तळजाई टेकडीवरील कै. सदु शिंदे क्रिकेट स्टेडियमचा २६ नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

Date:

*आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी मोफत प्रशिक्षण 
  *सरावाच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
  * नक्षत्र गार्डन ,बांबू उद्यान , सोलर पॅनल या प्रकल्पांचे  भूमिपूजन व सेल्फी    पॉईंटचे उद्घाटन 
  *माजी उपमहापौर आबा बागुल यांची पत्रकार परिषदेत माहिती 
पुणे -क्रिकेट हा भारतीयांसाठी जणू धर्मच बनला आहे. केवळ शहरीच नव्हे तर निम शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी ’सचिन’ किंवा ’माही’ होण्याची स्वप्न पहात आहेत.त्यानुसार पुण्यातील तळजाई टेकडीवर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यातील  पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर महान क्रिकेटपटू  कै. सदू  शिंदे यांच्या नावाने  एका सुसज्ज क्रिकेट  स्टेडीयमची निर्मिती करण्यात आली आहे.  प्रशिक्षण आणि सरावाच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या या सदु शिंदे क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
 
  सदू  शिंदे क्रिकेट स्टेडियम, तळजाई टेकडी, पुणे येथे सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या या लोकार्पण  सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते   पृथ्वीराज चव्हाण ,कै, सदू शिंदे यांचे कुटुंबीय , पुण्याचे पालकमंत्री  गिरीश बापट , राज्याचे वनमंत्री  सुधीर मुनगंटीवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक ,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे ,आयुक्त सौरभ राव  यांच्यासह सर्व खासदार, आमदार आणि पक्षनेते,स्थानिक नगरसेवक  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
 
याबाबत  अधिक माहिती देताना आबा बागुल म्हणाले कि, शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी माझ्या संकल्पनेतून एक सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत प्रथमच तळजाई टेकडी परिसरात पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प साकारला जात आहे. विशेष म्हणजे वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी नागरीक यांच्या सहभागाने  प्रकल्प  होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ५ एकर जागेवर कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात आले आहे. या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उभारणीत सिमेंट आणि काँक्रीटचा वापर टाळून स्थानिक पातळीवर मिळणार्‍या दगड, मातीचा वापर केला आहे. त्यामुळे हे स्टेडीयम पूर्णपणे पर्यावरणपूरक  आहे. विशेषतः या क्रिकेट स्टेडियमद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत  दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे . त्याचबरोबर या सोहळ्यात  बांबू उद्यान नक्षत्र गार्डन ,सोलर रूफ पॅनल या प्रकल्पांचेही   भूमिपूजन  होणार आहे. 
 
तळजाई टेकडीच्या पर्यावरणपूरक नियोजनाबाबत अधिक माहिती देताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, २७ वर्ष मी राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहे. अनेक पथदर्शी प्रकल्प माझ्या कारकिर्दीत शहरात साकारले आहेत. सहकारनगर भागात काम करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र प्रभागरचनेमुळे तशी संधी मिळाली नाही. मात्र आता नव्या प्रभागरचनेमुळे कार्य करण्याची संधी मिळाल्याचा  आनंद आहे. शहराच्या फुफ्फुसांपैकी महत्वाची असलेल्या तळजाई टेकडीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकासात्मक कामे होत आहेत. या पार्श्वभूमीवर वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांसह विद्यार्थी, कलावंत, पर्यावरणप्रेमी, महिला, तरुणवर्ग यासह सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार्‍या पथदर्शी प्रकल्पांचा आणि मूलभूत सुविधांसह तातडीच्या सेवांचा समावेश असलेला सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला त्यानुसार सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर  जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. मात्र    त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौर ऊर्जा प्रकल्प  उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी , १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे. वाहनतळापासून   जाण्या येण्यासाठी ई रिक्षा सायकल  उपलब्ध असणार आहेत. नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. व्यायाम आणि चालण्यासाठी येणार्‍या नागरिकांकरिता तसेच वनक्षेत्रात वर्दळ संपूर्णत: रोखण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरु केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज  पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही  होत आहे.
मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स,  महिलांसाठी स्वतंत्र क्रिडांगण , सांस्कृतिक क्षेत्राला वाव देण्यासाठी अँफी थिएटर,  रेन वटर हार्वेस्टिंगद्वारे तळ्यांची निर्मिती, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर्क स्टेशन्स, रोजगार निर्मितीसाठी तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू; अथवा अन्य उपक्रमांसाठी खुले प्रदर्शन केंद्र, रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीला चालना देणारा  प्रकल्प होणार आहे आणि उत्पादित शेतमालासाठी तेथेच विक्री केंद्र, मध्यवर्ती भागात पर्यटकांसह नागरिकांसाठी ’मार्केट प्लेस’, पक्ष्यांच्या अभ्यास व निरीक्षणासाठी ’गाईड विथ टूर’ हा महत्वाचा प्रकल्पही या आराखड्यात आहे.त्याचबरोबर  स्वच्छतागृहे व अन्य नागरी सुविधाही उपलब्ध करून  दिल्या जाणार आहेत. 
प्रकल्पाचे वैशिष्ट्ये 
 
* निसर्गभ्रमण:
पुणे शहर हे देशातील महानगरांच्या यादीत जाऊन बसले आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या महानगरीत निवास करणार्‍या नागरिकांना अनेक प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जावे लागते. निसर्गाचे सान्निध्य हे या ताणतणावांपासून मुक्ती मिळविण्याचे प्रभावी साधन आहे. त्यातून वृक्षवेली आणि प्राणिजगताची शास्त्रीय माहिती मिळवून निसर्गाकडे अधिक डोळसपणे पाहण्याची दृष्टी लाभली तर ती पर्वणीच ! याच उद्देशाने  जैववैविध्य उद्यानात निसर्गभ्रमणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती ही शास्त्रीय माहिती देणार्‍या ’गाईड’सह !

