राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी आपल्यापुढेही सत्तेत जाण्याचा पर्याय होता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यापुढेही सत्तेत जाण्याचा पर्याय होता. पण माझ्या वडिलांनी मोठा संघर्ष केला. त्यामुळे त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही, असे त्या म्हणाल्या.सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, सुरुवातीला मी राजकारणात शरद पवारांची मुलगी म्हणून आले. तेव्हा माझ्या घरातील सर्वजण माझ्या प्रचाराला येत होते. अजित पवारही यायचे. माझ्यापुढे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज येथे लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. पण मी लहानपणापासूनच लाल दिवा पाहत आहे. माझ्या वडिलांनी खूप मोठा संघर्ष केला. त्यांना सोडून सत्ते जाणे मला पटले नाही.
यशवंतराव चव्हाण यांचा वारसा केवळ शरद पवारांनी चालवला. सध्या राज्याच्या राजकारणात 2 नवे गट (अजित पवार व शिंदे) झालेत. त्यांच्याशी आमचा लढा आहे. सत्तेत असताना माझी आई आम्हाला वाढत्या महागाईकडे लक्ष देण्याची सूचना करत होती. आज सर्वकाही महाग झाले आहे. याला जबाबदार अदृश्य शक्ती आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना म्हणाल्या.
भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज त्यांच्या ना खाऊंगा, ना खाने दुंगाचे काय झाले? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची माफी मागा. समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्याचे काय झाले? सकाळी 6 वाजता ईडीने त्यांच्यावर छापेमारी केली होती. सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची ईमानदारी आहे. मी दिल्लीच्या अदृश्य शक्तीला चित केले नाही तर नाव सांगणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा शिवसेना पक्ष त्यांच्या मुलाला दिला होता. तो पक्ष दुसऱ्याच कुणीतरी घेतला. त्याचे पुढे काय होते हे कळेलच. भाजपचे स्वतःचे 105 आमदार होते. आज त्यांच्याकडे काय आहे? प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांना 2004 मध्ये मंत्री केले, असे सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीवर DCM-1 असे लिहिलेले असते. भाजपचे 105 आमदार आहेत. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले. ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस यांना त्रास दिला जातोय. दिल्लीतील नेत्यांना ज्यांचे नाव कुणाला माहिती नसते असे मुख्यमंत्री लागतात. योगी आदित्यनाथ सोडून एक नाव सांगा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मला कारखाना चालवता आला नसता
सु्प्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरेच झाले. कारण मला तो कारखाना चालवता आला नसता. एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केले की गल्लत होते असे आज होताना दिसते.

