पुणे-स्वरसम्राट महमंद रफी यांचे सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम ‘वन्समोअर रफीसाहब’ हा कार्यक्रम रसिकांच्या मनात महमंद रफींच्या आठवणी जागवून गेला. पुणे नवरात्रौ महोत्सवात सोमवारी सायंकाळी झालेल्या हा कार्यक्रमात ‘आने से उसके’, ‘तुझे जीवन कि डोर’, ‘आसमान से आया’, ‘दिल तेरा दिवाना है’, ‘गुलाबी आँखे’, ‘बार बार देखो’, ‘ओ हसीना जुल्फोवाली’, ‘मैं जट यमला पगला’, अशा अनेक बहारदार गाण्यांनी केवळ टाळ्याच मिळवला असे नाही तर वन्स मोअर ही मिळवले.
महमंद रफी यांच्या अजरामर झालेल्या अनेक गाण्यांपैकी निवडक २० गाणी यावेळी मंचावर सादर केली गेली. याच बरोबर ‘मेरे मितवा’ व ‘बदन पे सितारे’ हे दोन महमंद रफींची मशहूर गाणी प्रेक्षकांच्या फर्माईश नुसार देखील गायली गेली. या व्यतिरिक्त ‘तुने मुझे बुलाया’, ‘सबसे बडा तेरा नाम’ ही दोन देवीची गाणीही त्यांनी सादर केली तेव्हा प्रेक्षकांनी सारे प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून टाकला. मुख्य गायक गफार मोमीन व रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे या चारही गायकांना रसिक प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळत होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन चिंतन मोढा यांनी केले. निवेदन मनिष गोखले यांनी केले. कार्यक्रमाला कीबोर्डवर सईद खान, ड्रमवर केविन रुबबी, रिदम मशीनवर आसिफ खान इनामदार तर ढोलक-तबल्यावर गोविंद कुडाळकर यांनी साथसंगत दिली.
या कार्यक्रमाचे निर्माते व मुख्य गायक गफार मोमीन यांच्या सत्कार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी बाकी कलावंतांचे सत्कार केले. या प्रसंगी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, दादामामा कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, हेमंत बागुल, सागर आरोळे इत्यादी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमास रसिकांनी मोठी गर्दी केली होती.