मुंबई : अमिताभ बच्चन आणि अमृता फडणवीस यांच्यावर चित्रित बहुचर्चित ‘फिर से’ गाण्याचा विडिओ
नुकताच लाँच करण्यात आला. टी – सिरीजतर्फे अनावरण झालेला हा सोहळा मुंबईच्या पीव्हीआर, जुहू या ठिकाणी
पार पडला. या सोहळ्याला गाण्याचे दिग्दर्शक अहमद खान, संगीतकार जीत गागुंली, रचनाकार रश्मी विराग,
अरेंजर अभिजीत वाघानींसोबत टी – सिरीज चे सर्वेसर्वा भूषण कुमार आणि खुद्द अमिताभ बच्चन उपस्थित होते.
उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या स्वप्नांवर विश्वास असला की ती स्वप्न पूर्ण होतात अशा आशयाचं हे गाणं
मुंबईच्या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रित करण्यात आलं. ज्यात अमृता फडणवीस, अमिताभ बच्चन यांच्या पर्फोर्मिंग आर्ट्स
इन्स्टिट्यूटमध्ये दाखला मिळवण्यासाठी तिथे जातात आणि पुढे हे गाणं येत. 2016 च्या उत्तरार्धात ट्विटरवरून
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.
अमृता फडणवीस यांनी यापूर्वी कुणाल कोहलींच्या ‘फिर से’ तर प्रकाश झांच्या ‘जय गंगाजल’ या
चित्रपटांसाठी ही गाणी गायली आहेत. प्लेबॅक सिंगिगनंतर आता ‘फिर से’ या गाण्यासह त्या प्रेक्षकांसमोर आल्या
आहेत. याविषयी बोलताना त्या म्हणतात, “गाण्याचं नाव जरी फिर से असलं तरी बऱ्याचशा गोष्टी या गाण्यात
माझ्यासाठी ‘पहली बार’ घडतायत. पहिल्यांदाच मी एका हलक्या – फुलक्या गाण्याला आवाज दिला आहे,
पहिल्यांदाच मी या गाण्याच्या निमित्ताने स्क्रिन वर दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच मी
अमिताभ बच्चन जींसोबत स्किन शेअर करणार आहे.” बिंग बींबरोबर काम करण्याच्या या पहिल्या-वहिल्या
अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी विडिओसाठी त्या निश्चिंत असल्या तरी अमितजींसारख्या दिग्गजाबरोबर काम
कराण्याचं दडपण आल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र पुढे बोलताना अवघ्या काही शॉट्सनंतर अमितजींनी त्यांच्या
वागण्यावरून हे दडपण बाजूला सारल्याची कबूलीही त्यांनी दिली. दरम्यान यावेळी बोलताना शेवटी अहमद खान
यांच्या विलक्षण कलाकृतीचं कौतुक करत जीत गांगुलींसारख्या उत्कृष्ट संगीतकाराने हे गाणे संगीतबध्द केल्याचा
आनंद व्यक्त केला. शिवाय भूषण कुमार एक उत्तम निर्माते असल्याचे ही त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थित अमिताभ बच्चन यांनी केवळ सौ. फडणवीस यांच्यासाठी या विडिओला होकार न दिल्याचे
म्हणत कोणत्याही महिलेला नाही म्हणणे त्यांना कठीण जात असल्याची कबूली त्यांनी दिली. दरम्यान ही एक सुंदर
अनुभूती असल्याचे म्हणत सौ. फडणवीस यांची इच्छाशक्ती आणि जिद्द या गाण्याला होकार देण्यासाठी पुरेशी
असल्याचे, ते म्हणाले.