* देशी वृक्षांचे रोपण आणि संगोपन:
सध्याच्या जागतिक तापमानवाढीच्या काळात वृक्ष ही मानवी अस्तित्वासाठी संजीवनी ठरत आहे. त्यासाठी वृक्षांचे संवर्धन हे अत्यावश्यक आहे. त्यात स्थानिक वृक्षांचे संगोपन अधिक पर्यावरणपूरक ठरते. त्यासाठी या परिसरात अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, ऐन, आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, कडुनिंब, कढीलिंब, कदंब, कनकचंपा, करंज, कवठ, कळंब, कांचन, काटेसावर, किनई, कुसुंब, खडशिंगी, शमी , खैर, गुंज, चाफा, चिंच, जांभूळ, निरगुडी, नेपती, पळस, पांगारा, बूच, पारिजातक, पिंपळ, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, बेल, बेहडा, बोर, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, रिठा, वड, साग, हिरडा अशा देशी वृक्षांच्या प्रजातींचे रोपण आणि संगोपन केले जाणार आहे.
* जलाशय:
मागील सलग 3 वर्ष महाराष्ट्रातील बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे लहरी पाऊसमान आणि पाण्याच्या टंचाईचे संकट अधिकाधिक गहिरे होत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ’रेन वटर हार्वेस्टींग’ ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून या परिसरात पावसाचे पाणी अडवून आणि जिरवून पूर्णत।: नैसर्गिक पद्धतीने जलाशयाची उभारणी केली जाणार आहे. अर्थातच त्यासाठी कोणतेही कृत्रिम बांधकाम आणि बाहेरून आणलेले पाणी वापरले जाणार नाही; हे विशेष !

 

* पक्षी उद्यान:
एकेकाळी आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असणारा पुणे शहराचा परिसर अनेक स्थानिक तसेच हंगामी स्थलांतर करणार्‍या विदेशी पक्षांसाठी महत्वाचा अधिवास होता. वाढत्या नागरीकरणामुळे सध्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पक्ष्यांना अनुकूल पर्यावरण निर्माण करून या प्रकल्पात पक्षी उद्यान विकसित करण्यात येणार आहे. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक यांच्यासाठीही हे उद्यान उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये पक्षी आणि एकूण पर्यावरणाविषयी आस्था निर्माण होण्यासाठीही ते महत्वाचे ठरणार आहे.
 

* संकल्पनाधारित 7 उद्याने:
भारतीय संस्कृतीनुसार 28 नक्षत्रांना एकेका वृक्षाशी जोडण्यात आले आहे. या संकल्पनेवर आधारित नक्षत्र उद्यान, बांबूच्या विविध प्रजातींचा समावेश असलेले बांबू उद्यान, महाराष्ट्राच्या डोंगरी भागात उपलब्ध असलेल्या रानमेव्यापैकी करवंदे, जांभळे, आवळा, रायआवळे याची माहिती बहुतेकांना असते. मात्र यापेक्षा वेगळे तोरणं, आमगुळे, आळू असेही वेगळे प्रकार पाहायला मिळणारे रानमेवा उद्यान, मसाल्याच्या पदार्थांच्या वृक्ष वेलींचे दर्शन घडविणारे उद्यान, आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनौषधींची ओळख करून देणारे वनौषधी उद्यान, ओळखी, अनोळखी फुलांच्या झाडे आणि वेली यांचे दर्श घडविणारे पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पती उद्यान या संकल्पनांवर आधारित 7 उद्याने या प्रकल्पात असणार आहेत.
 

* निसर्ग इतिहास संग्रहालय:
निसर्गाचा इतिहास हा एक उद्बोधक विषय असला तरीही तो सर्वसामान्यांपासून दूर आणि उपेक्षित राहिला आहे. या विषयाची ओळख करून देणारे संग्रहालय या प्रकल्पात असणार आहे. या विषयाची ओळख करून घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि तज्ज्ञ या सर्वांसाठी हे संग्रहालय उपयुक्त असणार आहे.
 

* महिलांसाठी स्वतंत्र क्रिडांगण :
सध्याच्या काळात सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. क्रीडाक्षेत्रही त्याला अपवाद नाही. महिलांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा, विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सरावाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने या प्रकल्पात महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहे.
 

* सेंद्रिय शेती विकास:
रासायनिक खते आणि औषधे यांच्यामुळे शेतजमिनींचा होणारा र्‍हास लक्षात घेता सेंद्रीय शेतीचा प्रचार अन प्रसार होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने या प्रकल्पात सेंद्रीय शेती करण्यासाठी भाडेतत्वावर जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी पिकविण्यात आलेल्या कृषी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी इको- बाजारही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
 
* साहसी खेळांची सुविधा:
भारतात आतापर्यंत साहसी खेळ फारसे रुजले नाहीत. याचे प्रमुख कारण या खेळांना लागणार्‍या सुविधा शहरी भागातही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. आता मात्र विद्यार्थ्यांमध्ये या खेळांबद्दल आकर्षण वाढत आहे. त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी साहसी खेळांच्या सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध असणारे केंद्र या प्रकल्पात उभारण्यात येणार आहे.
 

* सोलर रूफ पॅनल्स:
सध्याच्या काळात ऊर्जा टंचाईवर मार्ग काढण्यासाठी पर्यावरणानुकूल सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. भारतीय वातावरणात तब्बल 8 ते 10 महिने स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी या प्रकल्पातील वाहनतळांवर सोलर पॅनल्स बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे निर्माण होणारी वीज या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून अतिरिक्त वीज नजीकच्या परिसरात पुरविण्यात येईल.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...