पुणे-पुणे महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ अंदाजपत्रकातील विकास व भांडवली खर्चासाठी अपेक्षित असलेला रकमेपैकी २००० कोटी रुपये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरावे अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.
केंद्र सरकारने २२ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनला नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकार देखील विविध उपाययोजना करून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्य सरकार बरोबरच पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व इतर विभाग कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोशीने काम करत आहे. यामुळे नक्कीच कोरोनाला पुणेकर हरवतील असा विश्वास आहे. असे आबा बागुल म्हणाले
आबा बागुल म्हणाले की , पुणे महानगरपालिकेने सन २०२०-२१ साठी ७३९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असून या मध्ये विकास व भांडवली कामांसाठी ३०९३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च पुणेकरांनी कर रूपाने दिलेल्या पैशातून केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही पुणेकराचा जीव जाऊ नये व कोणताही पुणेकर उपाशी राहू नये. यासाठी जे उपाययोजना पुणे महानगरपालिकेला करता येतील त्या कराव्यात त्यासाठी विकास व भांडवली कामांच्या खर्चासाठी अपेक्षित असलेली रक्कमेपैकी २००० कोटी रुपये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास वापरून इतर महानगरपालिकेना पुणे महानगरपालिकेने आदर्श दिला पाहिजे. विकासकामे दरवर्षी होतात व ती पुढे होतीलही परंतु कोरोना सारख्या भस्मासुराला येथेच रोखाने गरजेचे असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीची वाट न पाहता हा निर्णय घेणे गरजेचे आहे.
पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात कोरोना सेंटर सुरु केलेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग त्याचा स्थर बदलत असून येत्या काळात आणखी सतर्कतेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णांसाठी नवीन कोरोना सेंटर उभारणे, अद्यावत आयसीयू तयार करणे , नवीन व्हेंटिलेटर, औषधांचा पुरवठा, डॉक्टरांसाठी पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेन्ट), गॉगल मास्क व हात मोजे खरेदी करावेत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वृद्ध, अपंग व गरीब तसेच होम कोरोनटाईन केलेल्या नागरिकांना औषधांचा पुरवठा व दोन वेळचा डबा किंवा मोफत शिधा हे पुणे महानगरपालिकेने घरपोच देणे यासारख्या अनेक उपाययोजनाकरिता पुणे महानगरपालिकेकडे पुरेश्या निधीची गरज असून भविष्यात कोरोना व अन्य संसर्गजन्य रोगाला लढण्यास पुणे महानगरपालिकेची यंत्रणा भक्कम करण्यासाठी स्थायी समिती व मुख्यसभा मंजुरी देईल हे गृहीत धरून पुणे महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकातील विकास व भांडवली कामांवरील होणाऱ्या खर्चातील २००० कोटी रुपये वापरून पुण्याला कोरोना विषाणूशी आणखी भक्कमपणे लढण्यास सगळ्या उपाययोजना भक्कम कराव्यात असे आबा बागुल म्हणाले .

