पुणे-यंदा ३४व्या पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमध्ये डर्ट ट्रॅक रेसचे हे तरुणांमध्ये विशेष आकर्षण ठरले. ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डर्ट ट्रॅक स्पर्धा गोळीबार मैदान येथे रविवार, दि. ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. १३ विविध गटात ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वळणांचा 1 किमी लांबीचा स्पर्धात्मक डर्ट ट्रॅक तयार करण्यात आला होता. या स्पर्धेत १३२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वतंत्र महिला गटात ७ महिला स्पर्धक ही सहभागी झाल्या होत्या. पुण्याबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मुंबई येथील खेळाडूही सहभागी झाले होते.
प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेचा शुभारंभ केला आणि स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हल चे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, क्रीडा समिती समन्वयक प्रसन्न गोखले व स्पोर्ट्स आर्म्सचे अध्यक्ष किशोर बारास्कर उपस्थित होते. या स्पर्धेत अपाचे १५०, इम्पल्स, वाय बी एक्स, यामाहा, आर एक्स, के टी एम १५०, कावासाकी के एक्स २५०, हिमालयन, रॉयल एनफील्ड बुलेट, टी.व्ही.एस., हिरो होंडा, बजाज यासह परदेशी बनावटीच्या मोटार सायकल व स्कूटरही होत्या.
सायं. ५.३० वाजता बक्षीस वितरण पार पडले. असोसिएशन फॉर रेसिंग अँड मोटर स्पोर्ट्स (आर्म्स)चे अध्यक्ष किशोर बारास्कर व सहकाऱ्यांनी याचे आयोजन केले होते.