पुणे : स्वारगेट येथून प्रवाशांना रिक्षामध्ये घेऊन त्यांना वाटेत लुटणार्या रिक्षाचालकांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी १०० ते १५० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला.
रोहित सुभाष चव्हाण (वय २३, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) हा रिक्षाचालक व त्याचे साथीदार मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९, रा. मंतरवाडी, देवाची ऊरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
स्वारगेट येथील पीएमपी बसस्टँडपासून फिर्यादी तरुण २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता रिक्षात बसला होता. रिक्षा काही अंतरावर गेल्यावर रिक्षाचालकाने फोन करायचा म्हणून त्याच्याकडून मोबाईल घेतला. पर्वती इंडस्ट्रीज जवळील बसस्टॉपजवळून त्याने रिक्षा फिरवून लुल्लानगर परिसरात नेली. फिर्यादीकडील रोख ५०० रुपये तसेच गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. तसेच ४ हजार रुपये ऑनलाईन मागवून घेऊन मोबाईलचा पासवर्ड विचारुन घेऊन जबरदस्तीने त्यांना उतरवुन ते पळून गेले होते.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्ह्यात १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्हा रात्रीच्या वेळी घडला असल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी रोहित चव्हाण हा त्याचे राहते घराचे परिसरात मिळाला. त्याने गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द १) सिंहगड रोड पोलीस स्टेशन २) बंडगार्डन पोलीस स्टेशन ३) बिबवेवाडी पोलीस स्टेशन ४) भारतीविद्यापीठपो.स्टे. २) स्वारगेट पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती नंदिनी वग्यानी यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार मोराळे, तनपुरे, शिंदे, टोणपे, खेदाड, शेख, पवार, घुले, चव्हाण व दुधे यांनी केली.