” संगीताला प्राधान्य देणारे ‘चैरिटी शो’ भारतात सर्वप्रथम आम्हीच सुरु केले. त्यातूनच संगीताची गोडी अधिकाधिक वाढत गेली आणि चित्रपटसृष्टीत आम्ही संगीतकार बनलो हाच आमच्या दृष्टीने फार मोठा ‘टर्निंग पौईंट ठरला . त्यावेळी आमच्यासाठी संगीतकार सचिन देव बर्मन हेच मोठे आदर्श होते त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्याबद्दल अत्यानंद होत आहे” या शब्दात संगीतकार आनंदजी यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
”कल्याणजी-आनंदजी” या हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या जोडगोळीतील आनंदजी यांना तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट संगीतकारांसाठी असलेला ‘सचिन देव बर्मन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना आनंदजी बोलत होते. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत करून सूत्रसंचालन केले.
सुमारे दीड तास चाललेल्या या वार्तालापात आनंदजी यांनी अतिशय मिश्किल शैलीत संगीतकार म्हणून आपल्या प्रवासाचे वैशिष्ठ्ये सांगितली. आम्ही संगीतात अनेक प्रयोग केले आणि त्यात यशस्वीही झालो असे त्यांनी सांगितले. आनंदजी म्हणाले, आम्ही लहानपणापासून मुंबईतील गिरगाव येथील एका चाळीत राहत होतो. त्या चाळीत सर्वभाषक लोक राहत असल्याने आम्हाला सर्व भाषांची जाण आली,. शाळकरी वयापासून आम्हाला संगीताची आवड होती मात्र जेंव्हा पहिल्यांदा संगीतकार म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले तेंव्हाच प्रथम पेटी शिकलो सुरुवातीपासून ‘चैरिटी शो’ करीत राहिल्यामुळे अनेक नामवंत गायक -गायिका आमच्या ‘चैरिटी शो’ मध्ये गात होत्या त्याचा पुढे संगीतकार म्हणून चांगला फायदा झाला असे त्यांनी सांगितले.
संगीतकार हेमंतकुमार यांच्या ‘नागीन ‘ चित्रपटात कल्याणजी यांना ‘बिन’ वाजविण्याची संधी कशी मिळाली व ती त्यांनी आधुनिक वाद्याच्या सहायाने कशी वाजविली त्याची हृद्य हकीकत सांगताना आनंदजी म्हणाले, आम्हा दोघांनाही कोठेही चांगल्या चाली सुचत असत व त्या आम्ही लक्षात ठेवून त्याचा नंतर गाण्यात वापर करीत. ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील ‘तेरे बिना भी क्या जीना’ हा मुखडा आम्ही ब्रीच कैंडी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णास भेटायला गेलो असता सुचला अशी आठवण त्यांनी सांगितली. ”कल्याणजी-आनंदजी” या नावाने काम करीत असताना आम्ही कोठेही ‘ईगो’ न बाळगता आमच्यापैकी ज्याची चांगली चाल निर्मात्याला योग्य वाटत असेल ती आम्ही वापरीत असू असेही त्यांनी सांगितले.
सर्वश्री मोहम्मद रफी, मुकेश ,किशोरकुमार तसेच लता मंगेशकर , आशा भोसले यांच्या आठवणी सांगतांना आनंदजी म्हणाले हे सर्व कलाकार बहुश्रुत आणि श्रेष्ठ दर्जाचे होते.त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळायचा. मोहम्मद रफी तर कोणतेही गाणे रिहर्सल केल्याशिवाय गायचे नाहीत असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याच्या उलट हल्लीचे गायक आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा गैरवापर करतात हेही त्यांनी सोदाहरण सांगितले. हल्लीच्या संगीतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जातो त्यामुळे गीताचे शब्द, चाल तसेच गायकाच्या गाण्याचा ‘अंदाज’ याला फारसे महत्व उरले नाही त्यामुळे आजकालची गाणी लक्षात राहत नाहीत असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.