष्ठशिल्पे पाहून मी भारावून गेलो आहे. आदिवासींना आपण दूर लोटता कामा नये, तर या कलेला शहरांनी आपलेसे केले पाहिजे’ असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.’
‘फूटलुज जर्नीज’ आणि ‘सिनर्जी हॉलीडे व्हिलेज’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘बैगा’ आदीवासींचा जीवनप्रवास आणि त्यांचे जंगलाशी जोडलेले नाते आदी विषयांवर आधारित चित्रांचे आणि लाकडी कलाकृतींच्या ‘द बैगा ट्रेल्स’ या प्रदर्शनाचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी सकाळी झाले. यावेळी ते बोलत होते. हे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत आणि पुण्याचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, आदिवासी जमातींच्या छायाचित्रातून डॉक्यूमेंटेशन करणारे अभ्यासक, प्रसिद्ध छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांच्या हस्ते बालगंधर्व कलादालन येथे झाले.
‘कान्हा’ अभयारण्यात ‘बैगा’ आदिवासींसमावेत राहणार्या आशिष कच्छवाह आणि मनोज द्विवेदी या दोन स्थानिक कलाकारांच्या चित्रे, काष्ठ शिल्पांचे हे प्रदर्शन असून, ते दिनांक 24, 25 आणि 26 नोव्हेंबर या दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित केले आहे.
‘बस्तर भागातील आदिवासींच्या भेटीचे अनुभव सांगत बाबासाहेब पुरंदरे यांनी आदिवासी जीवनाची वैशिष्ट्ये सांगितली. शिवाजी महाराजांच्या सैन्यातही ‘गोंड’ आदिवासींचा समावेश होता. मात्र, आपण हे योगदान विसरून चाललो आहोत, असे ते म्हणाले. कान्हा अभयारण्यातील ‘बैगा’ आदिवासींच्या जीवनावरील त्यांच्यातील कलाकारांनी काढलेली चित्रे आणि काष्ठशिल्पे पाहून मी भारावून गेलो आहे. आदिवासींना आपण दूर लोटता कामा नये, तर या कलेला शहरांनी आपलेसे केले पाहिजे’ असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
पुण्याचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘या आदिवासी कलाकारांनी पुणे भेटीत आसपासच्या आदिवासींची भेट घ्यावी’ असे सुचवले तर छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी ‘बैगा’ आदिवासींपासून 180 आदिवासी जाती-जमातींच्या छायाचित्रणाच्या अनुभवाचा रोचक प्रवास उलगडून दाखवला. निसर्ग रक्षण, कमी गरजा, एकत्रित कुटुंब व्यवस्था, कलाप्रेम अशा आदिवासींच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख वक्त्यांनी केला.
आशिष कच्छवाह आणि मनोज द्विवेदी या दोन्ही कलाकारांनी मनोगत व्यक्त केले. ‘फूटलुज जर्नीज’चे संस्थापक परेश देशमुख, पूजा देशपांडे, ‘सिनर्जी हॉलीडे व्हिलेज’ चे राजेंद्र आवटे, गणेश जाधव यांनी स्वागत केले. आकाश चोकसे यांनी सूत्रसंचालन केले. मंदार देवगावकर यांनी आभार मानले.