पुणे- विठुरायाचा अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखलझाला . यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय बनले. फुलांच्या वर्षावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, यांनी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास संत तुकारामम हाराजांच्या पालखीचे तर पावणेसातच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले.
पालख्यांच्या आगमनानंतर नंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालख्या चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष यावेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य यावेळी पाहायला मिळाले.
पालख्यांचे स्वागत करताना मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.
पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकरवर भक्तीगीते लावण्यात आली होती.
दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी
माउली…माउलीच्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माउली…माउली, तुकोबा… तुकोबाच्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी गणरायाचरणी नतमस्तक होत आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी साकडे घातले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या 125 व्या वर्षानिमित्त वारी सोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी, स्वच्छता आणि वारक-यांकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नुकतेच जय गणेश हरित वारी या 50 लक्ष वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वारक-यांनी यामध्ये सहभाग घेत वृक्षलागवड व संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.