पुणे—लोकशाहीतील ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंतची व्यवस्था ही फक्त भारतातच टिकून आहे.
मात्र, या व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची इच्छापूर्ती होत नसेल, त्यांना आशेचा किरण दिसत
नसेल तर या व्यवस्थेचीच पुनर्रचना करावी लागेल असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर
यांनी व्यक्त केले.
एस. एम जोशी जोशी सभागृहात कृष्णकांत कुदळे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील
सर्वोत्कृष्ट पतसंस्थेला दिला जाणारा यंदाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार बारामती तालुक्यातील माळेगाव
येथील श्री शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला, आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी
व्यक्ती वा संस्थेस दिला जाणारा यंदाचा शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार राजा दिनकर केळकर संग्रहालयाला,
कृष्णकांत कुदळे फाउंडेशनच्या वतीने समाजातील एका विशिष्ट क्षेत्रात ध्येयवादाने प्रेरित होवून काम
करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा सुनील दत्त पुरस्कार प्रा. गौतम बेंगाळे यांना तर नर्गिस दत्त महिला
नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उदयोन्मुख
कलाकारास देण्यात येणारा नर्गिस दत्त पुरस्कार नाट्य-सिने अभिनेत्री पर्ण पेठे हिला रामराजे निंबाळकर व
जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकी रोख
रुपये २१ हजार व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. श्री शंकर ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक
अध्यक्ष दत्तात्रय येळे, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे सुधनवार रानडे, कृष्णकांत कुदळे पतसंस्थेचे
संस्थापक अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष मोहन टिल्लू, सचिव प्रा. एम. एम. फुले, नर्गिस दत्त महिला
पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. मंगल कुदळे, उपाध्यक्षा अॅड.जोत्स्ना बानपेल , सचिव श्वेता नारके,
रवींद्र दुर्वे, प्रा. दादा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
रामराजे निंबाळकर म्हणाले, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई
फुले या महामानवांच्या विचारांना संकुचित जातीचे वळण देण्याचा प्रयत्न करू नये. पुणे विद्यापीठाचे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण होताना वेगळे वळण लागले नाही, ही फार मोठी गोष्ट
आहे असे त्यांनी नमूद केले. आपण लोकशाहीची संकल्पना घेतली. राजकारणातील मते जातीवर जायला
लागली तर लोकशाही टिकेल की नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या गोंडस
नावाखाली जे सुरु आहे ते योग्य नाही. ती डिग्री आजच्या तरुणांनी घेवू नये असा सल्ला त्यांनी दिला.
सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. बस मध्ये बसताना शेजारी कोण आहे हे बघून बसले जाते.
यावरून आपण तरुण पिढीसमोर काय आदर्श ठेवणार आहोत, त्यांच्यासाठी मागे काय ठेवून जाणार आहोत
याचा विचार सर्वांनी गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले. राजकारणी, मंत्री, मुख्यमंत्री,
पंतप्रधान हे काही सुपरमॅन नाहीत. त्यांच्यावर काही राजकीय बंधने असतील परंतु राजकारणातील आणि
समाजातील परिस्थिती बदलण्याची ताकद सुजानन समाजातच आहे. तीच जर जातीयतेच्या संकुचित
वृत्तीकडे जात असेल तर लोकशाही टिकणार नाही असे ते म्हणाले.
कृष्णकांत कुदळे ही चोखंदळ व्यक्ती आहे. सत्कारमूर्तींची निवड ते अत्यंत बारकाईने करतात असे सांगून
रामराजे म्हणाले, भविष्यात क्रीडा क्षेत्रासाठी आणि कृष्णकांत कुदले यांचा ज्या क्षेत्राशी संबंध नाही त्या
क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार द्यावा अशी सूचना त्यांनी केली.
रामदास फुटाणे म्हणाले, पुरोगामी विचार कसा पुढे नेता येईल याचा विचार करून कृष्णकांत कुदले हे
पुरस्कारार्थींची निवड करतात. महाराष्ट्राला राजकारणाची चांगली परंपरा आहे. स्व.यशवंतराव चव्हाण
यांच्या नावाने, उद्योगाची परंपरा असणाऱ्या शंतनुराव किर्लोस्करांच्या नावाने आणि रसिक व मित्र म्हणून
सुनील दत्त यांच्यावर प्रेम करणारा म्हणून त्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात ही अभिनंदनीय बाब
आहे.
कृष्णकांत कुदले यांनी आपल्या प्रास्ताविकपार भाषणात पुरस्कारामागची भूमिका व भावना स्पष्ट केल्या.
पुरस्काराची रक्कम १५ हजाराहून २१ हजार केली आहे. ती २५ हजार करणार असल्याची घोषणा त्यांनी
यावेळी केली.
सुधनवार रानडे, पर्ण पेठे ,दत्तात्रय येळे, प्रा. गौतम बेंगाळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिध्द गायिका सौ. पद्मजा लामरुड यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायिका स्व.
नर्गिस दत्त यांच्या गाजलेल्या चित्रपटातील अविस्मरणीय गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनया देसाई यांनी केले तर आभार मोहन टिल्लू यांनी मानले.