पुणे–
” अभिवाचन तसेच काव्य, चित्र आणि संगीताच्या माध्यमातून ‘पंढरीचा विठोबा’ आणि ‘रुक्मिणी’ यांचे एकेक ऋणानुबंध उलगडत गेले आणि रसिक श्रोत्यांनी त्यास वेळोवेळी टाळ्यांच्या गजरात पसंतीची दाद दिली. निमित्त होते ‘सेतू’ या अभिवाचन मंचाच्या उदघाटनाचे. जागतिक ग्रंथदिनाचे औचित्य साधून ‘कमला नारायण कला मोहिनी’ आणि ‘आल्हादिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेतू’ या अभिवाचन मंचाचे उद्घाटन रविवारी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. अरुणा ढेरे यांनी, साभिनयासह शब्द जिवंत करणाऱ्या ‘सेतू’च्या या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
‘सेतू’ या अभिवाचन मंचाच्या शुभारंभी ‘वाट पंढरीची’ हा अभिवाचनाचा प्रयोग सादर झाला. यावेळी विदुषी दुर्गा भागवत यांचा ‘पंढरीचा विठोबा’ आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘रुक्मिणी’ अशा दोन ललित निबंधाचे अभिवाचन गीतांजलि अविनाश जोशी, दीपाली दातार, मुग्धा धायगुडे आणि मुकुंद दातार यांनी केले. अरुण कोलटकर यांची ‘वामांगी’ आणि ‘अरुणा ढेरे यांची ‘रंगमहाली विठुच्या’ या दोन कविता मुग्धा धायगुडे यांनी सुरूवातीला सादर केल्या. या कार्यक्रमाची संहिता गीतांजलि जोशी यांनी लिहिली होती. मुकुंद दातार यांनी या कार्यक्रमाला साजेसे असे पार्श्वसंगीत दिले आणि ललित निबंधातील अभंग आपल्या मधुर आवाजात गाऊन श्रोत्यांची वाहवा मिळवली. नीता तोरगट्टी आणि सत्यश्री मांडके यांनी या विषयाला अनुरूप अशी जलरंगात काढलेली चित्रे या कार्यक्रमाच्याचे खास आकर्षण होते. शब्द, चित्र आणि संगीत अशा त्रिवेणी स्वरूपातून साकारलेली ही अभिवाचन मैफिल रसिकांना पंढरीच्या ओल्या वाटेने घेऊन गेली. प्रारंभी दीपाली दातार यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘सेतू’च्या उपक्रमामागची भूमिका मांडून या माध्यमातून सातत्याने वेचक आणि वेधक साहित्याचे अभिवाचन करण्यासाठी ‘सेतू’ प्रयत्नशील राहील असे सांगितले.
‘सेतू’ च्या अभिवाचन मैफिलीस रसिकांची दाद
Date:

