पुणे: वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद न देणार्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम आणखी तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मोठ्या थकबाकीदार योजनांचा तसेच संस्थांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यांत दरमहा वीजबिलांची वसुली ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा कमी झालेली आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही. वसुलीअभावी वीजबिलांच्या थकबाकीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने थकबाकीदार सर्वच छोट्या-मोठ्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकीत वीजबिलांच्या वसुली कामात हयगय करणार्या अधिकार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील मान पंचायत समितीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वीजबिलापोटी या योजनांकडे 1 कोटी 14 लाखांची थकबाकी आहे. तसेच खटाव पंचायत समितीच्या वडूज, मायनी, खटाव येथील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा 5 कोटी 52 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात दौंड येथील चासकमान प्रकल्पाचे वरवंडा, पडवी पाणीपुरवठा योजनेचे दोन कनेक्शन 42 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित केले आहे. तसेच इंदापूर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा 4 कोटी 92 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला. तर चाकण येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेकडे 25 लाख व वडगाव मावळ येथील पाणीपुरवठा योजनेकडे 23 लाख रुपयांची थकबाकी असून नियमानुसार उद्या दि. 2 फेब्रुवारी या दोन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर वीजपुरवठा खंडित करण्याची अंतिम नोटीस मिळाल्यानंतर वाघोली व आळंदी येथील पाणीपुरवठा योजनांकडे असलेली 17 लाखांची थकबाकी भरण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने दि. 1 फेब्रुवारीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकबाकीदारांविरोधात सुरु असलेल्या कारवाईची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश असलेली वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व सोलापूर येथील वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून थकबाकीदारांना करण्यात आले आहे.
थकबाकीदारांविरोधात महावितरण आक्रमक पश्चिम महाराष्ट्रात अनेक योजनांचा वीजपुरवठा खंडित
Date: