‘प्रेम’ या विषयाने निर्माता-दिग्दर्शकांना नेहमीच मोहिनी घातली आहे. माध्यमं बदलली तरी ‘प्रेम’ हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतच असतं. कधी प्रेम हे व्यक्त होतं तर कधी ते अव्यक्तच राहतं…. आगळ्या वेगळ्या प्रेमाची अनोखी अनुभूती देणारा अमोल प्रोडक्शनचा ‘टाफेटा’ हा नवा प्रेमपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
‘शेजारी शेजारी’, ‘लपंडाव’, ‘क्षण’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ यासारख्या यशस्वी चित्रपटानंतर निर्माते सचिन व संजय पारेकर आता ‘टाफेटा’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमाच्या शीर्षकाचे अनावरण वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते करण्यात आलं. शेजारी शेजारी या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित परिसंवादात निर्माते सचिन पारेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाची कथा-पटकथा,संवाद तुषार गोडसे यांची असून दिग्दर्शन नितीन सावळे यांचं आहे.
हटके शीर्षकाप्रमाणे या चित्रपटाची कथा ही वेगळ्या धाटणीची आहे. प्रेमकथेतून नात्यांचा उलगडत जाणारा अर्थ व त्यातून निर्माण होणारा भावनिक बंध या चित्रपटात पहायला मिळेल. हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल असा विश्वास निर्माते सचिन पारेकर यांनी यावेळी व्यक्त केला. सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत खांडकेकर, प्राजक्ता माळी, पल्लवी पाटील या कलाकारांच्या भूमिका यात आहेत.