पुणे-भाजपाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत आहेत. हा भाजपाच्या आमदारांना आलेला सत्तेचा माज म्हणायचा का ? मुलींना काही त्यांचे अधिकार आहेत की नाहीत ? मुलांना ज्याप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे तसाच मुलींना सुद्धा आहे. मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ ही कुठली भाषा ? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी? ही घमंडशाही म्हणायची का? असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.
एखादी चूक झाली तर भारतीय संस्कृतीमध्ये माफी मागण्याची पद्धत आहे. मात्र साधा खेदही व्यक्त केल्याचे दिसले नाही. याचा मी निषेध व्यक्त करतो. हा कसला माज ? सत्तेचा की अजून कसला ? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असे देखील अजित पवार म्हणाले.

