आनंदचे लिखाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे – साहित्यिक डॉ. अजीज नदाफ
स्वतच्या यशाचा “स्टेपिंग स्टोन” सर्वांसाठी पुस्तकरूपाने देणे हे देशनिर्माणाचे कार्य- सहाय्यक आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
दुर्लक्षित कारागीर- दुचाकी मेकेनिक यांच्या हस्ते झाला आगळावेगळा प्रकाशन सोहळा.
सोलापूर- “जगभरातील प्रेरणादाई लेखकांच्या तोडीचे लिखाण आनंदने केले असून हे पुस्तक नक्कीच सर्वांसाठी प्रेरणेचा एक झरा बनेल. आजच्या युवकांना या पुस्तकातील विचारांची गरज असून हे पुस्तक वाचून कोणीही यश मिळवू शकतो,” असे गौरवउदगार साहित्यिक अजीज नदाफ यांनी आनंद बनसोडे लिखित “स्टेपिंग स्टोन टू सक्सेस”या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले. भारताचा विश्वविक्रमवीर व शिखरवीर आनंद बनसोडे याचे ३रे पुस्तक “स्टेपिंग स्टोन टू सक्सेस” याचे प्रकाशन सोलापूर मधील दुर्लक्षित कारागीर- दुचाकी मेकेनिक यांच्या हस्ते झाला असून याद्वारे या कारागिरीला-पेशाला एव्हरेस्टएवढी उंची गाठून देण्याचा प्रयत्न आनंदने केला. या प्रसंगी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ह्याही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कैलास जानराव, लक्ष्मण नारायणकर, रवी राजमान्य,नागेश वैद्य,राजू गवळी, यलाप्पा आवळे, नरेश छत्रबंद या दुचाकी मेकेनिक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय प्रकाशन चे प्रकाशक संजय देडे व आनंदच्या पत्नी अक्षया बनसोडे याही मंचावर उपस्थित होत्या.
“गेल्या काही महिन्यात आलेल्या संकटावर मात करून आनंद सर्व युवकांसाठी प्रेरणा बनला आहे. वाईट काळात कशी मात केली जाते हे आनंदकडून सर्वाना शिकता येईल. या यशाचा “स्टेपिंग स्टोन” सर्व युवकांसाठी खुला करून देणे हे देशातील युवकांना घडवण्याचे कार्य आनंद करतो आहे,” असे उद्गार या प्रसंगी गुन्हेशाखेच्या सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी काढले. मेकेनिक यांच्या हस्ते प्रकाशन केल्यानंतर भावूक झालेले मेकेनिक लक्ष्मण नारायणकर या प्रसंगी बोलताना म्हणाले कि, “आयुष्यभर सायकल-दुचाकी रिपेअरचे काम करताना असे वाटले नाही कि एक दिवस हा सन्मान आम्हाला मिळेल. आमच्या कारागिरीचा व दुर्लक्षित कलेचा हा सन्मान आहे”
रॉबिन शर्मा, झिग झीगलर, लेस ब्राउन, नेपोलियन हिल या आंतरराष्ट्रीय प्रेरक लेखकांप्रमाणेच “स्टेपिंग स्टोन टू सक्सेस” हे पुस्तक आनंदने लिहिले आहे.वडिलांच्या मृत्यूनंतर मणक्याच्या विकाराने अंथरुणाला खिळलेल्या आनंदने आजारपणात केलेला सकारात्मक विचार व यशाचा मार्ग या पुस्तकाद्वारे वाचकांसाठी उपलब्ध केला आहे. हे पुस्तक १५० पानांचे असून विजय प्रकाशन चे संजय देडे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
“पुस्तक लिखाणावेळी स्वतच्या अंतरंगातील सकारात्मक विचारांमुळे आजारपणातून लवकर बरा होण्यास मदत झाली. जगातील सर्व क्षमता आपल्या अंतरंगात सामावल्या आहेत फक्त त्या ओळखता आल्या पाहिजेत. प्रत्येक यश मिळवणे असू द्या किंवा कोणत्याही आजारावर मात करण्याचे बळ स्वतच्या विचारांमध्ये सामावले आहे.हेच विचार नियम या पुस्तकात लिहिले आहेत” असे यावेळी आनंद बनसोडे ने सांगितले.
सोलापूर मधील अम्फी थीएटर मध्ये हा प्रकाशन सोहळा झाला असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बनसोडे, सूत्रसंचालन गुरुशांत धुत्तरगावकर व आभारप्रदर्शन अक्षया बनसोडे यांनी केले.

