पुण्यातील शनिवारवाड्यावरील एक गजबजलेली संध्याकाळ… एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी रसिक प्रेक्षकांची ओसंडून वाहणारी गर्दी.. ढोल ताशे , रणशिंग, गणेश वंदना, छत्रपती शिवरायांचा जयजयकार, शाहिरांच्या गगनभेदी आवाजातील पोवाडे या सा-यांनी तयार झालेलं रोमांचकारी वातावरण आणि अशा वातावरणात त्यांच्या आगमनासाठीची शिगेला पोचलेली उत्सुकता.. या भारावलेल्या वातावरणात ते रंगमंचावर अवतरतात.. ” कोण कुठला इंग्लंड देश ” म्हणत रौद्ररुपी सिंहगर्जना करतात आणि उपस्थितांच्या अंगावर राेमांच उभे राहतात.. झगमगत्या प्रकाशात ते प्रेक्षकांच्या समोर येत आपल्या असंतोषाची प्रचिती देतात आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! “अशी ललकारी देतात. त्यांच्या या रुपाने भारावलेला जनसमुदाय लोकमान्य टिळकांचा विजय असो या घोषणांनी आसमंत दणाणून सोडतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात शोभावं असं हे दृश्य काल पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवलं. निमित्त होतं ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटाच्या प्रथम रुपाच्या प्रदर्शनाचं आणि रंगमंचावर होते लोकमान्यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लोकमान्यांचे वंशज पणतू दीपक टिळक, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राउुत, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी चित्रपटांच्या इतिहासातील अत्यंत गौरवाचा क्षण पुणेकरांनी शनिवारवाड्यावर अनुभवला. यानिमित्ताने लोकमान्यांच्या आठवणींनी शनिवारवाडाही झळाळून निघाला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक धगधगता अध्याय असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य – एक य़ुगपुरूष’ हा चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. नीना राऊत फिल्म्सची निर्मिती आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. भारतीय असंतोषाचे जनक असलेले आणि आपल्या वाणीने, लेखणीने आणि कृतीने ब्रिटीश साम्राज्य हादरवून सोडणा-या लोकमान्यांच्या आयुष्यावरचा हा पहिलाच चित्रपट. यानिमित्ताने या चित्रपटाचे ‘प्रथम रुप’ (फर्स्ट लुक) लोकमान्यांची कर्मभूमी असलेल्या पुणे शहरात एका भव्यत्तम सोहळ्यात एस्सेल व्हिजनने लोकार्पित केले.
याप्रसंगी बोलतांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की ,“हा क्षण आपल्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. लोकमान्य हे ख-या अर्थाने युगपुरूष होते. माझ्या वडिलांनी लोकमान्यांना अगदी जवळून बघितलं होतं त्यामुळे त्यांच्या विचारांचं बाळकडू मला मिळालं. अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व, धारधार वाणी, अभ्यासू तसेच जनमानसावर हुकुमत आणि जरब असणारे ते नेते होते. चाफेकर बंधुंच्या क्रांतीकारी योजनेमागेही लोकमान्यांच्या विचारांचीच प्रेरणा होती. रॅंड वधाचा तपास करणा-या ब्रुईन नावाच्या एका ब्रिटीश अधिका-यालाही आम्ही सशस्त्र क्रांती करू असे टिळकांनी ठणकावून सांगितले. ब्रिटीशांसमोर क्रांतीची भाषा करणारा हा पहिला क्रांतीकारी. समकालीन नेत्यांच्या तुलनेत लोकमान्यांचं असलेलं वेगळेपण आणि मोठेपण इतिहासात नाही तर गीतेत शोधावं लागेल. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट बनतोय यासाठी मी चित्रपटाच्या सर्व कलावंत तंत्रज्ञ मंडळींना शुभेच्छा देतो.”
चित्रपटात लोकमान्यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे म्हणाले की , “नारायण श्रीपाद राजहंसांना बालगंधर्व अशी पदवी देणारे लोकमान्यच होते. यापूर्वी मी बालगंधर्वांची भूमिका साकारली आणि आता मला लोकमान्यांचीही भूमिका साकारायला मिळते यामुळे मी स्वतःला खूप नशिबवान समजतो. मी मुळचा पुणेकर. या शहरातच वाढलो मोठा झालो. लोकमान्यांची कर्मभूमीही पुणेच. लोकमान्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर जिथे जिथे आपण उभे असू तिथून देशप्रेमाचीच स्पंदने आपल्याला जाणवतात आणि ती जाणवलीच पाहिजेत. या महान युगपुरूषाची भूमिका साकारण्याचे भाग्य मला मिळाले हे मी त्यांचेच आशीर्वाद मानतो. या भूमिकेसाठी मी जी काही मेहनत घेतली त्याचं श्रेय दिग्दर्शक ओम राऊत यांचं आहे.”
चित्रपटाची कल्पना कशी सुचली या प्रश्नावर बोलताना दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले की, “लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर लहानपणापासूनच प्रभाव होता. घरात असलेल्या लोकमान्यांच्या संपूर्ण वातावरणामुळे त्यांच्याबद्दल मनात पराकोटीचा आदर होता. आजच्या पिढीला महापुरूष समजावून सांगायचे असतील तर त्यासाठी या पिढीचेच माध्यम निवडावे या विचारातून लोकमान्य चित्रपटाची संकल्पना पुढे आली. यासाठी लागणा-या ऐतिहासिक दस्ताऐवज आणि संदर्भांसाठी दीपक टिळक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा चित्रपट लोकमान्यांच्या देशभक्तीच्या विचारांवर आधारीत आहे. त्यांचे क्रांतीकारी विचार हाच या चित्रपटाचा मुख्य गाभा असणार आहे.”
अतिशय भव्यदिव्य स्वरुपात सादर झालेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनिसने सादर केलेली गणेशवंदना, देवानंद माळी आणि सहका-यांनी सादर केलेला छत्रपती शिवरायांचा पोवाडा, नंदेश उमप आणि सहका-यांनी सादर केलेला लोकमान्यांचा दमदार पोवाडा, हृषिकेश बडवे यांनी सादर केलेले लोकमान्य स्तवन याने कार्यक्रमात आणखी रंग भरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद ओक आणि स्पृहा जोशीने केले तर मान्यवरांशी नेटका संवाद साधण्याचे सूत्र प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांभाळले.