कायगाव टोका – काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ‘काकासाहेब अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अंत्यविधीला तब्बल 800 पोलिसांचा बंदोबस्त होता. पंचक्रोशीतील हजारोंच्य संख्येने गावकरी हजर होते. या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबाद-नगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. हजारो मराठा समाजाचे कार्यंकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहेत.
खैरेंना मज्जाव, 150 ते 200 जणांनी लावले पिटाळून, पोलिस संरक्षणात खासदार परतले
अंत्यविधी कार्यक्रमासाठी खासदार चंद्रकांत खैरे, तसेच सुभाष झांबड आले, परंतु संतप्त जमावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यांना अंत्यविधीस्थळी प्रवेशापासून मज्जाव करण्यात आला. ‘गो बॅक- गो बॅक’ अशा घोषणाबाजी सुरू झाली. जवळजवळ दीडशे ते 200 जणांचा जमाव खैरेंवर चालून गेला. त्यांच्या गाडीलाही धक्काबुक्की केली. खैरेंना पोलिस तसेच एसआरपीएफच्या संरक्षणात माघारी जावे लागले.
संतोष मानेंना किरकोळ दुखापत
दरम्यान, या गोंधळात माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा मुलगा संतोष माने हा किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
अंबासाहेब दानवे, झांबड उपस्थित
अंत्यविधीच्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी सभापती संतोष जाधव, कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासह अनेक नेते-पदाधिकारी उपस्थित आहेत. तसेच काकासाहेब शिंदे यांच्या आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिक हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.
सकाळपासून हजारोंची गर्दी
‘काकासाहेब शिंदे अमर रहे’च्या घोषणा पुलावर सुरू आहेत. या पुलावर हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
पोलिसच म्हणाले, उड्या मारा , आंदोलकांचा गंभीर आरोप
दरम्यान, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच काकासाहेब शिंदेंचा बळी गेल्याचा आरोप प्रदीप निरफळ आणि सुदाम मंडलिक यांनी केला. हे दोघेही काल घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी दिव्य मराठीला माहिती दिली की, काल पोलिसच आंदोलकांना उड्या मारा म्हणत होते. यावर खरंच काकासाहेब याने गोदावरीत उडी मारल्यावर त्याला वाचवण्यासाठी इतर कार्यकर्त्यांनी वाचवण्यापासून रोखले. पोलिस म्हणत होते, तुम्ही उडी घेऊ नका, इतर लोक त्याला वाचवतील.
मनसे कार्यकर्ते अण्णासाहेब जाधव यांनीही पोलिसांवर आरोप केला. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच काकासाहेब शिंदेंचा बळी गेल्याचे ते म्हणाले.
पोलिसांची अतिरिक्त कुमक आंदोलनस्थळी दाखल
तथापि, डीएसपी उज्ज्वला बनकर यांनी माहिती दिली की, उस्मानाबाद आणि बीडवरून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावलेली आहे. यात 4 डीवायएसपी, 2 अॅडिशनल एसपी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 100 पोलिस कर्मचारी व एसआरपीच्या 3 तुकड्या आंदोलनस्थळी दाखल आहेत.

