साऊथ ची हिरोईन करतो सांगून बलात्कार …
बंगळुरु – अभिनेत्री बनण्याची इच्छा असलेल्या तरुणीवर बलात्कार करण्याच्या आरोपात बंगळुरु पोलिसांनी एजंटला अटक केली आहे. एजंटने बलात्काराचा व्हिडिओ तयार करुन तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. या अत्याचारात त्याच्यासोबत आणखी दोन जण होते, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
आरोपीचे नाव एहसान (वय 30 वर्षे) असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो बंगळुरुचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणीची ओळख मार्चमध्ये मुंबईत झाली. आरोपीने तिला कन्नड चित्रपटांमध्ये अभिनेत्री होणार का असा प्रस्ताव दिला होता. तुझी इच्छा असेल तर बंगळुरुला ये, तिथे तूला चित्रपटांत काम मिळवून देतो असे त्याने सांगितले होते. एवढेच नाही तर त्याने तरुणीसाठी विमानाचे तिकीट आणि हॉटेल देखील बुक केले होते. जेव्हा तरुणी बंगळुरुला पोहोचली तेव्हा त्याने तिला स्क्रिन टेस्टसाठी एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि एक लाख रुपयांचा चेक देखील दिला.
तरुणीच्या तक्रारीनुसार एहसानने तिला हॉटेलमध्ये चेकसोबत एक ड्रिंक देखील दिले. त्यात गुंगीचे औषध मिसळलेले होते. जेव्हा तरुणी बेशुद्ध झाली तेव्हा एहसान आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर बलत्कार केला. तरुणीला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींनी बलात्काराच व्हिडिओ तयार केल्याचे सांगितले. पोलिसात तक्रार केली तर तो व्हिडिओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी हतबल होऊन मुंबईला परतली. तिने एहसानने दिलेला चेक कॅश करण्याचा प्रयत्न केला तर तो बाऊन्स झाला. त्यानंतर तिने बंगळुरुच्या एका एनजीओच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एहसानला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एहसान एक बनावट एजंट आहे. त्याच्या दोन सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.