पुणे-‘शेतक-यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘राज्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शेतक-यांच शिष्टमंडळ सोबत आल्यास या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी आहे,’ असेही अण्णांनी म्हटले आहे.
शेतकरी संपाच्या दुस-या दिवशी म्हणजे आज (शुक्रवारी) अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ‘सहन करण्याची क्षमता संपल्यान शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. सरकार दाद देत नसल्यामुळेच त्यांना कायदा हातात घ्यावा लागत आहे. अशा वेळी सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी, असे अण्णांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शेतमालाला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने शेतक-यांची कशी वाताहत होते हे मी लहानपणापासून माझ्या घरातच अनुभवल आहे. आंदोलक शेतक-यांच्या वेदनांची मला जाणीव आहे. मात्र, हे आंदोलनं शांततेनं झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
या आंदोलना संदर्भात काही कार्यकर्ते आपल्याकडे दोनवेळा आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा झालेल्या आहेत. अहिंसेच्या मार्गाने, कायद्याचे उल्लंघन न करता प्रदीर्घ कालावधीसाठी दिशी ठरवून आंदोलन होणे आवश्यक वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतक-यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे. ते चर्चेला तयार आहेत. शेतक-यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.