पुणे :
‘सद्य:स्थिती पाहता देशात राष्ट्रीय चारित्र्याची आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रयत्नांची अधिक गरज आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र धर्माचे ज्वलंत प्रतिक असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या येत्या 7 एप्रिलच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘धर्मवीर संभाजीमहाराज अभिमान गीत’ सीडीचे बुधवारी 30 मार्च रोजी सकाळी प्रकाशन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
‘धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा समिती’तर्फे या गीताची निर्मिती करण्यात आल्याची माहिती संयोजक संदीप भोंडवे आणि अॅड. गणेश सातपुते, ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते महेंद्र महाडिक यांनी दिली. हा कार्यक्रम बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी झाला. नंदेश विठ्ठल उमप यांनी हे गीत गायले आहे. सात्विक ठकार यांनी लिहिले आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन असे या अभिमान गीताचे स्वरूप आहे.
याप्रसंगी बोलताना बाबासाहेब पुरंदरे म्हणाले ‘राष्ट्रासाठी प्राण पणास लावणे, विधायक गोष्टींचा हट्ट धरणे, त्यासाठी नेट लावणे हे महाराष्ट्रीयांच्या रक्तात आहे. संभाजी महाराजांच्या पराक्रमाला हीच पार्श्वभूमी आहे. ‘संभाजी महाराज अभिमान गीतांच्या निमित्ताने ही प्रेरणा तरूणांकडे पोहोचेल. अभिमान गीताचा हा नवा उपक्रम आनंददायक आहे. कलेच्या माध्यमातून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणे हा स्तुत्य उपक्रम आहे.’
या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर शिवले, विपुल शितोळे, सचिन पलांडे, महेंद्र महाडिक सात्विक ठकार उपस्थित होते. दीपक बिडकर यांनी प्रास्ताविक केले.

