पुणे- स्रीभृण हत्या रोखण्यासाठी सरकारी कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीबरोबरच जनमानसातील मतपरिवर्तन करण्यासाठ कार्यक्रम राबवायला हवेत असे मत बालरोग तज्ञ डॉ. जयश्री फिरोदिया यांनी व्यक्त केले.
‘शारदा शक्ती’ संस्थेतर्फे संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त अहिल्यादेवी मुलींची शाळा येथे शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘दृष्टी’ स्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सचिव डॉ. अंजली देशपांडे यांना ‘शक्ती प्रेरणा’ पुरस्काराने तर सीओईपी महाविद्यालयातील प्रगतीशील विद्यार्थिनी विदिशा नगराळे’ हिला ‘आय शक्ती सपोर्ट’ पुरस्काराने डॉ. फिरोदिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ‘शारदा शक्ती’च्या राष्ट्रीय सचिव डॉ. लीना बावडेकर, उपाध्यक्ष स्वाती जोगळेकर, डॉ. अंजली देशपांडे या उपस्थित होत्या. ‘संवाद विज्ञानाशी’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
डॉ. फिरोदिया म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियान देशात सुरु केले आहे. अस्वच्छतेमुळे देशात पर्यटक यायला घाबरतात. आपण आजारी पडू अशी त्यांना भीती वाटते. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन महत्वाचे असून कचऱ्याची
विल्हेवाट कशी लावावी याचे प्रशिक्षण शालेय जीवनापासून द्यायला हवे. सौरउर्जा निर्मितीवर भर देतानाच प्रदूषण कमी
करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती व वापर वाढला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहेत्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला पाहिजे.
डॉ. अंजली देशपांडे यांनी ‘दृष्टी’ स्री अध्ययन प्रबोधन केंद्र करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. ही संस्था स्रियांच्या
समस्यांबाबत अध्ययन करते असे सांगून त्या म्हणाल्या, देशाच्या विकासात महिलांची सक्षमता पोहचवता आली पाहिजे हा या संस्थेचा उद्देश आहे. पंजाब, हरियाना, दिल्ली येथे तसेच झारखंड या ठिकाणी स्रीयांच्या समस्यांबाबत सर्वे करण्यात आला. त्यानंतर आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश याठिकाणीही सर्वे करण्यात आले. त्यावेळी स्रियांच्या अनेक समस्या समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. लीना बावडेकर यांनी भगिनी निवेदिता यांच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लीना बावडेकर यांनी, सूत्रसंचालन इंदिरा उजागर यांनी तर आभार सौ. अरुणा जोशी यांनी मानले.